Monday, 29 March 2021

माझ्या आठवणीतील होळी


 होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत सगळ्यांनाच खूप प्रिय असा आहे. नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. विविध रंगांनी नटलेला हा सण साजरा करण्याचे प्रकार सुद्धा विविधरंगी आणि विविधढंगी असतात. होळी आणि रंगपंचमी या दोन दिवसात प्रथा आणि परंपरेनुसार होळी मातेच्या साग्रसंगीत पूजेबरोबरच अनेक गोष्टींची आणि मजेची लयलूट असते. परंपरा, पद्धती या जरी वेगवेगळ्या असल्या तरी एका गोष्टीत सगळीकडे साम्य असते ती म्हणजे धम्माल, मज्जा, मस्ती.

लहानपणी आमच्या परळला होळीच्या आयोजनाची दोन महिने आधीपासूनच तयारी असायची. समवयस्क मुलामुलींचा होळीच्या सणाची मज्जा घेतली आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, सर्वांनी एकत्र येऊन त्याचा आस्वाद घ्यायचा आणि मग रात्रभर साखळीवाणी, वीष-अमृत अथवा गाण्याच्या भेंड्या खेळत होळीच जागरण करायचे. दुसऱ्या दिवशी सकाळपासून रंगपंचमी खेळण्यासाठी आमची सगळी टोळी तयार असायची. होळीच्या त्या रंगीबेरंगी आठवणी अजूनही तशाच ताज्यातवान्या आहेत.

मी लहानपणापासूनच नृत्यकलेशी जोडले गेल्यामुळे होळीच्या दिवशी बॉलिवूडमध्ये गाजलेल्या होळीच्या गाण्यांवर नृत्य करणे स्वाभाविकच होते. रेडिओवर त्या दिवशी सगळी होळीची गाणी लागायची. मग काय त्या गाण्यांवर मनसोक्त थिरकायचं आणि रंगपंचमीची मजा लुटायची.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत होळी सणावर असंख्य गाणी रचली गेली आहेत. आपल्या जुन्या-नवीन कलाकारांनी रुपेरी पडद्यावर होळीच्या रंगांचा मनमुराद आनंद लुटला आहे. आज ना छोंडेंगें बस हमजोली, होली के दिन दिल खिल जाते है, अरे जारे हट नटखट, मलदे गुलाल मोहे, होळीचं सोंग घेऊन, नेसते पैठणी चोळी गं, खेळताना रंग बाई होळीचा, आमचे दाराशी हाय शिमगा इत्यादी अशी शेकडो नृत्यमग गीते आपल्याला चित्रपटसृष्टीने दिली आहेत. त्यांचे चित्रीकरण बघितले की नेहमी वाटायचे की आपण का नाही अशी रंगपंचमी खेळत.

त्याकाळी राजकपूर यांच्या घराण्याच्या होळीबद्दल खूप आकर्षण असायचे. संध्याकाळी टीव्हीवरील बातम्यांमध्ये हमखास त्यांच्या होळीचे चित्रीकरण दाखवायचे. पाण्याने भरलेला हौद, ढोल वाजवणारी मंडळी आणि त्यावर ताल धरून नाचणारी कलाकार मंडळी. हे सर्व बघायला खूप मज्जा यायची. अलीकडच्या काळात अशा पद्धतीच्या होळी उत्सवाचे आयोजन बरेच कलाकार करताना दिसतात. मराठी चित्रपटसृष्टीतही गेली कित्येक वर्षे असे आयोजन होताना दिसत आहे. इतकंच काय तर सोसायट्यांमध्ये डीजे वैगेरे लावून हा उत्सव एकदम जोशात साजरा केला जातो.

कोकणात होळीला पालखी निघते जी वाजत गाजत जवळजवळ महिनाभर गावात फिरत असते. या सणाकरीता मुंबईहून कोकणात खास गावी जाणाऱ्यांची संख्याही भलीमोठी आहे. गोकुळातल्या राधा-कृष्णावरील होळीच्या गाण्यांचे अनेक दाखले आपल्याला बघायला मिळतात. अशा या रंगीबेरंगी रंगांच्या सणाचे विलोभनीय दर्शन आपल्याला सगळीकडे बघायला मिळते.

भविष्यात लहानपणापासून आकर्षण ठरलेल्या चित्रपटातील होळीप्रमाणे होळी साजरी करण्याचा मानस आहे. नृत्यवर्गातील लहान-मोठ्या सर्व विद्यार्थ्यांसमवेत रंगांची उधळण पिचकाऱ्या, ओढण्या, ढोल, ताशे, डफ, पाण्याचा हौद, जेजे चित्रपटात पाहिलं गेलंय तेते सगळं अनुभवायची खूप इच्छा आहे. अशी ही टोटल फिल्मी होळी साजरी करून त्यांचे अंतरंग मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवायचे आहेत.  

-    कविता कोळी  

Monday, 12 October 2020

आईचा जोगवा मागेन (लोकनृत्य जोगवा /गोंधळ)

 

एकनाथ महाराजांचे हे पद सर्वज्ञात आहे. जोगवा म्हणजे देवीच्या नावाने कोरडी भिक्षा मागून तेवढेच अन्न शिजवून उदरनिर्वाह करणे. देवीभक्तांचा एक स्तर जन्मभर जोगवा मागून जगत आहे. जोगवा मागणारी जोगतीण म्हणजे देवीला समर्पित केलेली स्त्री. कायद्याने बंदी असूनही समाजातील शेकडो स्त्रिया आजही देवीला वाहिल्या जातात. हातात परडी म्हणजेच बांबूची टोपली, भंडारा, कुंकू आणि कवड्यांची माळ घेऊन जोगवा मागून जगणे हा या जोगतिणिंचा धर्म मानला जातो. मराठी लोकधर्मात जोगवा हा एक उपासना प्रकार म्हणून रुढ असला तरी सध्याच्या काळात समाजाने या उपासना प्रकाराला लोकनृत्य म्हणून नामाभिधान दिले आहे.

मला कळायला लागलेल्या वयापासून मी जोगवा हे नृत्य पाहत आले आहे. त्यावेळी परळ, लालबाग या परिसरात अनेक नृत्यसंस्था होत्या ज्या महाराष्ट्राच्या लोककलेवर आधारीत नृत्यांचा कार्यक्रम करत असत. त्या कार्यक्रमांमध्ये हे जोगवा नृत्य हमखास बघायला मिळत असे. या नृत्यात विशेष करून जोगवा या उपासना प्रकारात असलेले सर्व प्रकार नृत्याच्या स्टेप्समध्ये गुंफलेले असतात. जसे पदर घेऊन जोगवा मागणे, हातात परडी घेऊन रंगमंचावर वावरणे याशिवाय देवीची सर्व रुपे दाखवणे, दैत्यांचा संहार आणि सर्वागत शेवटी केसांचा आंबाडा सोडून मान गरगरा फिरवून अंगात आल्याचा अभिनय करणे. काही वेळा ही नृत्ये अतिशय प्रभावीपणे बसवलेली असतात. या देवीच्या सात्विक भावांबरोबरच रौद्र अवतारांचाही समावेश असल्यामुळे अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो.

नऊवारीच्या पोशाखात हा नृत्यप्रकार केला जातो आणि त्या साडीचा रंग विशेष करून हिरवा किंवा लाल असतो. कपाळावर मळवट भरलेले असते तर गळ्यात कवड्यांची माळ असते. हा नृत्यप्रकार मुलेसुद्धा सादर करतात. ज्यात ते हिरव्या रंगाची साडी नेसून संपूर्ण पेहराव हा मुलींसारखा करतात. जोगवा या मराठी चित्रपटातील लल्लाटी भंडार हे गीत या जोगवा नृत्यप्रकारासाठी गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड गाजले आहे आणि या गीतावर मुलीं इतकीच मुलांचीसुद्धा नृत्य करण्याची संख्या जास्त आहे.

महाराष्ट्रातील लोककलेत जोगवा प्रमाणे गोंधळ या लोककलेचे स्थानसुद्धा महत्त्वाचे आहे. गोंधळी ही देवीच्या भक्तांची भटकी जात आहे. हे गोंधळीसुद्धा देवीचे उपासक असून ते गोंधळ या विधिनाट्याद्वारे मंगलकार्याची सांगता करतात. या परंपरागत लोककलेचेसुद्धा रंगमंचावर सादरीकरण करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. साधारण सहा ते आठ जणांचा समूह हे नृत्य करताना दिसतो. यात प्रामुख्याने देवीची स्तुतीगीते असून तुणतुणे, संबळ आणि डिमडी ही वाद्ये वापरली जातात. त्यांच्या पोशाखात झब्बा किंवा पायघोळ अंगरखा, धोतर किंवा पायजमा, डोक्यावर मावळा टोपी आणि कमरेला शेला या गोष्टींचा समावेश असतो. गळ्यात कवड्यांची माळ आणि कपाळावर हळदीकुंकवाचा मळवट असतो. आई भवानी तुझ्या कृपेने, आई अंबाबाई उदो, उदे गं अंबे उदे अशा सुंदर रचना असलेली अनेक गीते आहेत ज्यावर ही नृत्यकला प्रभावीपणे सादर करता येते. म्हणून अनेक शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या आवडीच्या आणि प्रथम पसंतीच्या अशा जोगवा आणि गोंधळ या दोन लोककला संपूर्ण महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहेत. 


Monday, 5 October 2020

येळकोट येळकोट जयमल्हार (लोकनृत्य – वाघ्यामुरळी)

 यळकोट यळकोट जयमल्हार... हे शब्द कानी पडताच ताबडतोब आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते जेजुरीच्या खंडेरायाचे रुप आणि मग त्यामागोमाग मन हलकेच जेजुरीच्या वातावरणात जाऊन रमायला लागते. आमचे कुलदैवत असल्यामुळे लहानपणी जेजुरीला नेहमी जाणे होत असे. गडाच्या त्या अगणित पायऱ्या चढून खंडेरायाचे दर्शन घेण्यात एक वेगळे दिव्य अनुभवायला मिळायचे. जेजुरीचे सगळे वातावरण एकदम प्रफुल्लित आणि भक्तीभावाने भारलेले असते आणि या सगळ्या वातावरणात सर्वात जास्त मोहित करतो तो भंडाऱ्याचा सर्वत्र दरवळलेला सुगंध.

गडाच्या पायऱ्या चढताना बऱ्याच ठिकाणी आपल्या गोंधळी आणि वाघ्यामुरळी हे देवाचे उपासक नजरेस पडतात. खंडोबाचे संकिर्तन करणे, हीच त्यांची उपासना असते. हे वाघ्या-मुरळी बनण्यासाठी विशिष्ट असा दिक्षाविधी असतो तो झाल्याशिवाय कुणीही वाघ्या-मुरळी होत नाही. वाघ्या म्हणजे पुरुष आणि मुरळी म्हणजे स्त्री. वाघ्याच्या हातात दिमडी हे वाद्य असते तर मुरळीच्या हातात छोटी घंटी हे वाद्य असते. वाघ्यांचे जागरणाचे कार्यक्रम गोंधळाप्रमाणे असतात यात रात्रभर एक वाघ्या तुणतुणे वाजवितो, दुसरा खंजिरी वाजवून गाणे म्हणतो आणि मुरळी एका हाताने घंटी वाजवत नृत्य करीत असते.

जेजुरीला पाहिलेल्या या वाघ्यामुरळीनंतर प्रत्यक्षात भेटल्या त्या नृत्यरुपाने म्हणजेच वाघ्यामुरळी या नृत्याने आणि हे नृत्य म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येणारे एकमेव नाव म्हणजे शाहीर साबलळे. त्यांच्या जेजुरीच्या खंडेराया या गीताने अख्या महाराष्ट्राला वेड लावले. मी या गाण्यावर शाळेत असल्यापासून नाचतेय ते आतापर्यंत. वेगवेगळ्या वयोगटावर हे नृत्य किती वेळा बसवले असेल याचा हिशोबच नाही आणि त्या प्रत्येक वेळी ते नव्याने अनुभवले आहे. इतके प्रतिभावान असे हे गीत आहे यासाठी माननीय शाहीर साबळे यांना मानाचा मुजरा.

त्यानंतरसुद्धा खंडोबाची बरीच गाणी आली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली हे छगन चौगुले यांचे गीतसुद्धा गेल्या काही वर्षांत खूप गाजले. देवदत्त साबळे यांनी गायलेले मल्हारी देवा मल्हारी, जय मल्हार या मालिकेतील बानू बया बानू बया इत्यादी अशी अनेक गाणी वाघ्या-मुरळी या नृत्यासाठी विचारात घेण्यासारखी आहेत.

महाराष्ट्राच्या लोकनृत्य परंपरेतील हा अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय आणि गाजलेला नृत्यप्रकार आहे. जो आपल्याला शाळा कॉलेजमध्ये हमखास बघायला मिळतो. नृत्यामध्ये हे वाघ्या बाराबंदी, पायजमा, मावळाटोपी, कमरेला शेला, खांद्यावर तिरकी कवड्या लावलेली भंडाऱ्याची पिशवी आणि गळ्यात कवड्यांची माळ तर हातात दिमडी हे वाद्य या पेहेरावात दिसतात आणि मुरळी या नऊवारीच्या संपूर्ण वेषात कपाळाला भंडारा लावलेल्या असतात. अतिशय उर्जेचे आणि तितकेच भावनाप्रधान आणि हावभावपूर्ण असे हे नृत्य असून यात वाघ्या आणि मुरळी खंडोबाचे देवाचे कौतुक त्यांची रुपे तसेच जेजुरी गडाचे वैशिष्ट्य नृत्याच्या स्टेप्समधून दाखवतात. या सुंदर अशा लोकनृत्याचा वारसा गेली कित्येक वर्षे आपण नृत्यातून जपतोय आणि यापुढेही जपत राहू यात शंकाच नाही. 


Monday, 28 September 2020

पहिली पसंती कोळीनृत्याला

 महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकनृत्यांपैकी एक असलेले हे कोळीनृत्य मुलामुलींच्या समूहात केले जाते. तर काही नृत्ये ही नुसत्या मुलींची अथवा स्त्रियांचीसुद्धा असतात. या नृत्यात व्हलव्ह हलवून बोट चालवणे, जाळे फेकून मासे पकडणे, टोपलीत मासे वेचणे इत्यादी अशा त्यांच्या व्यवसायाशी निगडीत स्टेप्स बघायला मिळतात. याशिवाय ठरलेल्या काही पारंपरिक स्टेप्स असतात ज्या हमखास आपल्याला बघायला मिळतातच किंबहूना त्याशिवाय कोळीनृत्य पूर्णच होऊ शकत नाही. तसंच मुलामुलींची छेडछाडसुद्धा खूप आकर्षक पद्धतीने या नृत्यात दाखवली जाते.

काही नृत्यात आपल्याला या जमातीचे वैशिष्ट्यपूर्ण लग्न आणि वरातसुद्धा बघायला मिळतात आणि मग लगेच आपल्या तोंडी या गो दांड्यावरनं नवरा कुणाचा येतो हे कोळीगीत आपसुकच येतं. आपल्या पिढीतील जवळ जवळ सर्वांनाच त्यावेळच्या कोळीगीतांनी वेड लावले होते. ती सर्व कोळीगीते एक तर तोंडपाठ असायची किंवा माहीत तरी असायची. वेसावकर आणि मंडळी महाराष्ट्राची लोकधारा या कॅसेट तर तुफान चालायच्या तेव्हा.

शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाने कोळी गीतांना आणि कोळी नृत्याला घराघरात पोहोचवले होते. शाहीर कृष्णराव साबळे, शाहीर विठ्ठल उमप, शाहिर दामोदर विटावकर यांनी कोळीगीतांमध्ये आणि लोकगीतांमध्ये दिलेल्या योगदानाने आजच्या पिढ्यानपिढ्या समृद्ध झाल्या आहेत. शाहिर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारामधील जवळ जवळ सर्वच गीते, तर शाहीर विठ्ठल उमप यांची ये दादा अवार ये तसंच आज कोळीवाड्यात येईल वरात ही प्रसिद्ध कोळी गीते याशिवाय शाहीर दामोदर विटावकर यांचे गौरी गणपतीचे सणाला हे गीत अशी अनेक उदाहरणे आहेत. खूप वर्षे आधी शाहीर विठ्ठल उमप यांच्यासोबत एक कार्यक्रम करण्याचा योग आला होता ज्यात माझ्या संस्थेच्या कलाकारांची चार कोळीनृत्ये सादर झाली होती. त्यावेळी उमपदांसारख्या महान कलाकाराची कला जवळून बघता आली होती.

याशिवाय वेसावकर आणि मंडळी यांची मी हाय कोळी, एकविरा आई तू डोंगरावरी, पारू गो पारू वेसावची पारू अशी अनेक एकापेक्षा एक सरस आणि वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक कोळी गीते आहेत जी आपल्याला कोळी नृत्याकरीता खुणावत असतात आणि याची प्रचिती आपल्याला कोणत्याही लग्नसमारंभात अथवा हळदी समारंभात येते. नृत्य येत असू दे वा नसू दे या कोळीगीतांवर आत्मविश्वासाने ताल धरून नाचताना अनेकजण दिसतात.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही या कोळीनृत्यांनी अनेक काळ गाजविले आहेत. कशी झोकात चालली कोळ्याची पोर, ही पोळी साजूक तुपातली, गळ्यान साखळी सोन्याची, बॉबी चित्रपटातले झुठ बोले कौंआ काटें आणि सगळ्यात लोकप्रियतेचा शिखर गाठलेले सैलाब चित्रपटातले माधुरी दीक्षितचे हमको आज कल है इंतजार हे कोळी गीत. माझ्या आतापर्यंतच्या नृत्यप्रवासात अगणित वेळा कोळीनृत्ये बसवली गेली आहेत आणि सादरही केली आहेत. मला आठवतंय एक कार्यक्रम आम्ही तीस मिनिटांचा फक्त कोळी नृत्यांचा केला होता. तो ही नॉनस्टॉप आणि त्या कार्यक्रमाला समोर बसलेल्या प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.

लता मंगेशकर आणि हेमंतकुमार यांनी गायलेले मी डोलकर दर्याचा राजा या गीतावरसुद्धा असंख्य वेळा नृत्य करण्याचा योग आलाय. आयबापाची लाडाची लेक मी लारी या ओळीतील लतादीदींचा तो सूरीला आवाज आहाहाः काय वर्णन करावे, या गीताचे केवळ अप्रतिम आणि तशीच आर्तता प्राजक्ता शुक्रेच्या आत्ताच्या रिमिक्स व्हलव्ह रे नाखवा या गीतातसुद्धा अनुभवायला मिळते. काळानुरुप होत असलेले बदल अथवा नवनवीन प्रयोग हे कुठे चांगले कुठे वाईट जरी असले तरी कोळीगीते आणि कोळीनृत्ये ही नेहमीच आपल्या मनावर राज्य करीत असतात.

छोट्यांपासून, मोठ्यांपर्यंत अंगात पटकन सामावून जाणारे असे हे नृत्य आहे जे कधीही कुणीही सहज करू शकते आणि म्हणूनच माझ्या नृत्यवर्गात या नृत्याला पहिली पसंती असते. 

Monday, 21 September 2020

आपलेसे वाटणारे कोळी नृत्य (भाग १)



 शाळेचे गॅदरिंग असो, सोसायटीचे फंक्शन असो अथवा लग्नकार्यात नाचण्याची संधी असो प्रत्येकाला आपलेसे वाटणारे आणि सहज ठेका धरुन नाचायला येणारे नृत्य म्हणजे कोळी नृत्य. बच्चे कंपनीपासून थोरामोठ्यांपर्यंत कोळीनृत्याला हमखास आणि विशेष पसंती नेहमीच मिळत असते. मला आठवतं शाळेच्या गॅदरिंगमध्ये चित्रपटनृत्यांना परवानगी नसल्यामुळे एक वर्ष आड बहुधा आमची पसंती आणि पावले कोळी नृत्यांवरच थिरकायची – सर्वात सहज आणि सोपं आणि तितकंच आकर्षक आणि मनाला भिडणारं हे नृत्य.

