Monday, 29 June 2020

पिंकी प्रियांका


चित्रपटाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या झारखंड इथल्या कुटुंबात जन्माला आलेली प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचली. वडील आर्मीमध्ये असल्यामुळे सततच्या बदल्यांमुळे शालेय शिक्षण विविध शाळांमध्ये झाले. शाळेत असताना नाटकात काम करण्याबरोबरच वेस्टर्न आणि क्लासिकल संगीताचे धडे, गायन आणि कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण तिने घेतले होते. पुढे जाऊन फेमिना मिस इंडियामध्ये दुसरा क्रमांक मिळवलेली प्रियांका २००० साली मिस वर्ल्ड झाली आणि भारताचे नाव उज्ज्वल केले. २००३ साली सनी देओल बरोबर द हिरो या चित्रपटातून तिने या क्षेत्रात पदार्पण केले. पदापर्णातच आपल्यातील असलेल्या टॅलेंटची दखल घ्यायला लावल्यामुळे तिने परत मागे वळून कधी पाहिले नाही. ओळीने एकापेक्षा एक सरस चित्रपटांची तिची यादीच तयार झाली. अर्थात यात चढ उतार नक्कीच होते. ऐतराज, बर्फी, मेरी कोम, बाजीराव मस्तानी इत्यादी चित्रपटांतील तिच्या अभिनयाबरोबरच तिचे नृत्यकौशल्यसुद्धा लपलेले नाही. तशी तर तिने अनेक चित्रपटांत भरपूर नृत्ये केली आहेत पण मला भावलेली तिची काही नृत्ये इथे नमूद करावीशी वाटतात.

बाजीराम मस्तानीतील पिंगा या नृत्याची कोरिओग्राफी ही मराठी मातीशी सांगड घालणारी तर होतीच पण तिला थोडासा क्लासिकल टच पण होता आणि या नृत्यात तिने तिची कामगिरी उत्तम बजावली आहे. राम चाहे लीला चाहे या नृत्यातील तिची अदा अशीच नजर खिळवून ठेवणारी असून याच नृत्यातील शेवटच्या काही ओळींवर असलेल्या नृत्याच्या स्टेप्स तर एकदम लाजवाब केल्या आहेत. तिच्या बऱ्याच नृत्यांमध्ये अगदी तंत्रशुद्ध नृत्यशैली जाणवत असली तरी आत्मविश्वास आणि मेहनत यांचा मिलाफ तिच्या नृत्यात प्रकर्षाने जाणवतो. पिंकी हे पैसेवालो की हे याचंच एक उत्तम उदाहरण म्हणता येईल यात अंदाजे ६० ते ७० मेल डान्सरच्या मॉब बरोबर केलेले हे विनोदी ढंगातील नृत्य बघत राहावेसे वाटते. अर्थात याचे बहुतांशी श्रेय कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना जाते. मला स्वतःला हे नृत्य बघताना मजा तर आलीच पण शिकायलासुद्धा खूप मिळाले. मेल कोरसवर घेतलेले नृत्याचे शॉट्स आणि त्यात प्रियांकाच्या हावभावांची सांगड खूप कमाल झाली आहे. प्रचंड एनर्जिटिक नृत्य आहे हे. याशिवाय डॉन २ मधील तिचे आजकी रात या गाण्यावरील वेस्टर्न नृत्य असेच नेत्रसुखद झालेले आहे. देसी गर्ल, गुनगुनगुणारे, तुने मारी एण्ट्री अशी अनेक नृत्ये उदाहरणादाखल घेता येतील.

बॉलिवूडप्रमाणेच तिने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. इन माय सिटी आणि एक्सॉटिक ही तिने गायलेली गाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाली आहेत. तिच्या फॅशन चित्रपटांतील अभिनयाला नॅशनल अवॉर्ड मिळाले असून तिला पद्मश्री हा मानाचा किताबसुद्धा बहाल झाला आहे. वेंटिलेटर या मराठी चित्रपटाची निर्मिती करून तिने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. 

Sunday, 21 June 2020

कपूर गर्ल्स

बॉलिवूडच्या प्रथम घराण्याच्या सुपुत्र्या, शोमॅन राजकपूर यांच्या नाती करिश्मा आणि करिना. कपूर घराण्यातील मुलींना या क्षेत्रापासून आतापर्यंत लांबच ठेवण्यात आले होते. परंतू या नियमाचं प्रथमच उल्लंघन केलं ते बबिता आणि रणधीर कपूर यांची कन्या करिश्माने आणि तिचा कित्ता गिरवला करिनाने.  

लहानपणापासूनच चित्रपटाचे बाळकडू मिळालेल्या या दोन्ही बहिणींना इथे दमदार कारकीर्द करणं कठीण गेलं नाही. १९९१ साली वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी प्रेमकैदी या चित्रपटातून करिश्मा कपूरने या क्षेत्रात पाऊल ठेवले. सुरुवातीला तिला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं तरी हळूहळू आपल्या अभिनयात, नृत्यात, दिसण्यात आणि वावरण्यात करिश्माने लक्षणीय बदल केला आणि ९० च्या दशकात तिने आपल्या चित्रपटात कमालीचा भिडस्तपणा दाखवला होता. जो तिच्या खानदानातील सदस्यांपासून इतरांपर्यंत सगळ्यांनाच पचनी पडायला थोडा अवघड गेला होता. तिची खास केमिस्ट्री जुळली ती गोविंदा आणि सलमान खान यांच्याबरोबर. गोविंदाबरोबर तिची एकापेक्षा एक सरस अशी अनेक नृत्ये बघायला मिळाली. गोविंदाची स्वतःची अशी एक शैली तर होतीच परंतु चित्रपटांतील कट मुव्हमेंटच्या नृत्यात पण तो नंबर वन होता. नृत्यात एक्स्पर्ट असलेल्या गोविंदाच्या नृत्याला तितक्याच ताकदीने करिश्माने साथ दिली. तिथे ती तसूभरसुद्धा कमी पडली नाही. मग त्या दोन दोन बीट्सच्या चेंज असलेल्या स्टेप्स असू देत किंवा हाताच्या कट मुव्हमेंट असू देत तिने आपल्या नृत्यातला सफाईदारपणा चोख दाखवला आहे. इतकेच काय दोघांची विनोदी ढंगातलीसुद्धा बरीच नृत्ये आहेत त्यातसुद्धा ती कुठेही अनैसर्गिक वाटत नाही. तिच्या सगळ्या नृत्यांमध्ये तिने घेतलेली मेहनत दिसून येते. दिल तो पागल हैमध्ये माधुरी दिक्षित सारख्या मातब्बर नृत्यांगनेबरोबरसुद्धा तिने आपल्या नृत्याचे नाणे खणखणीत वाजवले होते. चित्रपटागणिक तिच्या अभिनयात आलेल्या प्रगल्भपणा सुद्धा आपल्याला मान्य करावा लागतो.

नव्वदचं दशक तिने गाजवलं तर २००० साली करिनासुद्धा चित्रपटसृष्टीत आपलं प्रस्थ सिद्ध कऱण्यासाठी सज्ज झाली होती. आई बबिताचा दोघींचं करिअर चित्रपटसृष्टीत सेट करण्याचा आग्रहीपणा, दोन्ही बहिणींना नितळ गोऱ्या रंगाबरोबर मिळालेले निळे डोळे, धारदार नाक या सौंदर्यखुणा, त्यात वडिलोपार्जित नाव आणि वारसा यांची जोड त्यांच्या करिअरच्या पथ्यावर पडली. रेफ्युजी चित्रपटाने सुरुवात करत करिना हळूहळू तरुणाईची स्टाईल आयकॉनच बनली.

करिश्मा प्रमाणेच करिनानेसुद्धा टॉपच्या सर्व अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. हलकट जवानी, फेविकॉल से, ये मेरा दिल अशा बऱ्याच आयटम साँगनी तिने नृत्याकडे तरुणपिढीचा बघण्याचा दृष्टिकोन बदलवला. तिच्या झिरो फिगर या कन्सेप्टनी तर अनेक मुलींना व स्त्रियांना अक्षरशः वेड लावलं.

परंतू दोन बहिणींच्या नृत्यशैलींबद्दल म्हणाल तर एक कमालीची मेहनती आणि त्या प्रवाहात वाहणारी तर दुसरी आपल्या स्वतःच्या प्रवाहात वाहवून नेणारी. करिनाची नृत्ये बघताना तिचा स्वतःचा प्रवाह किंवा तिचा एक अंमल आपल्याला जास्त जाणवतो. ठरावीक मर्यादेनंतर स्टेप्ससाठी घ्यावी लागणारी मेहनत तिच्यात दिसत नाही. सौंदर्य, फिगर आणि स्टाईल या गोष्टींना नृत्यात जास्त महत्त्व दिले गेल्याचे जाणवते.

