एकनाथ महाराजांचे हे पद सर्वज्ञात आहे. जोगवा म्हणजे देवीच्या नावाने कोरडी भिक्षा मागून तेवढेच अन्न शिजवून उदरनिर्वाह करणे. देवीभक्तांचा एक स्तर जन्मभर जोगवा मागून जगत आहे. जोगवा मागणारी जोगतीण म्हणजे देवीला समर्पित केलेली स्त्री. कायद्याने बंदी असूनही समाजातील शेकडो स्त्रिया आजही देवीला वाहिल्या जातात. हातात परडी म्हणजेच बांबूची टोपली, भंडारा, कुंकू आणि कवड्यांची माळ घेऊन जोगवा मागून जगणे हा या जोगतिणिंचा धर्म मानला जातो. मराठी लोकधर्मात जोगवा हा एक उपासना प्रकार म्हणून रुढ असला तरी सध्याच्या काळात समाजाने या उपासना प्रकाराला लोकनृत्य म्हणून नामाभिधान दिले आहे.
मला कळायला लागलेल्या वयापासून मी जोगवा हे नृत्य पाहत आले आहे. त्यावेळी परळ, लालबाग या परिसरात अनेक नृत्यसंस्था होत्या ज्या महाराष्ट्राच्या लोककलेवर आधारीत नृत्यांचा कार्यक्रम करत असत. त्या कार्यक्रमांमध्ये हे जोगवा नृत्य हमखास बघायला मिळत असे. या नृत्यात विशेष करून जोगवा या उपासना प्रकारात असलेले सर्व प्रकार नृत्याच्या स्टेप्समध्ये गुंफलेले असतात. जसे पदर घेऊन जोगवा मागणे, हातात परडी घेऊन रंगमंचावर वावरणे याशिवाय देवीची सर्व रुपे दाखवणे, दैत्यांचा संहार आणि सर्वागत शेवटी केसांचा आंबाडा सोडून मान गरगरा फिरवून अंगात आल्याचा अभिनय करणे. काही वेळा ही नृत्ये अतिशय प्रभावीपणे बसवलेली असतात. या देवीच्या सात्विक भावांबरोबरच रौद्र अवतारांचाही समावेश असल्यामुळे अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो.
नऊवारीच्या पोशाखात हा नृत्यप्रकार केला जातो आणि त्या साडीचा रंग विशेष करून हिरवा किंवा लाल असतो. कपाळावर मळवट भरलेले असते तर गळ्यात कवड्यांची माळ असते. हा नृत्यप्रकार मुलेसुद्धा सादर करतात. ज्यात ते हिरव्या रंगाची साडी नेसून संपूर्ण पेहराव हा मुलींसारखा करतात. जोगवा या मराठी चित्रपटातील लल्लाटी भंडार हे गीत या जोगवा नृत्यप्रकारासाठी गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड गाजले आहे आणि या गीतावर मुलीं इतकीच मुलांचीसुद्धा नृत्य करण्याची संख्या जास्त आहे.
महाराष्ट्रातील लोककलेत जोगवा प्रमाणे गोंधळ या लोककलेचे स्थानसुद्धा महत्त्वाचे आहे. गोंधळी ही देवीच्या भक्तांची भटकी जात आहे. हे गोंधळीसुद्धा देवीचे उपासक असून ते गोंधळ या विधिनाट्याद्वारे मंगलकार्याची सांगता करतात. या परंपरागत लोककलेचेसुद्धा रंगमंचावर सादरीकरण करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. साधारण सहा ते आठ जणांचा समूह हे नृत्य करताना दिसतो. यात प्रामुख्याने देवीची स्तुतीगीते असून तुणतुणे, संबळ आणि डिमडी ही वाद्ये वापरली जातात. त्यांच्या पोशाखात झब्बा किंवा पायघोळ अंगरखा, धोतर किंवा पायजमा, डोक्यावर मावळा टोपी आणि कमरेला शेला या गोष्टींचा समावेश असतो. गळ्यात कवड्यांची माळ आणि कपाळावर हळदीकुंकवाचा मळवट असतो. आई भवानी तुझ्या कृपेने, आई अंबाबाई उदो, उदे गं अंबे उदे अशा सुंदर रचना असलेली अनेक गीते आहेत ज्यावर ही नृत्यकला प्रभावीपणे सादर करता येते. म्हणून अनेक शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या आवडीच्या आणि प्रथम पसंतीच्या अशा जोगवा आणि गोंधळ या दोन लोककला संपूर्ण महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहेत.