Monday, 25 May 2020

बॉलिवूडची मस्तानी दिपिका

 बॉलिवूड जगतात या मस्तानीने आपली किमया अशी काय केली आहे की तिने उच्च अभिनेत्रींमध्ये आपले स्थान फारच कमी कालावधीत निश्चित केले. प्रचंड आत्मविश्वास हा तिने साकारलेल्या पात्रांचा आत्मा तर झालाच पण त्याशिवाय तिच्या नृत्याला लार्जर दॅन लाईफ करण्यासाठीही उपयोगी पडला. त्यामुळेच तंग कपड्यातली हॅपी न्यू इअरमधली मोहिनी असो वा राणी पद्मावती दिपिका ही पात्रं अगदी सहजतेने पेलतेसुद्धा आणि त्यातून आपल्यावर अधिराज्यही करते.   
प्रख्यात बॅडमिंटन प्लेअर प्रकाश पडुकोण यांची मुलगी असल्यामुळे सुरुवातीपासून त्यांच्याकडे खेळाला महत्त्व दिले गेले होते आणि म्हणूनच दिपिकाची लहान बहिण अनिशा ही एक उत्कृष्ट गोल्फर बनली. मँगलोरला कॉलेजमध्ये असताना दिपिका मॉडेलिंग करू लागली आणि हळूहळू त्यात स्थिरावू लागली. २००५ साली मॉडेल ऑफ द इअर अवॉर्ड मिळाल्यानंतर तिने किंगफिशर कॅलेंडरसाठी मॉडेलिंग केले आणि त्यात तिला खूपच प्रसिद्धी मिळाली. वयाच्या २१व्या वर्षी मुंबईला स्थलांतर केल्यावर हिमेश रेशमिया यांच्या म्युझिक अल्बममध्ये ती पहिल्यांदा झळकली. त्यातसुद्धा तिचे प्रचंड नाव झाले. अभिनयाच्या परिपक्वतेसाठी अनुपम खेर अकॅडमीत प्रवेश घेतल्यावर प्रख्यात निर्माती आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खान यांनी तिला आपल्या चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला. पहिलाच चित्रपट ओम शांती ओम तोही सुपरस्टार शाहरुख खानबरोबर. पहिलाच चित्रपट असूनसुद्धा आपल्या सौंदर्याबरोबरच अभिनय आणि नृत्याचे कौशल्य तितक्याच ताकदीने दाखविले होते.
आँखो में तेरी अजबसी अजबसी... या तिच्या गाण्यातील ओळीप्रमाणे तिने आपल्या वेगवेगळ्या अदा वेगवेगळ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांपर्यंत आणल्या. ती काही अशा मोजक्या अभिनेत्रिंपैकी एक आहे जिने मॉडर्न व्यक्तिरेखेबरोबरच चरित्र रोल ही तेवढ्याच प्रभावीपणे केले आहेत. तिच्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिच्या रक्तात भिनलेला तिचा आत्मविश्वास.
नृत्याबद्दल म्हणाल तर सुरुवातीपासूनच तिचे प्रत्येक नृत्य हे मनाला भिडले आहे. तिच्या प्रत्येक नृत्यातून तिने त्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत प्रकर्षाने दिसून येते. आणि म्हणूनच तिच्या प्रत्येक नृत्यागणिक आपला अनुभव नेत्रसुखद होत गेला आहे. तिच्या नृत्यात प्रचंड विविधता आहे म्हणजे जर ती लोकनृत्य करतेय तर लोकनृत्यच करते त्यात कुठेच आपल्याला सरमिसळ दिसणार नाही. तिचे नगाडे संग, पिंगा, घुमर ही नृत्ये थक्क करणारी आहेत.
वेस्टर्न डान्समध्ये अपेक्षित असलेला अटीट्यूड तिच्या अंगाप्रत्यंगात दिसतो. तिच्या नजरेतले भाव आपल्याला तिच्या नृत्याशी त्याच तीव्रतेने जोडून टाकतात. शास्त्रीय नृत्याला लागणारा शांतपणा बाजीराव मस्तानीतील नृत्यात दिसून आलाय तसाच बलम पिचकारी मधला तिचा खट्याळपणाही तितकाच नैसर्गिक वाटलाय. तिच्या पहिल्या चित्रपटापासून मला तिच्या नृत्यांमध्ये एक उत्तम नृत्यांगणा दिसली आहे. त्या त्या नृत्यशैलींमध्ये स्वतःला चपखल बसवण्यासाठी तिने कमालीची मेहनत घेतली असणार हे अगदी नक्की. आणि हा जो तिचा चढता आलेख आहे तो नव्या पिढीच्या मुलींनी अभ्यासणाजोगा आहे.
दिपिकाची एका वाक्यात व्याख्या करायची झाल्यास मी म्हणेन. आपल्या मेंदू आणि विचारांवर राज्य करणारी अभिनेत्री. आणि यामुळेच ती बॉलिवूड जगतातसुद्धा राज्य करतेय आणि पुढेही करेल.

