Friday, 24 April 2020

छबीदार छबी




आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी... मान लचकत आणि मुरडत नृत्य करण्याची वेगळी शैली असलेल्या संध्या यांचे मूळ नाव विजया देशमुख. त्यांना रंगमंच कलाकाराची पार्श्वभूमी आहे. रंगमंचावर काम करता करता मुंबईला त्यांची ओळख व्ही. शांताराम यांच्याशी झाली. १९५१ साली अमरभूपाळी या चित्रपटात व्ही.शांताराम यांनी त्यांना पहिला ब्रेक दिला. त्यांचे संध्या हे नामकरणही व्ही.शांताराम यांनीच केले. १९५६ साली त्यांनी व्ही. शांताराम यांच्याबरोबर विवाह केला. त्यांनी आपल्या सिनेप्रवासात केवळ व्ही.शांताराम यांच्याबरोबरच सिनेमे केलेत. व्ही.शांताराम, राजकमल आणि त्यांचे नाते त्यांनी कायम जोडून ठेवले.
झनक झनक पायल बाजे या चित्रपटासाठी सुरुवातीला वैजयंतीमाला यांना विचारण्यात आले होते. परंतू ती भूमिका संध्या यांच्याच नशिबात होती. संध्या या प्रोफेशनल डान्सर नव्हत्या. पण या सिनेमासाठी त्यांनी नृत्य शिकण्याची तयारी दाखवली. त्यावेळचे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक, महान व्यक्तिमत्त्व गोपीजी कृष्ण यांच्याकडे त्यांनी नृत्यप्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तब्बल अठरा अठरा तास त्या रियाज करीत, त्यांची ही मेहनत झनक झनक पायल बाजेच्या नृत्यांमध्ये दिसून येते. हमे गोकुळवाला कहते हैं या गाण्यातील गोपीजी आणि त्यांचे नृत्य म्हणजे नृत्यकलाकारांना एक पर्वणीच आहे. प्रत्येक लहान, मोठ्या कलाकाराने बघावे असं हे नृत्य आहे. यात कथ्थकमधील धातकधुंगाचे परणजुडी आमद आणि त्यावर बसवलेली राधाकृष्णाची छेडछाड केवळ अप्रतिम.
नृत्यसम्राट नटराज गोपीकृष्ण यांच्या नृत्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या कलाकाराने बोलणे अतिशय चुकीचे होईल. परंतु मी इतकेच म्हणेन नेत्रदीपक, विलोभनीय आणि रोमांचित करणारा नृत्याविष्कार म्हणजे गोपीजी. त्यांच्या अंगाप्रत्यांगातून केवळ नृत्य, नृत्य आणि नृत्यच दिसते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की गुरुवर्य नटराज गोपीकृष्ण यांच्या पटशिष्या माननीय गुरुवर्या डॉ.सौ. मंजिरी श्रीराम देव या माझ्या कथ्थक नृत्याच्या गुरु आहेत. त्यांनी ही कला मला भरभरून दिली आहे.

संध्या यांच्या नवरंग चित्रपटातील नृत्यांनी तर या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. साधारण १९९१ ते ९३ च्या काळात लालबाग, परळ विभागात नृत्यस्पर्धांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आयोजन होत असे. त्यांचे अरे जारे हट नटखट या गाण्यावरील नृत्य हमखास बघायला मिळे. आधा है चंद्रमा या गाण्यावर मी स्वतः डोक्यावर झेपतील तेवढी पुस्तके ठेवून संध्या यांच्या डोक्यावरील, मडक्यांच्या अभिनयाची तंतोतंत कॉपी करायचा प्रयत्न करायचे. त्यांची स्वतःशी अशी नृत्यशैली होती. मान आणि खांदे हलवून थोडेसे शारिरीक झटके देत या नृत्य करित.
पिंजरा चित्रपट त्यातील गाणी,  नृत्य आणि संध्या यांचा अभिनय याबद्दल शब्द कमी पडतील. मला लागली कुणाची हुचकी ही लावणी मी इंटरनॅशनल क्रुझ शोमध्ये कित्येक वर्षे करित होते. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, देरे कान्हा चोळी लुगडी, आहाहा काय सुंदर गीते आहेत ही इथे पुन्हा मी हेच म्हणेन की नुसत्या चेहऱ्यावरील हावभावांनी एखाद्या गाण्याला आपण किती समृद्ध करू शकतो याची ही सुंदर उदाहरणे आहेत.
अशा या संध्या शांताराम त्यांच्याबद्दल जितके बोलू तेव्हढे कमीच आहे. माझ्या आतापर्यंतच्या नृत्यप्रवासात मी त्यांच्यावर चित्रीत गीतांनी आणि नृत्यांनी प्रेरित झाले होते. आणि त्यांचे हेच महत्त्व पुढिल पिढीसही पटवून देण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. 



5 comments:

  1. संध्या शांताराम. मराठी आणि हिंदी चित्रपटातील एक सुप्रसिध्द अभिनेत्री व नृत्यागना.मोजकेच चित्रपट केले संध्याजीनी व तेही शांताराम बापूंचे,आणि सगळेच्या सगळे नृत्यावर आधारीत आणि भव्य यशस्वी.अमर भूपाळी पासून चालू झालेला हा प्रवास झनक झनक पायल बाजे,जल बिन मछली नृत्य बिन बिजली, दो आँखे बारह हाथ,नवरंग मराठीतील पिंजरा,चंदनाची चोळी अंग अंग जाळी असा अविरत चालू होता. त्यांच्या चित्रपटातील नृत्याने सगळ्या नृत्यप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले होते.खासकरुन मराठी चित्रपटातील लावणी व त्यावरील त्यांची केशभूषा,वेगवेगळ्या धाटणीच्या नऊवारी साड्या,त्यांचे अप्रतिम हावभाव हे त्यांच्यानंतर कधीच कोणत्याही मराठी चित्रपटात म्हणावे तसे पाहायला मिळाले नाही.त्यांच्या नृत्यातील लटकणे,मुरडणे,मानेला झटके देणे हे त्यांनाच शोभून दिसे.त्यांचा नवरंग मधील अरे जारे हट नटखट हे होळीवर आधारीत नृत्य मला साकारणयाची संधी मला मिळाली.अशा ह्या नृत्यांगनेचे नवरंग ऊलगडल्याबद्दल धन्यवाद ताई..

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot for the kind words. We are humbled. Your appreciation is really motivating. Keep reading.

      Delete
  2. Good to know some unknown stories about these great actresses through your blog. There is so much to learn from it. Thanks for sharing & Keep writing Kavita.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot for such a valuable feedback. We are honored with the such appreciation. Keep reading and motivate us.

      Delete
  3. खूप छान माहिती. "आली ठुमकत नार लचकत मान मुरडत" या गाण्याचा प्रकार कोणता आहे हे कळू शकेल का?

    ReplyDelete

माझ्या आठवणीतील होळी

  होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत स...