त्या काळात भाड्याने ड्रेस आणून नृत्य करणं कुणालाही परवडायचं नाही. त्यामुळे आईची एखादी काठापदराची सहावारी साडी गुडघ्यापर्यंत नेसायची, तिच्याच ब्लाऊजला आतून शिलाई घालून तो जेमतेम आपल्या मापाचा करण्याचा आटोकाट प्रयत्न जो बहुतांशी फसलेलाच असायचा आणि त्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी असल्यास उत्तमच नसेल तर कोणत्याही रंगाची ओढणी दोन खांद्यांवर क्रॉस करून टाकली की झालो आम्ही कोळी नृत्यासाठी तयार आणि हे नृत्य अजून बहारदार बनवायला व्हलव्ह आणि टोपल्यांची जोड दिली तर बहारच यायचा. पुठ्याला बदामाच्या आकारात कापून त्याला रंग मारून त्या पुठ्याला एका काठीला खिळे मारून ठोकले की व्हलव्ह तयार होत असे आणि भाजीची टोपली काय अगदी सहज कुणाकडेही मिळून जायची. ज्या वर्गाने ही मेहनत घेतलेली असायची त्यांचे कोळी नृत्य बघायला अजून मजा येत असे.

कोळीनृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारतालाच वेड नाही लावलं तर याची ख्याती पार सातासमुद्रापलिकडेही पोहोचली आहे. जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या कोळी नृत्याचे मूळ म्हणजे कोळी समाज. हा कोळी समाज प्रामुख्याने मासेमारी करत असल्याने समुद्रकिनाऱ्यावर त्यांची वस्ती असते. हा समाज देवांवर जास्त विश्वास ठेवतो. श्री एकविरा देवी लोणावळा आणि जेजुरीचा खंडोबा हे त्यांचे दैवत आहे. दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी होडी किंवा बोटीची पूजा करून ते समुद्रात व्यवसायासाठी उतरतात. सोन्याचा मुलामा दिल्यासारखा नारळ वाजतगाजत समुद्राला अर्पण करतात. या दिवशी कोळीवाड्यात मोठ्या उत्सावाचे स्वरुप असते. नारळीपौर्णिमेप्रमाणे होळी या सणाचंही विशेष महत्त्व असते. तसेच या समाजात हळदी आणि लग्नसमारंभही मोठ्या उत्साहात आणि आनंदाज साजरे होत असतात. हे लोक मासळीला म्हावरं म्हणून संबोधतात.

कोळी लोकांचे पारंपरिक परीधान करावयाचे पोशाख म्हणजे स्त्रियांसाठी लुगडे (बारा वार नऊवारी), दोन्ही खांद्यावर मोठ्या फुलांची डिझाईन असलेली ओढणी (फडकी) तर पुरुष कमरेला रुमाल (लुंगी) आणि शर्ट आणि डोक्यावर कानटोपरं म्हणजेच टोपी असा पेहराव असतो. कोळी स्त्रियांना दागिन्यांची खूप आवड असते. अशा या सर्वांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कोळी नृत्याचा त्यात वापरल्या जाणाऱ्या एकापेक्षा एक सरस आणि वैशिष्ट्यपूर्ण गीतांचा आणि संगीतांचा तसंच त्यामध्ये काळानुरुप होत गेलेल्या बदलांचा आपण पुढील भागात आढावा घेणार आहोत. 

Monday, 14 September 2020

लोकनृत्यांचा अनमोल खजिना


लहान वयातच माझे नृत्यकलेवर प्रेम जडले, या कलेविषयी ओढ निर्माण झाली आणि मग ही नृत्यकला वेगवेगळ्या शैलींमधून अंगी बाणवायचा प्रयत्न करू लागले जो आजही सुरु आहे. शाळेत असताना गॅदरिंगमध्ये कोणत्याही चित्रपट गीतांवर नृत्य करायला परवानगी नसायची. त्यामुळे कुठले ना कुठले लोकनृत्य बसवण्याकडे आमचा कल असायचा. त्यामुळे कोळीनृत्य, शेतकरी नृत्य, भांगडा, आदिवासी ठाकर नृत्य, वाघ्यामुरळी इत्यादी अनेक नृत्यांचा परिचय झाला आणि या लोकनृत्यांवर, त्यांच्या संगीतावर प्रेम जडू लागले. अतिशय समृद्ध आणि प्रचंड उर्जा असलेली अशी लोकनृत्यांची परंपरा आपल्याला लाभली आहे