Monday, 18 May 2020

सौंदर्याचं ऐश्वर्य

आखीव रेखीव सौंदर्याचं उदाहरण म्हणजे ऐश्वर्या. असं म्हणतात ना भगवानने तुम्हे फुरसत से बनाया होगा, हे तिला अगदी तंतोतंत लागू पडतं. नाकी डोळी नुसती छान नाही तर सुंदर, अप्रितम आहे ती, चेहऱ्याच्या प्रत्येक छटा अगदी कोरल्याप्रमाणे. जसा मुर्तिकार एखादी सुंदर मूर्ती घडवतो त्याप्रमाणे... अशा नीलकमलनयनी सौंदर्याची मोहिनी संपूर्ण विश्वालाच पडली नसती तर नवल होतं. १९९४ साली विश्वसुंदरी हा किताब मिळालेली ऐश्वर्या सौंदर्य जगतात कायम पहिल्या क्रमांकावर राहिली.
लहानपणी शास्त्रीय गायन आणि भरतनाट्यम नृत्यकलेचे धडे गिरवणाऱ्या ऐश्वर्याला आधी डॉक्टर व्हायचं होतं आणि पुढे आर्किटेक्ट बनायचा विचारही केला होता. परंतू हळूहळू तिचे मन मॉडेलिंग करण्यावर आले. सुरुवातीच्या काळात इंटरनॅशनल सुपर मॉडेल कॉण्टेस्ट जिंकल्यानंतर ती मॉडेलिंग क्षेत्रात स्थिरावू लागली. बराच काळ मॉडेलिंग केल्यानंतर १९९७ साली मणिरत्नमच्या इरुवर चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हिंदीतला पहिला चित्रपट हा बॉबी देओलबरोबरचा और प्यार हो गया हा होता. त्यानंतर एकापेक्षा एक दर्जेदार दिग्दर्शकांच्या चित्रपटांची तिच्याकडे लाईनच लागली. हम दिल दे चुके सनम, देवदास, गुजारिश अशा अनेक चित्रपटात तिचे सौंदर्य अधिकाधिक खुलूनच दिसले होते.
हम दिल दे चुके सनम मधले मनमोहिनी हे तिच्यासाठी रचलेले गाणे अगदी परफेक्ट आहे. सौंदर्य, अदा आणि नजाकत या गोष्टींचा संगम तिच्या नृत्यांमध्ये दिसून येतो आणि मग ती नृत्ये पुन्हा पुन्हा बघावीशी वाटतात. सुरुवातीच्या काळातील तिची नृत्ये आणि त्यातील एकूणच तिचा वावर तांत्रिकदृष्ट्या चोख असला तरी त्यावर मॉडेल ऐश्वर्याचा अधिक पगडा दिसून येतो. त्यानंतर हळूहळू तिच्या नृत्यांमध्ये जिवंतपणा जाणवू लागला. या जिवंतपणाचं श्रेय अर्थ्यातच तिच्या मेहनतीला द्यायला पाहिजे. कारण कित्येक कलाकार तांत्रिकदृष्ट्या काम चोख केल्यावर त्यातच समाधान मानतात पण ती कायम तिच्या कामात सुधारणा करत राहिली. और प्यार हो गया मधील थोडा सा पगला थोडा दिवाना या गाण्यातील तिचं नृत्य पाहा आणि कजरा रे मधील तिचं नृत्य पाहा, मग हा फरक लगेच लक्षात येईल.
तिच्या अनेक नृत्यांवर मी स्वतः तर नृत्य केलंच आहे पण विद्यार्थीनींवरसुद्धा बसवली आहेत. ढोली तारो, मनमोहिनी तेरी अदा, सिलसिलाँ ये चाहत का, डोला रे डोला, निंबुडा निंबुडा इत्यादी. तिची अनेक नृत्ये मनाला भावली आहेत. हम दिल दे चुके मधील प्रत्येक गाण्यातला तिचा अभिनय अगदी लाजवाब होता. त्यातील निंबुडा निंबुडा हे गाणं तर माझ्या अतिशय जवळीचं. तिच्या नृत्यांमध्ये तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या वेगवेगळ्या अदा आपल्या मनाचा ठाव घेतात. याचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे ताल सिनेमा आणि त्यातील सर्व नृत्ये.
बदलत्या काळात नृत्यांमध्ये स्टंटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि या स्टंटमध्येही ऐश्वर्याने स्वतःला चपखलपणे बसविले. तिच्या कमनीय बांध्यामुळे ते स्टंट आणि ती नृत्ये नेत्रसुखद अनुभव देतात. धूम २मधील सगळीच नृत्ये पाश्चिमात्य धाटणीची होती पण त्यातही तिने धम्माल उडवून दिली. ती एक अष्टपैलू नृत्यांगणा आहे. दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला असला तरी दहा वेळा त्याकरीता तिला नॉमिनेशन मिळालेले आहे. २००९ ला पद्मश्री या गौरवपूर्ण पुरस्काराने सन्मानित झाली आहे. २००३ साली कान्स फिल्म फेस्टिवलच्या ज्युरीची सदस्य बनणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री होती. २००४ साली लंडनमधील मादाम तुसाद इथे तिचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला.
२००५ साली नेदरलॅण्डला हजारो वेबसाईट आणि इंटरनेट पोलच्या मतांनी तिला जगातील सर्वांत सुंदर स्त्री म्हणून घोषित केले आहे.
अशा जागतिक स्तरावर भारतीय सौंदर्याला वाखाणल्या गेलेल्या या आपल्या ऐश्वर्याला माझे प्रेमरुपी आलिंगन.