दोन बहिणींच्या चित्रपटसृष्टीतील करिअरमध्ये साधारण दहा वर्षांचा काळ आहे. या दहा वर्षांच्या काळामध्ये मोठी बहिण काळाच्या रंगात रंगलेली दिसते तर धाकटी बहिण आपल्या रंगात काळाला रंगवताना दिसते. त्यामुळे काळातील हे अंतर आणि नृत्यातील तफावत बरंच काही सांगून जाते. ही काळाची, मेहनतीची आणि स्टाईलची तफावत जरी असली तरी दोघीही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी प्रचंड यशस्वी ठरलेल्या अभिनेत्या आहेत आणि म्हणूनच कपूर खानदानाच्या चित्रपटाचा वारसा त्यांच्या मुलींनीही तितक्याच ताकदीने आणि यशस्वीपणे पुढे नेला हे आपल्यालाही मान्य करावं लागेल. 


Monday, 8 June 2020

कतरिनाचा कैफ

अभिनेत्री म्हणून स्वतःच्या मर्यादा माहीत असून आणि त्याप्रमाणेच स्वतःला किंबहुना आपल्यातील त्याच नेमकेपणावर भर देऊन प्रेक्षकांसमोर सादर होणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. दिसायला जितकी सुंदर तितकाच इनोसंट चेहरा लाभलेली. कतरिनातील मला जाणवलेला महत्त्वाचा गुण म्हणजे तिला जे जमते नेमके तेच ती प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करते. आतापर्यंत अनेक नृत्यांवर तिने आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे. त्यातील बहुतांशी नृत्ये ही आयटम साँगवर आहेत परंतू तरीही तिच्या त्या नृत्यांमध्ये कुठेही भडकपणा जाणवला नाही किंवा त्या नृत्यांना अश्लिलतेची झालर आली नाही. कदाचित तिला मिळालेल्या इनोसंट चेहऱ्याच्या दैवी देणगीमुळे असेल.

काळ बदलला तशी नृत्याची संकल्पनाही बदलली. पूर्वी शास्त्रीय नृत्यालाच जनमाणसात प्रचंड मान्यता होती. हळूहळू आपल्या मातीच्या रांगड्या लोककलेकडे सुद्धा मनं वळू लागली...आणि आताच्या बदलत्या काळानुसार नवीन पिढीलाच नाही तर चिमुरड्यांनासुद्धा आयटम साँगवर नृत्य करण्याचा मोह होतो. अर्थात त्यांना त्यातलं काही कळत नसतं हा भाग वेगळा. पूर्वीच्या चित्रपटात असं आयटम साँग वेगळ्या हिरोईनमार्फत करवून घेतलं जायचं. चित्रपटाची मूळ नायिका ही नृत्ये करायची नाही. परंतू बदलत्या काळानुसार हल्ली चित्रपटाची हिरोईनच ही नृत्ये करत असल्यामुळे तिचा प्रभाव नृत्यप्रेमींवर निश्चितच पडू लागला आहे. आपल्याला जिकडे तिकडे ही नृत्ये सादर होताना दिसतात आणि त्यामागची मानसिकता झपाट्याने बदलताना दिसत आहे.

बहुतांश चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या आयटम साँगचा उपयोग केला जातो. यात नृत्यदिग्दर्शकाचं कसब पणाला लागतं. अवघ्या तीन मिनिटात त्याला प्रेक्षकांची मन जिंकायची असतात. सिगनेचर स्टेप, स्टंटबाजी किंवा एरोबिक मुव्हमेंट्स यासारख्या तंत्राचा वापर करत नृत्यदिग्दर्शक ते आव्हान पेलण्याचं प्रयत्न करतात. या सगळ्यात नृत्यदिग्दर्शकाला उपयोगी पडतो तो गाणं सादर करणारा कलाकार. कतरिनाने हे काम एक दोन नाही तर कित्येक गाण्यांमध्ये कौशल्याने पार पाडलेले आहे. 

त्यामुळेच कतरिना कैफच्या नृत्यांत आयटम साँगचीसुद्धा विविधता दिसते. चिकनी चमेलीमध्ये ती देसी ढंगात नाचली आहे तर मेरे माहिया सनम जानममध्ये तिने एरोबेटिक मुव्हमेंट्समध्ये स्वतःला अगदी परफेक्ट बसवून घेतलं आहे. या नृत्यासाठी आवश्यक असलेली तिची शरिराची लवचिकता बघून थक्क व्हायला होतं.

