होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत सगळ्यांनाच खूप प्रिय असा आहे. नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. विविध रंगांनी नटलेला हा सण साजरा करण्याचे प्रकार सुद्धा विविधरंगी आणि विविधढंगी असतात. होळी आणि रंगपंचमी या दोन दिवसात प्रथा आणि परंपरेनुसार होळी मातेच्या साग्रसंगीत पूजेबरोबरच अनेक गोष्टींची आणि मजेची लयलूट असते. परंपरा, पद्धती या जरी वेगवेगळ्या असल्या तरी एका गोष्टीत सगळीकडे साम्य असते ती म्हणजे धम्माल, मज्जा, मस्ती.
लहानपणी आमच्या परळला होळीच्या आयोजनाची दोन महिने आधीपासूनच तयारी असायची. समवयस्क मुलामुलींचा होळीच्या सणाची मज्जा घेतली आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, सर्वांनी एकत्र येऊन त्याचा आस्वाद घ्यायचा आणि मग रात्रभर साखळीवाणी, वीष-अमृत अथवा गाण्याच्या भेंड्या खेळत होळीच जागरण करायचे. दुसऱ्या दिवशी सकाळपासून रंगपंचमी खेळण्यासाठी आमची सगळी टोळी तयार असायची. होळीच्या त्या रंगीबेरंगी आठवणी अजूनही तशाच ताज्यातवान्या आहेत.
मी लहानपणापासूनच नृत्यकलेशी जोडले गेल्यामुळे होळीच्या दिवशी बॉलिवूडमध्ये गाजलेल्या होळीच्या गाण्यांवर नृत्य करणे स्वाभाविकच होते. रेडिओवर त्या दिवशी सगळी होळीची गाणी लागायची. मग काय त्या गाण्यांवर मनसोक्त थिरकायचं आणि रंगपंचमीची मजा लुटायची.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत होळी सणावर असंख्य गाणी रचली गेली आहेत. आपल्या जुन्या-नवीन कलाकारांनी रुपेरी पडद्यावर होळीच्या रंगांचा मनमुराद आनंद लुटला आहे. आज ना छोंडेंगें बस हमजोली, होली के दिन दिल खिल जाते है, अरे जारे हट नटखट, मलदे गुलाल मोहे, होळीचं सोंग घेऊन, नेसते पैठणी चोळी गं, खेळताना रंग बाई होळीचा, आमचे दाराशी हाय शिमगा इत्यादी अशी शेकडो नृत्यमग गीते आपल्याला चित्रपटसृष्टीने दिली आहेत. त्यांचे चित्रीकरण बघितले की नेहमी वाटायचे की आपण का नाही अशी रंगपंचमी खेळत.
त्याकाळी राजकपूर यांच्या घराण्याच्या होळीबद्दल खूप आकर्षण असायचे. संध्याकाळी टीव्हीवरील बातम्यांमध्ये हमखास त्यांच्या होळीचे चित्रीकरण दाखवायचे. पाण्याने भरलेला हौद, ढोल वाजवणारी मंडळी आणि त्यावर ताल धरून नाचणारी कलाकार मंडळी. हे सर्व बघायला खूप मज्जा यायची. अलीकडच्या काळात अशा पद्धतीच्या होळी उत्सवाचे आयोजन बरेच कलाकार करताना दिसतात. मराठी चित्रपटसृष्टीतही गेली कित्येक वर्षे असे आयोजन होताना दिसत आहे. इतकंच काय तर सोसायट्यांमध्ये डीजे वैगेरे लावून हा उत्सव एकदम जोशात साजरा केला जातो.
कोकणात होळीला पालखी निघते जी वाजत गाजत जवळजवळ महिनाभर गावात फिरत असते. या सणाकरीता मुंबईहून कोकणात खास गावी जाणाऱ्यांची संख्याही भलीमोठी आहे. गोकुळातल्या राधा-कृष्णावरील होळीच्या गाण्यांचे अनेक दाखले आपल्याला बघायला मिळतात. अशा या रंगीबेरंगी रंगांच्या सणाचे विलोभनीय दर्शन आपल्याला सगळीकडे बघायला मिळते.
भविष्यात लहानपणापासून आकर्षण ठरलेल्या चित्रपटातील होळीप्रमाणे होळी साजरी करण्याचा मानस आहे. नृत्यवर्गातील लहान-मोठ्या सर्व विद्यार्थ्यांसमवेत रंगांची उधळण पिचकाऱ्या, ओढण्या, ढोल, ताशे, डफ, पाण्याचा हौद, जेजे चित्रपटात पाहिलं गेलंय तेते सगळं अनुभवायची खूप इच्छा आहे. अशी ही टोटल फिल्मी होळी साजरी करून त्यांचे अंतरंग मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवायचे आहेत.
- कविता कोळी