लोकनृत्यांच्या प्रेमापोटी इयत्ता आठवीत असताना मी कलादर्शन या संस्थेत लोकनृत्य शिकण्यासाठी आणि सादरीकरण करण्यासाठी प्रवेश घेतला. दोन वर्षांत अनेकविध भारतीय लोकनृत्ये शिकायला तर मिळालीच परंतू वेगवेगळ्या कार्यक्रमांतर्गत पाहायलासुद्धा मिळाली. लाईव्ह संगीतावर नृत्य करायची मजा काही वेगळीच असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला, असं म्हणतात ना की मूल लहान असतानाच त्याच्यावर योग्य ते संस्कार होऊ शकतात. नेमकं हेच माझ्या बाबतीत झालं. अगदी शालेय जीवनातच ही लोकनृत्ये जवळून पाहाता आली, शिकता आली आणि त्यामुळे ही लोककला अंगाअंगात भिनली.

आपल्या देशाला लोकनृत्यांची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परंपरा लाभलेली आहे. संपूर्ण जगात भारतीय शास्त्रीय नृत्याला जितकं महत्व आहे तितकाच भारतीय लोकनृत्यांनाही जागतिक दर्जा मिळालेला आहे. जनसामान्यांमध्ये प्रचलित असलेली परंपरागत नृत्यप्रकार म्हणजेच लोकनृत्य होय. ही नृत्ये साधारणपणे सामुहिक स्वरुपात सादर होतात आणि त्यांना तालवाद्यांची आणि लोकसंगीताची साथ असते. प्रत्येक राज्यागणिक या नृत्यकलेचे स्वरुप, संगीत, नृत्यरचना, वेशभूषा ही त्या त्या राज्याच्या परंपरेतून विकसित झालेली आहे. भारतातील आदिवासी जमातीत आणि जनजीवनात तर लोकनृत्यांची प्रदीर्घ परंपरा आढळते. भारतीय लोकनृत्यांचे असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यात आपण जितके खोलात शिरू तितका या नृत्यांचा बहुमोल खजिना आपल्याला सापडत जातो.

भारतीय लोकनृत्ये ही राष्ट्रीय संस्कृतीचा अनमोल ठेवा असून भारताच्या प्रत्येक प्रदेशात तिथल्या प्रदेशाची वैशिष्ट्ये दाखवणारी विविध नृत्ये आहेत. इथे काही उदाहरणे आपल्याला होता येतील. आसाममधील बिहू तसंच नागा जमातीचे नागा-नृत्य, बिहारमधील आदीवासी संथाळ नृत्य, पंजाबमधील भांगडा नृत्य तर कायम आकर्षणाचा भाग ठरले आहेत. भारताच्या दाक्षिणात्य प्रदेशातील करकट्टम, कुमी, कोलाकट्टम ही नृत्ये, राजस्थानमधील घुमर, कालबेलिया, गुजरातमधील गरबा दांडिया इत्यादी अशी अनेक वैविध्यपूर्ण लोकनृत्ये आहेत.

भारतातील या असंख्य वेगवेगळ्या लोकनृत्यांइतकीच विविधता आपल्या महाराष्ट्रातील लोकनृत्यांतही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीला तर लोकनृत्यांचा खूप मोठा वारसा आहे. गौंड, भिल्ल, कातकरी, तारपा, ठाकर, कोरकू, टाकळा अशी अनेक लोकनृत्ये निरनिराळ्या भागत रुढ आहेत. विदर्भातील दंडार नृत्य, महाराष्ट्राच्या सागर किनारी भागातील कोळी नृत्ये, त्याचप्रमाणे धनगर नृत्य, शेतकरी नृत्य, टिपरी, जाखडी नृत्य, गोफ नृत्य, कोकणातील बाल्या नृत्य, जोगवा, गोंधळ, वाघ्यामुरळी, गौरीगणपतीत खेळले जाणारे झिम्मा, गोफ, टिपऱ्या हे नृत्यप्रकार तसंच महाराष्ट्राच्या तमाशा या लोकनाट्यप्रकारातील लावणी हा अत्यंत लोकप्रिय नृत्यप्रकार हे सर्व नृत्यप्रकार लोकनृत्य या संकल्पनेखालीच मोडतात आणि याच विविध लोकनृत्यप्रकारांची वैशिष्ट्ये, महत्त्व यांचा वेध आपण पुढील भागांतून घेणार आहोत.