एकाच पठडीतील नृत्ये तिने केलेली नाहीत, हेसुद्धा तिचं वैशिष्ट्य. तिच्या प्रत्येक नृत्यदिग्दर्शकाने तिला वेगळ्या पद्धतीचे नृत्य देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचवेळी कतरिनानेसुद्धा त्या नृत्यांचे सादरीकरण तितक्याच नावीन्यपूर्ण पद्धतीने आणि हावभावांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तिने भरपूर आयटम साँगवर वेगवेगळी नृत्ये  करून कुठेच तिच्या नृत्यात तोचतोचपणा आलेला नाही. म्हणजे ते नावीन्य आणण्यामध्ये कुठेतरी ती यशस्वी नक्कीच झाली आहे. नृत्यातला, पोशाखातला आणि हावभावातला वेगळेपणा जपण्याचं कसब तिला व्यवस्थित जमलेलं आहे आणि हेच तिचं खरं कौशल्य आहे.

आयटम साँग प्रेक्षकांपर्यंत लवकर पोहोचतात आणि मग अशी प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या हिट गाण्यांवर नृत्य करण्याची एकच लाट येते. नवोदितांना या नृत्यांचा मोह होतो पण ही नृत्ये करताना किंवा या नृत्यांची छाप स्वतःवर पाडून घेताना आपल्याला स्वतःला थोडे भान ठेवायला हवे. नृत्याचे हावभाव एका मर्यादेला ओलांडणारे नसावेत त्याचबरोबर तुमच्या पेहरावाचेसुद्धा भान असायलाच हवे. उत्तम नृत्य म्हणून तुमचे सादरीकरण असेल तर प्रेक्षकांना नक्कीच आवडतं. कतरिनाच्या आयटम साँगने प्रभावित होणारी पिढी तिच्या नावीन्याचा प्रयत्न आणि मेहनती वृत्तीचा कित्ता गिरवेल, अशी अपेक्षा.


Monday, 25 May 2020

बॉलिवूडची मस्तानी दिपिका

 बॉलिवूड जगतात या मस्तानीने आपली किमया अशी काय केली आहे की तिने उच्च अभिनेत्रींमध्ये आपले स्थान फारच कमी कालावधीत निश्चित केले. प्रचंड आत्मविश्वास हा तिने साकारलेल्या पात्रांचा आत्मा तर झालाच पण त्याशिवाय तिच्या नृत्याला लार्जर दॅन लाईफ करण्यासाठीही उपयोगी पडला. त्यामुळेच तंग कपड्यातली हॅपी न्यू इअरमधली मोहिनी असो वा राणी पद्मावती दिपिका ही पात्रं अगदी सहजतेने पेलतेसुद्धा आणि त्यातून आपल्यावर अधिराज्यही करते.   
प्रख्यात बॅडमिंटन प्लेअर प्रकाश पडुकोण यांची मुलगी असल्यामुळे सुरुवातीपासून त्यांच्याकडे खेळाला महत्त्व दिले गेले होते आणि म्हणूनच दिपिकाची लहान बहिण अनिशा ही एक उत्कृष्ट गोल्फर बनली. मँगलोरला कॉलेजमध्ये असताना दिपिका मॉडेलिंग करू लागली आणि हळूहळू त्यात स्थिरावू लागली. २००५ साली मॉडेल ऑफ द इअर अवॉर्ड मिळाल्यानंतर तिने किंगफिशर कॅलेंडरसाठी मॉडेलिंग केले आणि त्यात तिला खूपच प्रसिद्धी मिळाली. वयाच्या २१व्या