Thursday, 7 May 2020

माधुरीच्या नृत्यांची मोहकता (उर्वरित भाग)


शंभर टक्के उर्जा, हावभावांची प्रचंड विविधता म्हणजे माधुरी. खुल्या दिलाने, अतिशय समरस होऊन नाचणे म्हणजे माधुरी. अशी अनेक बिरुदं माधुरीला आपण तिच्या नृत्याकरिता देऊ शकतो. ज्यांना खरोखर नृत्याची आवड आहे अशा सर्व युवतींनी तिची सर्व नृत्यप्रधान गाणी बघितलीच पाहिजेत.
तिच्या एक, दो, तीन या पहिल्या नृत्यापासून अगदी आताच्या घागरा पर्यंतची सगळी नृत्ये बघितली तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तिची नृत्यातील समरसता. काळानुरूप त्यात तसूभरसुद्धा फरक झालेला दिसत नाही. समरसता या शब्दाची मी इथे फोड अशी करेन, प्रचंड उर्जा प्रभावी सादरीकरण + हावभावांची प्रचंड विविधता समरसता. एकाचवेळी या तिन्ही गोष्टींचा अचूक समतोल. गीतातील एका शब्दात तीन ते चार प्रकारचे वेगवेगळे भाव देण्याची करामत ही फक्त तीच करू जाणे आणि यासाठी तिची अनेक नृत्ये उदाहरणादाखल घेता येतील. अखियाँ मिलाऊँ कभी अखियाँ चुराऊ क्या तुने किया जादू या ओळीत काय एक्स्प्रेशन्स दिलेत. थोडं फिल्मी भाषेत बोलायचं तर सुभानल्ला किंवा लाजवाब. ते वाटतात तितके सोप्पे नाहीत. तिचे कुठलेच हावभाव हे अतिरंजित वाटत नाहीत. उलट अतिशय नैसर्गिक आणि तितकेच लाघवी वाटतात. मी तिचे हे नृत्य कित्येकदा बघितले आहे आणि ते हावभाव करून बघण्याचा प्रयत्न देखील केला आहे. जेव्हा जेव्हा ते नृत्य बघते तेव्हा विचार करते की किती रिहलसल्स केल्या असतील यासाठी तिने, का तिला लगेचच जमलं असेल. माहीत नाही पण जे काही केलंय ते ग्रेट आहे.
देवदासमधील मार डाला आणि काहे छेड या नृत्यांनी तर गौरीशंकर गाठलेला आहे. तीस किलोचा घागरा घालून काय शिताफीने नृत्य केलंय तिने. या दोन्ही गाण्यात तिचे भावप्रदर्शन आणि नृत्य यांचा अनोखा मिलाफ बघायला मिळतो. काय ती एका मागोमाग एक भुवया उंचावण्याची अदा, ती रोखलेली नजर, ती चालण्याची अदा मध्येच एखादं स्मित हास्य, मला वाटतं माधुरीने प्रत्येक नृत्याचं सोनंच केलं आहे. मग ते शास्त्रीय असो की पाश्चिमात्य असो, वा हमको आजकल है सारखं कोळी नृत्य असो की मै कोल्हापूरसे आई हूँ ही लावणी असो. त्या त्या नृत्याच्या रंगाढंगात ती रंगून गेली आहे आणि म्हणूनच ती नृत्ये आपल्याही मनाला भिडतात.