Monday, 7 September 2020

घुंगरु एक दागिना


 संपूर्ण जगात आपल्या भारतीय पारंपरिक नृत्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. भारतीय इतिहासात तर नृत्यांची एक अनोखी भूमिका आहे. या सर्व नृत्यशैलींमध्ये म्हणजे भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपूडी, मणिपुरी, कथकली इतकंच काय तर भारतीय लोकनृत्यांतसुद्धा घुंगरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नृत्यशैली कोणतीही असो ती घुंगरुंशिवाय परिपूर्ण नाहीच. ही नृत्यकला शिकणाऱ्या प्रत्येक नृत्यांगनेसाठी तो महत्त्वाचा दागिना आहे.

छोट्या सुपारीचा आकार असलेले हे घुंगरु पितळेचे असून त्याच्या आत एक लोखंडी खडा असतो. ज्याच्या हालचालींमुळे घुंगरुंचा वाजण्याचा आवाज येतो. हे घुंगरु प्रत्येक नृत्यशैलीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारात बांधण्याची प्रथा आहे. जसे भरतनाट्यममध्ये हे चामड्याच्या पट्ट्यावर शिवलेले असतात तर कथ्थक, लावणी अथवा इतर लोकनृत्यांसाठी हे पांढऱ्या रंगाच्या दोरीमध्ये गुंफलेले असतात. कथ्थकमध्ये वयानुसार घुंगरु दिले जातात. अगदी लहान वयात शिकायला सुरुवात केलेल्या विद्यार्थ्यांसठी याची संख्या दहापासून सुरु होते मग ती पंचवीस, पन्नास, शंभर करता करता दिडशे घुंगरुंपर्यंत पोहोचते. हे बांधताना पायाला आधी नीकॅप लावायला लागते आणि मग त्यावर एकामागोमाग वेटोळ्याच्या रुपात बांधावे लागतात. नृत्याची आवड असलेल्या प्रत्येकाला या घुंगरुंचे प्रचंड आकर्षण असते. मग ती व्यक्ती कोणत्याही वयोगटाची असो तिला आपण कधी एकदा घुंगरू घालून नाचतोय असे होऊन जाते.

प्रत्येक नृत्यात या घुंगरुचे महत्त्व खूप मोठे आहे. कथ्थक नृत्यात महत्त्वाचा असलेल्या पदंन्यास करण्यासाठी तर याचे विशेष महत्त्व आहे. हा पदंन्यास जितका प्रगल्भ तितका या घुंगरुंचा येणारा आवाज कर्णमधूर वाटतो. लोकनृत्यातला पदंन्याससुद्धा या घुंगरुंमुळे अतिशय नेत्रसुखद होतो. विशेषतः आदीवासी तारपा, ठाकर तसंच बाल्या नृत्यात याची विशेष प्रचिती येते.

महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय असलेल्या लोकनृत्य प्रकार लावणी यातसुद्धा या घुंगरुंचा पदंन्यास रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा असतो. नृत्यकलाकाराकरीता घुंगरु हे देवस्थानी असतात. प्रत्येक नृत्याच्या आधी मग ती शैली कुठलीही असो, या घुंगरुंना मनोभावे नमस्कार करून मगच पायात बांधले जातात. नृत्यसादरीकरण अथवा नृत्याचा रियाज झाल्यावर या घुंगरुंची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना व्यवस्थित गुंडाळून कपड्यात बांधून ठेवले जाते. घुंगरु घालून पायात चप्पल न घालणे अथवा घुंगरु घालून शौचालयात न जाणे यासारख्या गोष्टींचे पालन हे त्यांचे पावित्र्य आणि महत्त्व अधोरेखित करतात. अशा या घुंगरुंचे आकर्षण माझ्यासारख्या शेकडो नृत्यांगणांना लहानपणापासून असतेच आणि ते नृत्याच्या अभ्यासाच्या वर्षांगणिक वाढतच जाते.  


माझ्या आठवणीतील होळी

  होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत स...