वर्षी मुंबईला स्थलांतर केल्यावर हिमेश रेशमिया यांच्या म्युझिक अल्बममध्ये ती पहिल्यांदा झळकली. त्यातसुद्धा तिचे प्रचंड नाव झाले. अभिनयाच्या परिपक्वतेसाठी अनुपम खेर अकॅडमीत प्रवेश घेतल्यावर प्रख्यात निर्माती आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खान यांनी तिला आपल्या चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला. पहिलाच चित्रपट ओम शांती ओम तोही सुपरस्टार शाहरुख खानबरोबर. पहिलाच चित्रपट असूनसुद्धा आपल्या सौंदर्याबरोबरच अभिनय आणि नृत्याचे कौशल्य तितक्याच ताकदीने दाखविले होते.
आँखो में तेरी अजबसी अजबसी... या तिच्या गाण्यातील ओळीप्रमाणे तिने आपल्या वेगवेगळ्या अदा वेगवेगळ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांपर्यंत आणल्या. ती काही अशा मोजक्या अभिनेत्रिंपैकी एक आहे जिने मॉडर्न व्यक्तिरेखेबरोबरच चरित्र रोल ही तेवढ्याच प्रभावीपणे केले आहेत. तिच्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिच्या रक्तात भिनलेला तिचा आत्मविश्वास.
नृत्याबद्दल म्हणाल तर सुरुवातीपासूनच तिचे प्रत्येक नृत्य हे मनाला भिडले आहे. तिच्या प्रत्येक नृत्यातून तिने त्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत प्रकर्षाने दिसून येते. आणि म्हणूनच तिच्या प्रत्येक नृत्यागणिक आपला अनुभव नेत्रसुखद होत गेला आहे. तिच्या नृत्यात प्रचंड विविधता आहे म्हणजे जर ती लोकनृत्य करतेय तर लोकनृत्यच करते त्यात कुठेच आपल्याला सरमिसळ दिसणार नाही. तिचे नगाडे संग, पिंगा, घुमर ही नृत्ये थक्क करणारी आहेत.
वेस्टर्न डान्समध्ये अपेक्षित असलेला अटीट्यूड तिच्या अंगाप्रत्यंगात दिसतो. तिच्या नजरेतले भाव आपल्याला तिच्या नृत्याशी त्याच तीव्रतेने जोडून टाकतात. शास्त्रीय नृत्याला लागणारा शांतपणा बाजीराव मस्तानीतील नृत्यात दिसून आलाय तसाच बलम पिचकारी मधला तिचा खट्याळपणाही तितकाच नैसर्गिक वाटलाय. तिच्या पहिल्या चित्रपटापासून मला तिच्या नृत्यांमध्ये एक उत्तम नृत्यांगणा दिसली आहे. त्या त्या नृत्यशैलींमध्ये स्वतःला चपखल बसवण्यासाठी तिने कमालीची मेहनत घेतली असणार हे अगदी नक्की. आणि हा जो तिचा चढता आलेख आहे तो नव्या पिढीच्या मुलींनी अभ्यासणाजोगा आहे.
दिपिकाची एका वाक्यात व्याख्या करायची झाल्यास मी म्हणेन. आपल्या मेंदू आणि विचारांवर राज्य करणारी अभिनेत्री. आणि यामुळेच ती बॉलिवूड जगतातसुद्धा राज्य करतेय आणि पुढेही करेल.

