Monday, 29 March 2021

माझ्या आठवणीतील होळी


 होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत सगळ्यांनाच खूप प्रिय असा आहे. नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. विविध रंगांनी नटलेला हा सण साजरा करण्याचे प्रकार सुद्धा विविधरंगी आणि विविधढंगी असतात. होळी आणि रंगपंचमी या दोन दिवसात प्रथा आणि परंपरेनुसार होळी मातेच्या साग्रसंगीत पूजेबरोबरच अनेक गोष्टींची आणि मजेची लयलूट असते. परंपरा, पद्धती या जरी वेगवेगळ्या असल्या तरी एका गोष्टीत सगळीकडे साम्य असते ती म्हणजे धम्माल, मज्जा, मस्ती.

लहानपणी आमच्या परळला होळीच्या आयोजनाची दोन महिने आधीपासूनच तयारी असायची. समवयस्क मुलामुलींचा होळीच्या सणाची मज्जा घेतली आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, सर्वांनी एकत्र येऊन त्याचा आस्वाद घ्यायचा आणि मग रात्रभर साखळीवाणी, वीष-अमृत अथवा गाण्याच्या भेंड्या खेळत होळीच जागरण करायचे. दुसऱ्या दिवशी सकाळपासून रंगपंचमी खेळण्यासाठी आमची सगळी टोळी तयार असायची. होळीच्या त्या रंगीबेरंगी आठवणी अजूनही तशाच ताज्यातवान्या आहेत.

मी लहानपणापासूनच नृत्यकलेशी जोडले गेल्यामुळे होळीच्या दिवशी बॉलिवूडमध्ये गाजलेल्या होळीच्या गाण्यांवर नृत्य करणे स्वाभाविकच होते. रेडिओवर त्या दिवशी सगळी होळीची गाणी लागायची. मग काय त्या गाण्यांवर मनसोक्त थिरकायचं आणि रंगपंचमीची मजा लुटायची.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत होळी सणावर असंख्य गाणी रचली गेली आहेत. आपल्या जुन्या-नवीन कलाकारांनी रुपेरी पडद्यावर होळीच्या रंगांचा मनमुराद आनंद लुटला आहे. आज ना छोंडेंगें बस हमजोली, होली के दिन दिल खिल जाते है, अरे जारे हट नटखट, मलदे गुलाल मोहे, होळीचं सोंग घेऊन, नेसते पैठणी चोळी गं, खेळताना रंग बाई होळीचा, आमचे दाराशी हाय शिमगा इत्यादी अशी शेकडो नृत्यमग गीते आपल्याला चित्रपटसृष्टीने दिली आहेत. त्यांचे चित्रीकरण बघितले की नेहमी वाटायचे की आपण का नाही अशी रंगपंचमी खेळत.

त्याकाळी राजकपूर यांच्या घराण्याच्या होळीबद्दल खूप आकर्षण असायचे. संध्याकाळी टीव्हीवरील बातम्यांमध्ये हमखास त्यांच्या होळीचे चित्रीकरण दाखवायचे. पाण्याने भरलेला हौद, ढोल वाजवणारी मंडळी आणि त्यावर ताल धरून नाचणारी कलाकार मंडळी. हे सर्व बघायला खूप मज्जा यायची. अलीकडच्या काळात अशा पद्धतीच्या होळी उत्सवाचे आयोजन बरेच कलाकार करताना दिसतात. मराठी चित्रपटसृष्टीतही गेली कित्येक वर्षे असे आयोजन होताना दिसत आहे. इतकंच काय तर सोसायट्यांमध्ये डीजे वैगेरे लावून हा उत्सव एकदम जोशात साजरा केला जातो.

कोकणात होळीला पालखी निघते जी वाजत गाजत जवळजवळ महिनाभर गावात फिरत असते. या सणाकरीता मुंबईहून कोकणात खास गावी जाणाऱ्यांची संख्याही भलीमोठी आहे. गोकुळातल्या राधा-कृष्णावरील होळीच्या गाण्यांचे अनेक दाखले आपल्याला बघायला मिळतात. अशा या रंगीबेरंगी रंगांच्या सणाचे विलोभनीय दर्शन आपल्याला सगळीकडे बघायला मिळते.