प्रभूदेवाबरोबरचं के सरा सरा हे नृत्य एक अजून वेगळाच अनुभव देणारे. असं ऐकलं होतं की प्रभूदेवाबरोबर नृत्य करायचंय असं कळल्यावर तिला खूप टेन्शन आलं होतं. कदाचित प्रभूदेवाच्या वेगळ्या नृत्यशैलीमुळे असेल. पण...पण...पण... त्या नृत्यात दोघांची केमिस्ट्री बघून अचंबित व्हायला होतं. कुठेच, काहीच, कसलीच कमी नाही. हे साधण्यासाठी तिला किती मेहनत घ्यावी लागली असेल याची पूरेपूर कल्पना येते. गाणं स्लो असो नाहीतर फास्ट, नृत्य, अदा आणि हावभाव यांनी दमदार बनवण्याचं कसब आहे तिच्याकडे. तिच्या सगळ्याच्या सगळ्या सिगनेचर स्टेप्स अतिशय प्रसिद्ध आहेत. दिल तो पागल है मधलं माधुरीचं वेगळेपण असंच आपल्याला भावलेलं. काळाप्रमाणे ती स्वतःला बदलवत गेली आणि विशेष म्हणजे तिचे हे बदल प्रेक्षकांनासुद्धा आवडले. म्हणजे असं कधीच वाटलं नाही की हे काही हिला जमलं नाही बुवा. उलट ती ती व्यक्तिरेखा ही तिच्यासाठीच असल्याचं प्रकर्षाने जाणवलं. उगीचच का एम.एफ. हुसैन सारखे जगविख्यात चित्रकार तिच्या या सौंदर्यावर जबरदस्त फिदा झाले होते. त्यांनी म्हणे हम आपके है कौन हा चित्रपट जवळजवळ ६६ वेळा पाहिला होता. त्यांनी तिची अनेक चित्रे रेखाटली आहेत. इतकंच काय तर तिच्याकरीता गजगामिनी या चित्रपटाची निर्मितीही केली होती.
माधुरीला तब्बल १४ वेळा फिल्म फेअर अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळाले आहे तर सहा वेळा तिला ते मिळालेही आहे. २००८ साली पद्मश्री या गौरवपूर्ण पुरस्काराने ती सन्मानित झाली आहे. अशा निखळ हास्याची देणगी लाभलेल्या आपल्या मराठी मातीतल्या लावण्यवतीला मानाचा मुजरा.

Monday, 4 May 2020

सौंदर्याची मोहिनी भाग १

सौंदर्याचं अस्सल खणखणीत नाणं असलेली आपली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे माधुरी. अर्थात बॉलिवूडने कालांतराने तिला धक धक गर्ल हा किताब दिला. १५ मे १९६७ साली जन्मलेल्या माधुरीने वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून नृत्य शिकायला सुरुवात केली होती. कथ्थक नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या माधुरीला खरं तर मायक्रोबायोलॉजिस्ट बनायचं होतं पण नाही, तिच्या नशिबात बॉलिवूड आणि तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणं हे लिहिलेलंचं होतं. १९८४ साली राजश्री प्रोडक्शनच्या अबोध सिनेमातून जरी तिचं पदार्पण झालं असलं तरी १९८८ साली एन.चंद्रा यांच्या चित्रपटातून तिने जी मोहिनी सगळ्यांवर घातली ती कायमचीच. सगळीकडे माधुरीची मोहिनी, मोहिनी आणि मोहिनीच पसरली.