Monday, 18 May 2020

सौंदर्याचं ऐश्वर्य

आखीव रेखीव सौंदर्याचं उदाहरण म्हणजे ऐश्वर्या. असं म्हणतात ना भगवानने तुम्हे फुरसत से बनाया होगा, हे तिला अगदी तंतोतंत लागू पडतं. नाकी डोळी नुसती छान नाही तर सुंदर, अप्रितम आहे ती, चेहऱ्याच्या प्रत्येक छटा अगदी कोरल्याप्रमाणे. जसा मुर्तिकार एखादी सुंदर मूर्ती घडवतो त्याप्रमाणे... अशा नीलकमलनयनी सौंदर्याची मोहिनी संपूर्ण विश्वालाच पडली नसती तर नवल होतं. १९९४ साली विश्वसुंदरी हा किताब मिळालेली ऐश्वर्या सौंदर्य जगतात कायम पहिल्या क्रमांकावर राहिली.
लहानपणी शास्त्रीय गायन आणि भरतनाट्यम नृत्यकलेचे धडे गिरवणाऱ्या ऐश्वर्याला आधी डॉक्टर व्हायचं होतं आणि पुढे आर्किटेक्ट बनायचा विचारही केला होता. परंतू हळूहळू तिचे मन मॉडेलिंग करण्यावर आले. सुरुवातीच्या काळात इंटरनॅशनल सुपर मॉडेल कॉण्टेस्ट जिंकल्यानंतर ती मॉडेलिंग क्षेत्रात स्थिरावू लागली. बराच काळ मॉडेलिंग केल्यानंतर १९९७ साली मणिरत्नमच्या इरुवर चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हिंदीतला पहिला चित्रपट हा बॉबी देओलबरोबरचा और प्यार हो गया हा होता. त्यानंतर एकापेक्षा एक दर्जेदार दिग्दर्शकांच्या चित्रपटांची तिच्याकडे लाईनच लागली. हम दिल दे चुके सनम, देवदास, गुजारिश अशा अनेक चित्रपटात तिचे सौंदर्य अधिकाधिक खुलूनच दिसले होते.
हम दिल दे चुके सनम मधले मनमोहिनी हे तिच्यासाठी रचलेले गाणे अगदी परफेक्ट आहे. सौंदर्य, अदा आणि नजाकत या गोष्टींचा संगम तिच्या नृत्यांमध्ये दिसून येतो आणि मग ती नृत्ये पुन्हा पुन्हा बघावीशी वाटतात. सुरुवातीच्या काळातील तिची नृत्ये आणि त्यातील एकूणच तिचा वावर तांत्रिकदृष्ट्या चोख असला तरी त्यावर मॉडेल ऐश्वर्याचा अधिक पगडा दिसून येतो. त्यानंतर हळूहळू तिच्या नृत्यांमध्ये जिवंतपणा जाणवू लागला. या जिवंतपणाचं श्रेय अर्थ्यातच तिच्या मेहनतीला द्यायला पाहिजे. कारण कित्येक कलाकार तांत्रिकदृष्ट्या काम चोख केल्यावर त्यातच समाधान मानतात पण ती कायम तिच्या कामात सुधारणा करत राहिली. और प्यार हो गया मधील थोडा सा पगला थोडा दिवाना या गाण्यातील तिचं नृत्य पाहा आणि कजरा रे मधील तिचं नृत्य पाहा, मग हा फरक लगेच लक्षात येईल.
तिच्या अनेक नृत्यांवर मी स्वतः तर नृत्य केलंच आहे पण विद्यार्थीनींवरसुद्धा बसवली आहेत. ढोली तारो, मनमोहिनी तेरी अदा, सिलसिलाँ ये चाहत का, डोला रे डोला, निंबुडा निंबुडा इत्यादी. तिची अनेक नृत्ये मनाला भावली आहेत. हम दिल दे चुके मधील प्रत्येक गाण्यातला तिचा अभिनय अगदी लाजवाब होता. त्यातील निंबुडा निंबुडा हे गाणं तर माझ्या अतिशय जवळीचं. तिच्या नृत्यांमध्ये तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या वेगवेगळ्या अदा आपल्या मनाचा ठाव घेतात. याचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे ताल सिनेमा आणि त्यातील सर्व नृत्ये.
बदलत्या काळात नृत्यांमध्ये स्टंटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि या स्टंटमध्येही ऐश्वर्याने स्वतःला चपखलपणे बसविले. तिच्या कमनीय बांध्यामुळे ते स्टंट आणि ती नृत्ये नेत्रसुखद अनुभव देतात. धूम २मधील सगळीच नृत्ये पाश्चिमात्य धाटणीची होती पण त्यातही तिने धम्माल उडवून दिली. ती एक अष्टपैलू नृत्यांगणा आहे. दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला असला तरी दहा वेळा त्याकरीता तिला नॉमिनेशन मिळालेले आहे. २००९ ला पद्मश्री या गौरवपूर्ण पुरस्काराने सन्मानित झाली आहे. २००३ साली कान्स फिल्म फेस्टिवलच्या ज्युरीची सदस्य बनणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री होती. २००४ साली लंडनमधील मादाम तुसाद इथे तिचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला.
२००५ साली नेदरलॅण्डला हजारो वेबसाईट आणि इंटरनेट पोलच्या मतांनी तिला जगातील सर्वांत सुंदर स्त्री म्हणून घोषित केले आहे.
अशा जागतिक स्तरावर भारतीय सौंदर्याला वाखाणल्या गेलेल्या या आपल्या ऐश्वर्याला माझे प्रेमरुपी आलिंगन.

Thursday, 7 May 2020

माधुरीच्या नृत्यांची मोहकता (उर्वरित भाग)