भविष्यात लहानपणापासून आकर्षण ठरलेल्या चित्रपटातील होळीप्रमाणे होळी साजरी करण्याचा मानस आहे. नृत्यवर्गातील लहान-मोठ्या सर्व विद्यार्थ्यांसमवेत रंगांची उधळण पिचकाऱ्या, ओढण्या, ढोल, ताशे, डफ, पाण्याचा हौद, जेजे चित्रपटात पाहिलं गेलंय तेते सगळं अनुभवायची खूप इच्छा आहे. अशी ही टोटल फिल्मी होळी साजरी करून त्यांचे अंतरंग मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवायचे आहेत.  

-    कविता कोळी  

Monday, 12 October 2020

आईचा जोगवा मागेन (लोकनृत्य जोगवा /गोंधळ)

 

एकनाथ महाराजांचे हे पद सर्वज्ञात आहे. जोगवा म्हणजे देवीच्या नावाने कोरडी भिक्षा मागून तेवढेच अन्न शिजवून उदरनिर्वाह करणे. देवीभक्तांचा एक स्तर जन्मभर जोगवा मागून जगत आहे. जोगवा मागणारी जोगतीण म्हणजे देवीला समर्पित केलेली स्त्री. कायद्याने बंदी असूनही समाजातील शेकडो स्त्रिया आजही देवीला वाहिल्या जातात. हातात परडी म्हणजेच बांबूची टोपली, भंडारा, कुंकू आणि कवड्यांची माळ घेऊन जोगवा मागून जगणे हा या जोगतिणिंचा धर्म मानला जातो. मराठी लोकधर्मात जोगवा हा एक उपासना प्रकार म्हणून रुढ असला तरी सध्याच्या काळात समाजाने या उपासना प्रकाराला लोकनृत्य म्हणून नामाभिधान दिले आहे.

मला कळायला लागलेल्या वयापासून मी जोगवा हे नृत्य पाहत आले आहे. त्यावेळी परळ, लालबाग या परिसरात अनेक नृत्यसंस्था होत्या ज्या महाराष्ट्राच्या लोककलेवर आधारीत नृत्यांचा कार्यक्रम करत असत. त्या कार्यक्रमांमध्ये हे जोगवा नृत्य हमखास बघायला मिळत असे. या नृत्यात विशेष करून जोगवा या उपासना प्रकारात असलेले सर्व प्रकार नृत्याच्या स्टेप्समध्ये गुंफलेले असतात. जसे पदर घेऊन जोगवा मागणे, हातात परडी घेऊन रंगमंचावर वावरणे याशिवाय देवीची सर्व रुपे दाखवणे, दैत्यांचा संहार आणि सर्वागत शेवटी केसांचा आंबाडा सोडून मान गरगरा फिरवून अंगात आल्याचा अभिनय करणे. काही वेळा ही नृत्ये अतिशय प्रभावीपणे बसवलेली असतात. या देवीच्या सात्विक भावांबरोबरच रौद्र अवतारांचाही समावेश असल्यामुळे अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो.

नऊवारीच्या पोशाखात हा नृत्यप्रकार केला जातो आणि त्या साडीचा रंग विशेष करून हिरवा किंवा लाल असतो. कपाळावर मळवट भरलेले असते तर गळ्यात कवड्यांची माळ असते. हा नृत्यप्रकार मुलेसुद्धा सादर करतात. ज्यात ते हिरव्या रंगाची साडी नेसून संपूर्ण पेहराव हा मुलींसारखा करतात. जोगवा या मराठी चित्रपटातील लल्लाटी भंडार हे गीत या जोगवा नृत्यप्रकारासाठी गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड गाजले आहे आणि या गीतावर मुलीं इतकीच मुलांचीसुद्धा नृत्य करण्याची संख्या जास्त आहे.

महाराष्ट्रातील लोककलेत जोगवा प्रमाणे गोंधळ या लोककलेचे स्थानसुद्धा महत्त्वाचे आहे. गोंधळी ही देवीच्या भक्तांची भटकी जात आहे. हे गोंधळीसुद्धा देवीचे उपासक असून ते गोंधळ या विधिनाट्याद्वारे मंगलकार्याची सांगता करतात. या परंपरागत लोककलेचेसुद्धा रंगमंचावर सादरीकरण करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. साधारण सहा ते आठ जणांचा समूह हे नृत्य करताना दिसतो. यात प्रामुख्याने देवीची स्तुतीगीते असून तुणतुणे, संबळ आणि डिमडी ही वाद्ये वापरली जातात. त्यांच्या पोशाखात झब्बा किंवा पायघोळ अंगरखा, धोतर किंवा पायजमा, डोक्यावर मावळा टोपी आणि कमरेला शेला या गोष्टींचा समावेश असतो. गळ्यात कवड्यांची माळ आणि कपाळावर हळदीकुंकवाचा मळवट असतो. आई भवानी तुझ्या कृपेने, आई अंबाबाई उदो, उदे गं अंबे उदे अशा सुंदर रचना असलेली अनेक गीते आहेत ज्यावर ही नृत्यकला प्रभावीपणे सादर करता येते. म्हणून अनेक शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या आवडीच्या आणि प्रथम पसंतीच्या अशा जोगवा आणि गोंधळ या दोन लोककला संपूर्ण महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहेत. 


