महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकनृत्यांपैकी एक असलेले हे कोळीनृत्य मुलामुलींच्या समूहात केले जाते. तर काही नृत्ये ही नुसत्या मुलींची अथवा स्त्रियांचीसुद्धा असतात. या नृत्यात व्हलव्ह हलवून बोट चालवणे, जाळे फेकून मासे पकडणे, टोपलीत मासे वेचणे इत्यादी अशा त्यांच्या व्यवसायाशी निगडीत स्टेप्स बघायला मिळतात. याशिवाय ठरलेल्या काही पारंपरिक स्टेप्स असतात ज्या हमखास आपल्याला बघायला मिळतातच किंबहूना त्याशिवाय कोळीनृत्य पूर्णच होऊ शकत नाही. तसंच मुलामुलींची छेडछाडसुद्धा खूप आकर्षक पद्धतीने या नृत्यात दाखवली जाते.
काही नृत्यात आपल्याला या जमातीचे वैशिष्ट्यपूर्ण लग्न आणि वरातसुद्धा बघायला मिळतात आणि मग लगेच आपल्या तोंडी या गो दांड्यावरनं नवरा कुणाचा येतो हे कोळीगीत आपसुकच येतं. आपल्या पिढीतील जवळ जवळ सर्वांनाच त्यावेळच्या कोळीगीतांनी वेड लावले होते. ती सर्व कोळीगीते एक तर तोंडपाठ असायची किंवा माहीत तरी असायची. वेसावकर आणि मंडळी महाराष्ट्राची लोकधारा या कॅसेट तर तुफान चालायच्या तेव्हा.
शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाने कोळी गीतांना आणि कोळी नृत्याला घराघरात पोहोचवले होते. शाहीर कृष्णराव साबळे, शाहीर विठ्ठल उमप, शाहिर दामोदर विटावकर यांनी कोळीगीतांमध्ये आणि लोकगीतांमध्ये दिलेल्या योगदानाने आजच्या पिढ्यानपिढ्या समृद्ध झाल्या आहेत. शाहिर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारामधील जवळ जवळ सर्वच गीते, तर शाहीर विठ्ठल उमप यांची ये दादा अवार ये तसंच आज कोळीवाड्यात येईल वरात ही प्रसिद्ध कोळी गीते याशिवाय शाहीर दामोदर विटावकर यांचे गौरी गणपतीचे सणाला हे गीत अशी अनेक उदाहरणे आहेत. खूप वर्षे आधी शाहीर विठ्ठल उमप यांच्यासोबत एक कार्यक्रम करण्याचा योग आला होता ज्यात माझ्या संस्थेच्या कलाकारांची चार कोळीनृत्ये सादर झाली होती. त्यावेळी उमपदांसारख्या महान कलाकाराची कला जवळून बघता आली होती.
याशिवाय वेसावकर आणि मंडळी यांची मी हाय कोळी, एकविरा आई तू डोंगरावरी, पारू गो पारू वेसावची पारू अशी अनेक एकापेक्षा एक सरस आणि वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक कोळी गीते आहेत जी आपल्याला कोळी नृत्याकरीता खुणावत असतात आणि याची प्रचिती आपल्याला कोणत्याही लग्नसमारंभात अथवा हळदी समारंभात येते. नृत्य येत असू दे वा नसू दे या कोळीगीतांवर आत्मविश्वासाने ताल धरून नाचताना अनेकजण दिसतात.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही या कोळीनृत्यांनी अनेक काळ गाजविले आहेत. कशी झोकात चालली कोळ्याची पोर, ही पोळी साजूक तुपातली, गळ्यान साखळी सोन्याची, बॉबी चित्रपटातले झुठ बोले कौंआ काटें आणि सगळ्यात लोकप्रियतेचा शिखर गाठलेले सैलाब चित्रपटातले माधुरी दीक्षितचे हमको आज कल है इंतजार हे कोळी गीत. माझ्या आतापर्यंतच्या नृत्यप्रवासात अगणित वेळा कोळीनृत्ये बसवली गेली आहेत आणि सादरही केली आहेत. मला आठवतंय एक कार्यक्रम आम्ही तीस मिनिटांचा फक्त कोळी नृत्यांचा केला होता. तो ही नॉनस्टॉप आणि त्या कार्यक्रमाला समोर बसलेल्या प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.
लता मंगेशकर आणि हेमंतकुमार यांनी गायलेले मी डोलकर दर्याचा राजा या गीतावरसुद्धा असंख्य वेळा नृत्य करण्याचा योग आलाय. आयबापाची लाडाची लेक मी लारी या ओळीतील लतादीदींचा तो सूरीला आवाज आहाहाः काय वर्णन करावे, या गीताचे केवळ अप्रतिम आणि तशीच आर्तता प्राजक्ता शुक्रेच्या आत्ताच्या रिमिक्स व्हलव्ह रे नाखवा या गीतातसुद्धा अनुभवायला मिळते. काळानुरुप होत असलेले बदल अथवा नवनवीन प्रयोग हे कुठे चांगले कुठे वाईट जरी असले तरी कोळीगीते आणि कोळीनृत्ये ही नेहमीच आपल्या मनावर राज्य करीत असतात.
छोट्यांपासून, मोठ्यांपर्यंत अंगात पटकन सामावून जाणारे असे हे नृत्य आहे जे कधीही कुणीही सहज करू शकते आणि म्हणूनच माझ्या नृत्यवर्गात या नृत्याला पहिली पसंती असते.