शंभर टक्के उर्जा, हावभावांची प्रचंड विविधता म्हणजे माधुरी. खुल्या दिलाने, अतिशय समरस होऊन नाचणे म्हणजे माधुरी. अशी अनेक बिरुदं माधुरीला आपण तिच्या नृत्याकरिता देऊ शकतो. ज्यांना खरोखर नृत्याची आवड आहे अशा सर्व युवतींनी तिची सर्व नृत्यप्रधान गाणी बघितलीच पाहिजेत.
तिच्या एक, दो, तीन या पहिल्या नृत्यापासून अगदी आताच्या घागरा पर्यंतची सगळी नृत्ये बघितली तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तिची नृत्यातील समरसता. काळानुरूप त्यात तसूभरसुद्धा फरक झालेला दिसत नाही. समरसता या शब्दाची मी इथे फोड अशी करेन, प्रचंड उर्जा प्रभावी सादरीकरण + हावभावांची प्रचंड विविधता समरसता. एकाचवेळी या तिन्ही गोष्टींचा अचूक समतोल. गीतातील एका शब्दात तीन ते चार प्रकारचे वेगवेगळे भाव देण्याची करामत ही फक्त तीच करू जाणे आणि यासाठी तिची अनेक नृत्ये उदाहरणादाखल घेता येतील. अखियाँ मिलाऊँ कभी अखियाँ चुराऊ क्या तुने किया जादू या ओळीत काय एक्स्प्रेशन्स दिलेत. थोडं फिल्मी भाषेत बोलायचं तर सुभानल्ला किंवा लाजवाब. ते वाटतात तितके सोप्पे नाहीत. तिचे कुठलेच हावभाव हे अतिरंजित वाटत नाहीत. उलट अतिशय नैसर्गिक आणि तितकेच लाघवी वाटतात. मी तिचे हे नृत्य कित्येकदा बघितले आहे आणि ते हावभाव करून बघण्याचा प्रयत्न देखील केला आहे. जेव्हा जेव्हा ते नृत्य बघते तेव्हा विचार करते की किती रिहलसल्स केल्या असतील यासाठी तिने, का तिला लगेचच जमलं असेल. माहीत नाही पण जे काही केलंय ते ग्रेट आहे.
देवदासमधील मार डाला आणि काहे छेड या नृत्यांनी तर गौरीशंकर गाठलेला आहे. तीस किलोचा घागरा घालून काय शिताफीने नृत्य केलंय तिने. या दोन्ही गाण्यात तिचे भावप्रदर्शन आणि नृत्य यांचा अनोखा मिलाफ बघायला मिळतो. काय ती एका मागोमाग एक भुवया उंचावण्याची अदा, ती रोखलेली नजर, ती चालण्याची अदा मध्येच एखादं स्मित हास्य, मला वाटतं माधुरीने प्रत्येक नृत्याचं सोनंच केलं आहे. मग ते शास्त्रीय असो की पाश्चिमात्य असो, वा हमको आजकल है सारखं कोळी नृत्य असो की मै कोल्हापूरसे आई हूँ ही लावणी असो. त्या त्या नृत्याच्या रंगाढंगात ती रंगून गेली आहे आणि म्हणूनच ती नृत्ये आपल्याही मनाला भिडतात.
प्रभूदेवाबरोबरचं के सरा सरा हे नृत्य एक अजून वेगळाच अनुभव देणारे. असं ऐकलं होतं की प्रभूदेवाबरोबर नृत्य करायचंय असं कळल्यावर तिला खूप टेन्शन आलं होतं. कदाचित प्रभूदेवाच्या वेगळ्या नृत्यशैलीमुळे असेल. पण...पण...पण... त्या नृत्यात दोघांची केमिस्ट्री बघून अचंबित व्हायला होतं. कुठेच, काहीच, कसलीच कमी नाही. हे साधण्यासाठी तिला किती मेहनत घ्यावी लागली असेल याची पूरेपूर कल्पना येते. गाणं स्लो असो नाहीतर फास्ट, नृत्य, अदा आणि हावभाव यांनी दमदार बनवण्याचं कसब आहे तिच्याकडे. तिच्या सगळ्याच्या सगळ्या सिगनेचर स्टेप्स अतिशय प्रसिद्ध आहेत. दिल तो पागल है मधलं माधुरीचं वेगळेपण असंच आपल्याला भावलेलं. काळाप्रमाणे ती स्वतःला बदलवत गेली आणि विशेष म्हणजे तिचे हे बदल प्रेक्षकांनासुद्धा आवडले. म्हणजे असं कधीच वाटलं नाही की हे काही हिला जमलं नाही बुवा. उलट ती ती व्यक्तिरेखा ही तिच्यासाठीच असल्याचं प्रकर्षाने जाणवलं. उगीचच का एम.एफ. हुसैन सारखे जगविख्यात चित्रकार तिच्या या सौंदर्यावर जबरदस्त फिदा झाले होते. त्यांनी म्हणे हम आपके है कौन हा चित्रपट जवळजवळ ६६ वेळा पाहिला होता. त्यांनी तिची अनेक चित्रे रेखाटली आहेत. इतकंच काय तर तिच्याकरीता गजगामिनी या चित्रपटाची निर्मितीही केली होती.
माधुरीला तब्बल १४ वेळा फिल्म फेअर अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळाले आहे तर सहा वेळा तिला ते मिळालेही आहे. २००८ साली पद्मश्री या गौरवपूर्ण पुरस्काराने ती सन्मानित झाली आहे. अशा निखळ हास्याची देणगी लाभलेल्या आपल्या मराठी मातीतल्या लावण्यवतीला मानाचा मुजरा.