Monday, 5 October 2020

येळकोट येळकोट जयमल्हार (लोकनृत्य – वाघ्यामुरळी)

 यळकोट यळकोट जयमल्हार... हे शब्द कानी पडताच ताबडतोब आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते जेजुरीच्या खंडेरायाचे रुप आणि मग त्यामागोमाग मन हलकेच जेजुरीच्या वातावरणात जाऊन रमायला लागते. आमचे कुलदैवत असल्यामुळे लहानपणी जेजुरीला नेहमी जाणे होत असे. गडाच्या त्या अगणित पायऱ्या चढून खंडेरायाचे दर्शन घेण्यात एक वेगळे दिव्य अनुभवायला मिळायचे. जेजुरीचे सगळे वातावरण एकदम प्रफुल्लित आणि भक्तीभावाने भारलेले असते आणि या सगळ्या वातावरणात सर्वात जास्त मोहित करतो तो भंडाऱ्याचा सर्वत्र दरवळलेला सुगंध.

गडाच्या पायऱ्या चढताना बऱ्याच ठिकाणी आपल्या गोंधळी आणि वाघ्यामुरळी हे देवाचे उपासक नजरेस पडतात. खंडोबाचे संकिर्तन करणे, हीच त्यांची उपासना असते. हे वाघ्या-मुरळी बनण्यासाठी विशिष्ट असा दिक्षाविधी असतो तो झाल्याशिवाय कुणीही वाघ्या-मुरळी होत नाही. वाघ्या म्हणजे पुरुष आणि मुरळी म्हणजे स्त्री. वाघ्याच्या हातात दिमडी हे वाद्य असते तर मुरळीच्या हातात छोटी घंटी हे वाद्य असते. वाघ्यांचे जागरणाचे कार्यक्रम गोंधळाप्रमाणे असतात यात रात्रभर एक वाघ्या तुणतुणे वाजवितो, दुसरा खंजिरी वाजवून गाणे म्हणतो आणि मुरळी एका हाताने घंटी वाजवत नृत्य करीत असते.

जेजुरीला पाहिलेल्या या वाघ्यामुरळीनंतर प्रत्यक्षात भेटल्या त्या नृत्यरुपाने म्हणजेच वाघ्यामुरळी या नृत्याने आणि हे नृत्य म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येणारे एकमेव नाव म्हणजे शाहीर साबलळे. त्यांच्या जेजुरीच्या खंडेराया या गीताने अख्या महाराष्ट्राला वेड लावले. मी या गाण्यावर शाळेत असल्यापासून नाचतेय ते आतापर्यंत. वेगवेगळ्या वयोगटावर हे नृत्य किती वेळा बसवले असेल याचा हिशोबच नाही आणि त्या प्रत्येक वेळी ते नव्याने अनुभवले आहे. इतके प्रतिभावान असे हे गीत आहे यासाठी माननीय शाहीर साबळे यांना मानाचा मुजरा.

त्यानंतरसुद्धा खंडोबाची बरीच गाणी आली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली हे छगन चौगुले यांचे गीतसुद्धा गेल्या काही वर्षांत खूप गाजले. देवदत्त साबळे यांनी गायलेले मल्हारी देवा मल्हारी, जय मल्हार या मालिकेतील बानू बया बानू बया इत्यादी अशी अनेक गाणी वाघ्या-मुरळी या नृत्यासाठी विचारात घेण्यासारखी आहेत.

