अभिनेत्री म्हणून स्वतःच्या मर्यादा माहीत असून आणि त्याप्रमाणेच स्वतःला किंबहुना आपल्यातील त्याच नेमकेपणावर भर देऊन प्रेक्षकांसमोर सादर होणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. दिसायला जितकी सुंदर तितकाच इनोसंट चेहरा लाभलेली. कतरिनातील मला जाणवलेला महत्त्वाचा गुण म्हणजे तिला जे जमते नेमके तेच ती प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करते. आतापर्यंत अनेक नृत्यांवर तिने आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे. त्यातील बहुतांशी नृत्ये ही आयटम साँगवर आहेत परंतू तरीही तिच्या त्या नृत्यांमध्ये कुठेही भडकपणा जाणवला नाही किंवा त्या नृत्यांना अश्लिलतेची झालर आली नाही. कदाचित तिला मिळालेल्या इनोसंट चेहऱ्याच्या दैवी देणगीमुळे असेल.
काळ बदलला तशी नृत्याची संकल्पनाही बदलली. पूर्वी शास्त्रीय नृत्यालाच जनमाणसात प्रचंड मान्यता होती. हळूहळू आपल्या मातीच्या रांगड्या लोककलेकडे सुद्धा मनं वळू लागली...आणि आताच्या बदलत्या काळानुसार नवीन पिढीलाच नाही तर चिमुरड्यांनासुद्धा आयटम साँगवर नृत्य करण्याचा मोह होतो. अर्थात त्यांना त्यातलं काही कळत नसतं हा भाग वेगळा. पूर्वीच्या चित्रपटात असं आयटम साँग वेगळ्या हिरोईनमार्फत करवून घेतलं जायचं. चित्रपटाची मूळ नायिका ही नृत्ये करायची नाही. परंतू बदलत्या काळानुसार हल्ली चित्रपटाची हिरोईनच ही नृत्ये करत असल्यामुळे तिचा प्रभाव नृत्यप्रेमींवर निश्चितच पडू लागला आहे. आपल्याला जिकडे तिकडे ही नृत्ये सादर होताना दिसतात आणि त्यामागची मानसिकता झपाट्याने बदलताना दिसत आहे.
बहुतांश चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या आयटम साँगचा उपयोग केला जातो. यात नृत्यदिग्दर्शकाचं कसब पणाला लागतं. अवघ्या तीन मिनिटात त्याला प्रेक्षकांची मन जिंकायची असतात. सिगनेचर स्टेप, स्टंटबाजी किंवा एरोबिक मुव्हमेंट्स यासारख्या तंत्राचा वापर करत नृत्यदिग्दर्शक ते आव्हान पेलण्याचं प्रयत्न करतात. या सगळ्यात नृत्यदिग्दर्शकाला उपयोगी पडतो तो गाणं सादर करणारा कलाकार. कतरिनाने हे काम एक दोन नाही तर कित्येक गाण्यांमध्ये कौशल्याने पार पाडलेले आहे.
त्यामुळेच कतरिना कैफच्या नृत्यांत आयटम साँगचीसुद्धा विविधता दिसते. चिकनी चमेलीमध्ये ती देसी ढंगात नाचली आहे तर मेरे माहिया सनम जानममध्ये तिने एरोबेटिक मुव्हमेंट्समध्ये स्वतःला अगदी परफेक्ट बसवून घेतलं आहे. या नृत्यासाठी आवश्यक असलेली तिची शरिराची लवचिकता बघून थक्क व्हायला होतं.
एकाच पठडीतील नृत्ये तिने केलेली नाहीत, हेसुद्धा तिचं वैशिष्ट्य. तिच्या प्रत्येक नृत्यदिग्दर्शकाने तिला वेगळ्या पद्धतीचे नृत्य देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचवेळी कतरिनानेसुद्धा त्या नृत्यांचे सादरीकरण तितक्याच नावीन्यपूर्ण पद्धतीने आणि हावभावांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तिने भरपूर आयटम साँगवर वेगवेगळी नृत्ये करून कुठेच तिच्या नृत्यात तोचतोचपणा आलेला नाही. म्हणजे ते नावीन्य आणण्यामध्ये कुठेतरी ती यशस्वी नक्कीच झाली आहे. नृत्यातला, पोशाखातला आणि हावभावातला वेगळेपणा जपण्याचं कसब तिला व्यवस्थित जमलेलं आहे आणि हेच तिचं खरं कौशल्य आहे.
आयटम साँग प्रेक्षकांपर्यंत लवकर पोहोचतात आणि मग अशी प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या हिट गाण्यांवर नृत्य करण्याची एकच लाट येते. नवोदितांना या नृत्यांचा मोह होतो पण ही नृत्ये करताना किंवा या नृत्यांची छाप स्वतःवर पाडून घेताना आपल्याला स्वतःला थोडे भान ठेवायला हवे. नृत्याचे हावभाव एका मर्यादेला ओलांडणारे नसावेत त्याचबरोबर तुमच्या पेहरावाचेसुद्धा भान असायलाच हवे. उत्तम नृत्य म्हणून तुमचे सादरीकरण असेल तर प्रेक्षकांना नक्कीच आवडतं. कतरिनाच्या आयटम साँगने प्रभावित होणारी पिढी तिच्या नावीन्याचा प्रयत्न आणि मेहनती वृत्तीचा कित्ता गिरवेल, अशी अपेक्षा.
No comments:
Post a Comment