Monday, 4 May 2020

सौंदर्याची मोहिनी भाग १

सौंदर्याचं अस्सल खणखणीत नाणं असलेली आपली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे माधुरी. अर्थात बॉलिवूडने कालांतराने तिला धक धक गर्ल हा किताब दिला. १५ मे १९६७ साली जन्मलेल्या माधुरीने वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून नृत्य शिकायला सुरुवात केली होती. कथ्थक नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या माधुरीला खरं तर मायक्रोबायोलॉजिस्ट बनायचं होतं पण नाही, तिच्या नशिबात बॉलिवूड आणि तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणं हे लिहिलेलंचं होतं. १९८४ साली राजश्री प्रोडक्शनच्या अबोध सिनेमातून जरी तिचं पदार्पण झालं असलं तरी १९८८ साली एन.चंद्रा यांच्या चित्रपटातून तिने जी मोहिनी सगळ्यांवर घातली ती कायमचीच. सगळीकडे माधुरीची मोहिनी, मोहिनी आणि मोहिनीच पसरली.

माझा नुकताच दहावीचा रिझल्ट लागला होता आणि एक वर्षाच्या गॅपनंतर डॉ. किशू पाल यांच्या नृत्यवर्गात मी पुन्हा दाखल झाले होते. साधारण सहा महिन्यानंतर मला त्यांनी त्यांच्याबरोबर सहाय्यक शिक्षक म्हणून शिकवायला ठेवले. त्यादरम्यान त्या राहात असलेल्या नालासोपारा इथल्या सोसायटीत सार्वजनिक पूजेनिमित्त नृत्ये बसवायची होती. मॅडमना त्यांच्या या कामात मदत करायला मी शनिवार, रविवार नालासोपाराला जायचे. तेव्हा त्या कार्यक्रमात मी या एक, दोन, तीन गाण्यावर नृत्य केले होते अगदी हुबेहूब. दोन दिवस व्हिडिओ कॅसेट लावून सतत बघून बघून हे गाणं बसवले होते. ते इतके चपखल बसले होते की आजही माझ्या तसेच्या तसे लक्षात आहे. आणि मग काय त्या सोसायटीमधील कार्यक्रमात मी एकदम चमकून गेले. आधीच गाणे प्रचंड हिट होतेच त्यात माझा परफॉर्मन्स लोकांना खूप आवडला. या गाण्याने आणि माधुरीने माझ्यावरसुद्धा मोहिनी घातली नसती तर नवलंच म्हणावं लागलं असतं.

मला असलेलं श्रीदेवीचं वेड माझ्या जवळच्या लोकांना माहित होतं. तिचे डायलॉग मी आरशात बघून बोलायचे वैगेरे आणि नंतर भावली ती माधुरी. तिच्या नृत्यातील हावभावांनी जणू वेडच लावलं होतं. गाण्यातील एका ओळीत हावभावांची प्रचंड विविधता, मग ते भुवया उंचावणे असो, डोळे किलकिले करणे असो वा डोळा मारणे असो इत्यादी इत्यादी. हे सर्व प्रकार मी आरशासमोर उभे राहून करायचे. तिचा अख्खा तेजाब पिक्चर तोंडपाठ झाला. सुरुवातीला तिच्या केसांचा राऊंड स्टेपकट असायचा. मग मीही तसाच हेअरकट पण करून घेतला होता. इतकी दिवानी झाली होती मी तिची.

मग काय वर्षागणिक तिचे चित्रपट येत गेले, ती नाचत गेली आणि आपण मोहित होत गेलो. एक मोठीच्या मोठी यादीच आहे तिच्या नृत्यांची आणि त्यातून शिकायला मिळालेल्या गोष्टींची. उपजतच सुंदर असलेले तिचे व्यक्तिमत्त्व नंतर नंतर तिने कमालीचे खुलविले. ती हसताना सरळ ओळीत असलेले तिचे दात आणि तिच्या हसण्याचा तो आवाज अरे काय सांगू, अहो निखळ हास्याची देणगी लाभली आहे तिला. सौंदर्याबरोबरच सशक्त आणि कसदार अभिनय, उत्तम आणि प्रचंड तयारीच्या नृत्याने ती लाखो दिलोंकी धडकन बनली.

खूपखूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की एका मराठमोळ्या मुलीने या हिंदी चित्रपटसृष्टीच्या मायानगरीत सुपरस्टारपद भूषविले आणि निभावलेही. मी तिच्या जवळजवळ सर्वच नृत्यांवर नृत्ये केली आहेत आणि नृत्यवर्गांत बसवलीसुद्धा आहेत. तिच्या नृत्यांतून शिकण्यासारखं खूप काही आहे आणि या तिच्या नृत्यातील छटांचा आपण पुढील भागात सविस्तर वेध घेणार आहोत. 


माझ्या आठवणीतील होळी

  होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत स...