महाराष्ट्राच्या लोकनृत्य परंपरेतील हा अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय आणि गाजलेला नृत्यप्रकार आहे. जो आपल्याला शाळा कॉलेजमध्ये हमखास बघायला मिळतो. नृत्यामध्ये हे वाघ्या बाराबंदी, पायजमा, मावळाटोपी, कमरेला शेला, खांद्यावर तिरकी कवड्या लावलेली भंडाऱ्याची पिशवी आणि गळ्यात कवड्यांची माळ तर हातात दिमडी हे वाद्य या पेहेरावात दिसतात आणि मुरळी या नऊवारीच्या संपूर्ण वेषात कपाळाला भंडारा लावलेल्या असतात. अतिशय उर्जेचे आणि तितकेच भावनाप्रधान आणि हावभावपूर्ण असे हे नृत्य असून यात वाघ्या आणि मुरळी खंडोबाचे देवाचे कौतुक त्यांची रुपे तसेच जेजुरी गडाचे वैशिष्ट्य नृत्याच्या स्टेप्समधून दाखवतात. या सुंदर अशा लोकनृत्याचा वारसा गेली कित्येक वर्षे आपण नृत्यातून जपतोय आणि यापुढेही जपत राहू यात शंकाच नाही. 


Monday, 28 September 2020

पहिली पसंती कोळीनृत्याला

 महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकनृत्यांपैकी एक असलेले हे कोळीनृत्य मुलामुलींच्या समूहात केले जाते. तर काही नृत्ये ही नुसत्या मुलींची अथवा स्त्रियांचीसुद्धा असतात. या नृत्यात व्हलव्ह हलवून बोट चालवणे, जाळे फेकून मासे पकडणे, टोपलीत मासे वेचणे इत्यादी अशा त्यांच्या व्यवसायाशी निगडीत स्टेप्स बघायला मिळतात. याशिवाय ठरलेल्या काही पारंपरिक स्टेप्स असतात ज्या हमखास आपल्याला बघायला मिळतातच किंबहूना त्याशिवाय कोळीनृत्य पूर्णच होऊ शकत नाही. तसंच मुलामुलींची छेडछाडसुद्धा खूप आकर्षक पद्धतीने या नृत्यात दाखवली जाते.

काही नृत्यात आपल्याला या जमातीचे वैशिष्ट्यपूर्ण लग्न आणि वरातसुद्धा बघायला मिळतात आणि मग लगेच आपल्या तोंडी या गो दांड्यावरनं नवरा कुणाचा येतो हे कोळीगीत आपसुकच येतं. आपल्या पिढीतील जवळ जवळ सर्वांनाच त्यावेळच्या कोळीगीतांनी वेड लावले होते. ती सर्व कोळीगीते एक तर तोंडपाठ असायची किंवा माहीत तरी असायची. वेसावकर आणि मंडळी महाराष्ट्राची लोकधारा या कॅसेट तर तुफान चालायच्या तेव्हा.

शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाने कोळी गीतांना आणि कोळी नृत्याला घराघरात पोहोचवले होते. शाहीर कृष्णराव साबळे, शाहीर विठ्ठल उमप, शाहिर दामोदर विटावकर यांनी कोळीगीतांमध्ये आणि लोकगीतांमध्ये दिलेल्या योगदानाने आजच्या पिढ्यानपिढ्या समृद्ध झाल्या आहेत. शाहिर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारामधील जवळ जवळ सर्वच गीते, तर शाहीर विठ्ठल उमप यांची ये दादा अवार ये तसंच आज कोळीवाड्यात येईल वरात ही प्रसिद्ध कोळी गीते याशिवाय शाहीर दामोदर विटावकर यांचे गौरी गणपतीचे सणाला हे गीत अशी अनेक उदाहरणे आहेत. खूप वर्षे आधी शाहीर विठ्ठल उमप यांच्यासोबत एक कार्यक्रम करण्याचा योग आला होता ज्यात माझ्या संस्थेच्या कलाकारांची चार कोळीनृत्ये सादर झाली होती. त्यावेळी उमपदांसारख्या महान कलाकाराची कला जवळून बघता आली होती.

याशिवाय वेसावकर आणि मंडळी यांची मी हाय कोळी, एकविरा आई तू डोंगरावरी, पारू गो पारू वेसावची पारू अशी अनेक एकापेक्षा एक सरस आणि वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक कोळी गीते आहेत जी आपल्याला कोळी नृत्याकरीता खुणावत असतात आणि याची प्रचिती आपल्याला कोणत्याही लग्नसमारंभात अथवा हळदी समारंभात येते. नृत्य येत असू दे वा नसू दे या कोळीगीतांवर आत्मविश्वासाने ताल धरून नाचताना अनेकजण दिसतात.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही या कोळीनृत्यांनी अनेक काळ गाजविले आहेत. कशी झोकात चालली कोळ्याची पोर, ही पोळी साजूक तुपातली, गळ्यान साखळी सोन्याची, बॉबी चित्रपटातले झुठ बोले कौंआ काटें आणि सगळ्यात लोकप्रियतेचा शिखर गाठलेले सैलाब चित्रपटातले माधुरी दीक्षितचे हमको आज कल है इंतजार हे कोळी गीत. माझ्या आतापर्यंतच्या नृत्यप्रवासात अगणित वेळा कोळीनृत्ये बसवली गेली आहेत आणि सादरही केली आहेत. मला आठवतंय एक कार्यक्रम आम्ही तीस मिनिटांचा फक्त कोळी नृत्यांचा केला होता. तो ही नॉनस्टॉप आणि त्या कार्यक्रमाला समोर बसलेल्या प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.