माझा नुकताच दहावीचा रिझल्ट लागला होता आणि एक वर्षाच्या गॅपनंतर डॉ. किशू पाल यांच्या नृत्यवर्गात मी पुन्हा दाखल झाले होते. साधारण सहा महिन्यानंतर मला त्यांनी त्यांच्याबरोबर सहाय्यक शिक्षक म्हणून शिकवायला ठेवले. त्यादरम्यान त्या राहात असलेल्या नालासोपारा इथल्या सोसायटीत सार्वजनिक पूजेनिमित्त नृत्ये बसवायची होती. मॅडमना त्यांच्या या कामात मदत करायला मी शनिवार, रविवार नालासोपाराला जायचे. तेव्हा त्या कार्यक्रमात मी या एक, दोन, तीन गाण्यावर नृत्य केले होते अगदी हुबेहूब. दोन दिवस व्हिडिओ कॅसेट लावून सतत बघून बघून हे गाणं बसवले होते. ते इतके चपखल बसले होते की आजही माझ्या तसेच्या तसे लक्षात आहे. आणि मग काय त्या सोसायटीमधील कार्यक्रमात मी एकदम चमकून गेले. आधीच गाणे प्रचंड हिट होतेच त्यात माझा परफॉर्मन्स लोकांना खूप आवडला. या गाण्याने आणि माधुरीने माझ्यावरसुद्धा मोहिनी घातली नसती तर नवलंच म्हणावं लागलं असतं.

मला असलेलं श्रीदेवीचं वेड माझ्या जवळच्या लोकांना माहित होतं. तिचे डायलॉग मी आरशात बघून बोलायचे वैगेरे आणि नंतर भावली ती माधुरी. तिच्या नृत्यातील हावभावांनी जणू वेडच लावलं होतं. गाण्यातील एका ओळीत हावभावांची प्रचंड विविधता, मग ते भुवया उंचावणे असो, डोळे किलकिले करणे असो वा डोळा मारणे असो इत्यादी इत्यादी. हे सर्व प्रकार मी आरशासमोर उभे राहून करायचे. तिचा अख्खा तेजाब पिक्चर तोंडपाठ झाला. सुरुवातीला तिच्या केसांचा राऊंड स्टेपकट असायचा. मग मीही तसाच हेअरकट पण करून घेतला होता. इतकी दिवानी झाली होती मी तिची.

मग काय वर्षागणिक तिचे चित्रपट येत गेले, ती नाचत गेली आणि आपण मोहित होत गेलो. एक मोठीच्या मोठी यादीच आहे तिच्या नृत्यांची आणि त्यातून शिकायला मिळालेल्या गोष्टींची. उपजतच सुंदर असलेले तिचे व्यक्तिमत्त्व नंतर नंतर तिने कमालीचे खुलविले. ती हसताना सरळ ओळीत असलेले तिचे दात आणि तिच्या हसण्याचा तो आवाज अरे काय सांगू, अहो निखळ हास्याची देणगी लाभली आहे तिला. सौंदर्याबरोबरच सशक्त आणि कसदार अभिनय, उत्तम आणि प्रचंड तयारीच्या नृत्याने ती लाखो दिलोंकी धडकन बनली.

खूपखूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की एका मराठमोळ्या मुलीने या हिंदी चित्रपटसृष्टीच्या मायानगरीत सुपरस्टारपद भूषविले आणि निभावलेही. मी तिच्या जवळजवळ सर्वच नृत्यांवर नृत्ये केली आहेत आणि नृत्यवर्गांत बसवलीसुद्धा आहेत. तिच्या नृत्यांतून शिकण्यासारखं खूप काही आहे आणि या तिच्या नृत्यातील छटांचा आपण पुढील भागात सविस्तर वेध घेणार आहोत. 


माझ्या आठवणीतील होळी

  होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत स...