लता मंगेशकर आणि हेमंतकुमार यांनी गायलेले मी डोलकर दर्याचा राजा या गीतावरसुद्धा असंख्य वेळा नृत्य करण्याचा योग आलाय. आयबापाची लाडाची लेक मी लारी या ओळीतील लतादीदींचा तो सूरीला आवाज आहाहाः काय वर्णन करावे, या गीताचे केवळ अप्रतिम आणि तशीच आर्तता प्राजक्ता शुक्रेच्या आत्ताच्या रिमिक्स व्हलव्ह रे नाखवा या गीतातसुद्धा अनुभवायला मिळते. काळानुरुप होत असलेले बदल अथवा नवनवीन प्रयोग हे कुठे चांगले कुठे वाईट जरी असले तरी कोळीगीते आणि कोळीनृत्ये ही नेहमीच आपल्या मनावर राज्य करीत असतात.

छोट्यांपासून, मोठ्यांपर्यंत अंगात पटकन सामावून जाणारे असे हे नृत्य आहे जे कधीही कुणीही सहज करू शकते आणि म्हणूनच माझ्या नृत्यवर्गात या नृत्याला पहिली पसंती असते. 

Monday, 21 September 2020

आपलेसे वाटणारे कोळी नृत्य (भाग १)



 शाळेचे गॅदरिंग असो, सोसायटीचे फंक्शन असो अथवा लग्नकार्यात नाचण्याची संधी असो प्रत्येकाला आपलेसे वाटणारे आणि सहज ठेका धरुन नाचायला येणारे नृत्य म्हणजे कोळी नृत्य. बच्चे कंपनीपासून थोरामोठ्यांपर्यंत कोळीनृत्याला हमखास आणि विशेष पसंती नेहमीच मिळत असते. मला आठवतं शाळेच्या गॅदरिंगमध्ये चित्रपटनृत्यांना परवानगी नसल्यामुळे एक वर्ष आड बहुधा आमची पसंती आणि पावले कोळी नृत्यांवरच थिरकायची – सर्वात सहज आणि सोपं आणि तितकंच आकर्षक आणि मनाला भिडणारं हे नृत्य.

त्या काळात भाड्याने ड्रेस आणून नृत्य करणं कुणालाही परवडायचं नाही. त्यामुळे आईची एखादी काठापदराची सहावारी साडी गुडघ्यापर्यंत नेसायची, तिच्याच ब्लाऊजला आतून शिलाई घालून तो जेमतेम आपल्या मापाचा करण्याचा आटोकाट प्रयत्न जो बहुतांशी फसलेलाच असायचा आणि त्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी असल्यास उत्तमच नसेल तर कोणत्याही रंगाची ओढणी दोन खांद्यांवर क्रॉस करून टाकली की झालो आम्ही कोळी नृत्यासाठी तयार आणि हे नृत्य अजून बहारदार बनवायला व्हलव्ह आणि टोपल्यांची जोड दिली तर बहारच यायचा. पुठ्याला बदामाच्या आकारात कापून त्याला रंग मारून त्या पुठ्याला एका काठीला खिळे मारून ठोकले की व्हलव्ह तयार होत असे आणि भाजीची टोपली काय अगदी सहज कुणाकडेही मिळून जायची. ज्या वर्गाने ही मेहनत घेतलेली असायची त्यांचे कोळी नृत्य बघायला अजून मजा येत असे.

कोळीनृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारतालाच वेड नाही लावलं तर याची ख्याती पार सातासमुद्रापलिकडेही पोहोचली आहे. जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या कोळी नृत्याचे मूळ म्हणजे कोळी समाज. हा कोळी समाज प्रामुख्याने मासेमारी करत असल्याने समुद्रकिनाऱ्यावर त्यांची वस्ती असते. हा समाज देवांवर जास्त विश्वास ठेवतो. श्री एकविरा देवी लोणावळा आणि जेजुरीचा खंडोबा हे त्यांचे दैवत आहे. दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी होडी किंवा बोटीची पूजा करून ते समुद्रात व्यवसायासाठी उतरतात. सोन्याचा मुलामा दिल्यासारखा नारळ वाजतगाजत समुद्राला अर्पण करतात. या दिवशी कोळीवाड्यात मोठ्या उत्सावाचे स्वरुप असते. नारळीपौर्णिमेप्रमाणे होळी या सणाचंही विशेष महत्त्व असते. तसेच या समाजात हळदी आणि लग्नसमारंभही मोठ्या उत्साहात आणि आनंदाज साजरे होत असतात. हे लोक मासळीला म्हावरं म्हणून संबोधतात.

कोळी लोकांचे पारंपरिक परीधान करावयाचे पोशाख म्हणजे स्त्रियांसाठी लुगडे (बारा वार नऊवारी), दोन्ही खांद्यावर मोठ्या फुलांची डिझाईन असलेली ओढणी (फडकी) तर पुरुष कमरेला रुमाल (लुंगी) आणि शर्ट आणि डोक्यावर कानटोपरं म्हणजेच टोपी असा पेहराव असतो. कोळी स्त्रियांना दागिन्यांची खूप आवड असते. अशा या सर्वांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कोळी नृत्याचा त्यात वापरल्या जाणाऱ्या एकापेक्षा एक सरस आणि वैशिष्ट्यपूर्ण गीतांचा आणि संगीतांचा तसंच त्यामध्ये काळानुरुप होत गेलेल्या बदलांचा आपण पुढील भागात आढावा घेणार आहोत. 

Monday, 14 September 2020

लोकनृत्यांचा अनमोल खजिना


लहान वयातच माझे नृत्यकलेवर प्रेम जडले, या कलेविषयी ओढ निर्माण झाली आणि मग ही नृत्यकला वेगवेगळ्या शैलींमधून अंगी बाणवायचा प्रयत्न करू लागले जो आजही सुरु आहे. शाळेत असताना गॅदरिंगमध्ये कोणत्याही चित्रपट गीतांवर नृत्य करायला परवानगी नसायची. त्यामुळे कुठले ना कुठले लोकनृत्य बसवण्याकडे आमचा कल असायचा. त्यामुळे कोळीनृत्य, शेतकरी नृत्य, भांगडा, आदिवासी ठाकर नृत्य, वाघ्यामुरळी इत्यादी अनेक नृत्यांचा परिचय झाला आणि या लोकनृत्यांवर, त्यांच्या संगीतावर प्रेम जडू लागले. अतिशय समृद्ध आणि प्रचंड उर्जा असलेली अशी लोकनृत्यांची परंपरा आपल्याला लाभली आहे

लोकनृत्यांच्या प्रेमापोटी इयत्ता आठवीत असताना मी कलादर्शन या संस्थेत लोकनृत्य शिकण्यासाठी आणि सादरीकरण करण्यासाठी प्रवेश घेतला. दोन वर्षांत अनेकविध भारतीय लोकनृत्ये शिकायला तर मिळालीच परंतू वेगवेगळ्या कार्यक्रमांतर्गत पाहायलासुद्धा मिळाली. लाईव्ह संगीतावर नृत्य करायची मजा काही वेगळीच असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला, असं म्हणतात ना की मूल लहान असतानाच त्याच्यावर योग्य ते संस्कार होऊ शकतात. नेमकं हेच माझ्या बाबतीत झालं. अगदी शालेय जीवनातच ही लोकनृत्ये जवळून पाहाता आली, शिकता आली आणि त्यामुळे ही लोककला अंगाअंगात भिनली.

आपल्या देशाला लोकनृत्यांची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परंपरा लाभलेली आहे. संपूर्ण जगात भारतीय शास्त्रीय नृत्याला जितकं महत्व आहे तितकाच भारतीय लोकनृत्यांनाही जागतिक दर्जा मिळालेला आहे. जनसामान्यांमध्ये प्रचलित असलेली परंपरागत नृत्यप्रकार म्हणजेच लोकनृत्य होय. ही नृत्ये साधारणपणे सामुहिक स्वरुपात सादर होतात आणि त्यांना तालवाद्यांची आणि लोकसंगीताची साथ असते. प्रत्येक राज्यागणिक या नृत्यकलेचे स्वरुप, संगीत, नृत्यरचना, वेशभूषा ही त्या त्या राज्याच्या परंपरेतून विकसित झालेली आहे. भारतातील आदिवासी जमातीत आणि जनजीवनात तर लोकनृत्यांची प्रदीर्घ परंपरा आढळते. भारतीय लोकनृत्यांचे असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यात आपण जितके खोलात शिरू तितका या नृत्यांचा बहुमोल खजिना आपल्याला सापडत जातो.

भारतीय लोकनृत्ये ही राष्ट्रीय संस्कृतीचा अनमोल ठेवा असून भारताच्या प्रत्येक प्रदेशात तिथल्या प्रदेशाची वैशिष्ट्ये दाखवणारी विविध नृत्ये आहेत. इथे काही उदाहरणे आपल्याला होता येतील. आसाममधील बिहू तसंच नागा जमातीचे नागा-नृत्य, बिहारमधील आदीवासी संथाळ नृत्य, पंजाबमधील भांगडा नृत्य तर कायम आकर्षणाचा भाग ठरले आहेत. भारताच्या दाक्षिणात्य प्रदेशातील करकट्टम, कुमी, कोलाकट्टम ही नृत्ये, राजस्थानमधील घुमर, कालबेलिया, गुजरातमधील गरबा दांडिया इत्यादी अशी अनेक वैविध्यपूर्ण लोकनृत्ये आहेत.

भारतातील या असंख्य वेगवेगळ्या लोकनृत्यांइतकीच विविधता आपल्या महाराष्ट्रातील लोकनृत्यांतही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीला तर लोकनृत्यांचा खूप मोठा वारसा आहे. गौंड, भिल्ल, कातकरी, तारपा, ठाकर, कोरकू, टाकळा अशी अनेक लोकनृत्ये निरनिराळ्या भागत रुढ आहेत. विदर्भातील दंडार नृत्य, महाराष्ट्राच्या सागर किनारी भागातील कोळी नृत्ये, त्याचप्रमाणे धनगर नृत्य, शेतकरी नृत्य, टिपरी, जाखडी नृत्य, गोफ नृत्य, कोकणातील बाल्या नृत्य, जोगवा, गोंधळ, वाघ्यामुरळी, गौरीगणपतीत खेळले जाणारे झिम्मा, गोफ, टिपऱ्या हे नृत्यप्रकार तसंच महाराष्ट्राच्या तमाशा या लोकनाट्यप्रकारातील लावणी हा अत्यंत लोकप्रिय नृत्यप्रकार हे सर्व नृत्यप्रकार लोकनृत्य या संकल्पनेखालीच मोडतात आणि याच विविध लोकनृत्यप्रकारांची वैशिष्ट्ये, महत्त्व यांचा वेध आपण पुढील भागांतून घेणार आहोत.

Monday, 7 September 2020

घुंगरु एक दागिना


 संपूर्ण जगात आपल्या भारतीय पारंपरिक नृत्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. भारतीय इतिहासात तर नृत्यांची एक अनोखी भूमिका आहे. या सर्व नृत्यशैलींमध्ये म्हणजे भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपूडी, मणिपुरी, कथकली इतकंच काय तर भारतीय लोकनृत्यांतसुद्धा घुंगरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नृत्यशैली कोणतीही असो ती घुंगरुंशिवाय परिपूर्ण नाहीच. ही नृत्यकला शिकणाऱ्या प्रत्येक नृत्यांगनेसाठी तो महत्त्वाचा दागिना आहे.

छोट्या सुपारीचा आकार असलेले हे घुंगरु पितळेचे असून त्याच्या आत एक लोखंडी खडा असतो. ज्याच्या हालचालींमुळे घुंगरुंचा वाजण्याचा आवाज येतो. हे घुंगरु प्रत्येक नृत्यशैलीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारात बांधण्याची प्रथा आहे. जसे भरतनाट्यममध्ये हे चामड्याच्या पट्ट्यावर शिवलेले असतात तर कथ्थक, लावणी अथवा इतर लोकनृत्यांसाठी हे पांढऱ्या रंगाच्या दोरीमध्ये गुंफलेले असतात. कथ्थकमध्ये वयानुसार घुंगरु दिले जातात. अगदी लहान वयात शिकायला सुरुवात केलेल्या विद्यार्थ्यांसठी याची संख्या दहापासून सुरु होते मग ती पंचवीस, पन्नास, शंभर करता करता दिडशे घुंगरुंपर्यंत पोहोचते. हे बांधताना पायाला आधी नीकॅप लावायला लागते आणि मग त्यावर एकामागोमाग वेटोळ्याच्या रुपात बांधावे लागतात. नृत्याची आवड असलेल्या प्रत्येकाला या घुंगरुंचे प्रचंड आकर्षण असते. मग ती व्यक्ती कोणत्याही वयोगटाची असो तिला आपण कधी एकदा घुंगरू घालून नाचतोय असे होऊन जाते.

प्रत्येक नृत्यात या घुंगरुचे महत्त्व खूप मोठे आहे. कथ्थक नृत्यात महत्त्वाचा असलेल्या पदंन्यास करण्यासाठी तर याचे विशेष महत्त्व आहे. हा पदंन्यास जितका प्रगल्भ तितका या घुंगरुंचा येणारा आवाज कर्णमधूर वाटतो. लोकनृत्यातला पदंन्याससुद्धा या घुंगरुंमुळे अतिशय नेत्रसुखद होतो. विशेषतः आदीवासी तारपा, ठाकर तसंच बाल्या नृत्यात याची विशेष प्रचिती येते.

महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय असलेल्या लोकनृत्य प्रकार लावणी यातसुद्धा या घुंगरुंचा पदंन्यास रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा असतो. नृत्यकलाकाराकरीता घुंगरु हे देवस्थानी असतात. प्रत्येक नृत्याच्या आधी मग ती शैली कुठलीही असो, या घुंगरुंना मनोभावे नमस्कार करून मगच पायात बांधले जातात. नृत्यसादरीकरण अथवा नृत्याचा रियाज झाल्यावर या घुंगरुंची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना व्यवस्थित गुंडाळून कपड्यात बांधून ठेवले जाते. घुंगरु घालून पायात चप्पल न घालणे अथवा घुंगरु घालून शौचालयात न जाणे यासारख्या गोष्टींचे पालन हे त्यांचे पावित्र्य आणि महत्त्व अधोरेखित करतात. अशा या घुंगरुंचे आकर्षण माझ्यासारख्या शेकडो नृत्यांगणांना लहानपणापासून असतेच आणि ते नृत्याच्या अभ्यासाच्या वर्षांगणिक वाढतच जाते.  


Monday, 31 August 2020

मनोरंजन मनोरंजन आणि केवळ मनोरंजन

हिंदी चित्रपट संगीत आणि नृत्यांनी फार पूर्वीपासून ते आताच्या काळापर्यंत माझ्यासारख्या लाखो नृत्यांगनांना थिरकायला लावलंय. या बॉलिवूडच्या गाण्यांची, नृत्यांची, कोरिओग्राफीची, सिग्नेचर स्टेप्सची, स्टाईलची, अदांची, हावभावांची अशा अनेक गोष्टींच्या जादूने आपल्या आयुष्याला कळत नकळत स्पर्श केलेला आहे. एखादी तीन वर्षांची चिमुरडी असो वा सत्तरीतल्या एखाद्या आजीबाई...बॉलिवूडच्या जादूपासून कुणीही वंचित राहिलेले नाही. कुणी आपल्या शालेय जीवनात तर कुणी कॉलेजच्या दिवसांमध्ये, कुणी लग्न कार्यांत तर कुणी सोसायटीच्या समारंभात कोणत्या ना कोणत्या गाण्यावर नृत्य करून ते दिवस गाजवलेले असतात. बॉलिवूड गाण्यांवरील नृत्यांच्या अनेक आठवणी त्यांच्या संग्रही असतात.

जून्या अभिनेत्रींपासून आत्ताच्या काळातील अभिनेत्रींपर्यंत प्रत्येकीने आपल्या नृत्यकलेतून अनेक चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, शिकवल्या आहेत. कुणाची लयबद्धता अतिशय सुरेख आहे तर कुणाची उर्जा एकदम भन्नाट, कुणी हावभाव देण्यात अव्वल नंबर तर कुणी परिपूर्ण नृत्यांगना. या अभिनेत्रींना थिरकायला लावणाऱ्या नृत्यदिग्दर्शकांच्या नृत्यांतूनही आपले ज्ञान असंच समृद्ध झालं आहे किंबहुना त्या नृत्यदिग्दर्शकांचे श्रेयच जास्त मोलाचे आहे. प्रत्येकाच्या नृत्यप्रवासात किंवा करिअरमध्ये आलेले उतार-चढाव आपला हुरूप वाढवणारे ठरले आहेत. नृत्य ही ज्यांची नुसती आवड आहे त्यांनाही आणि ज्यांनी या कलेशी नाते आपल्या आयुष्याशी जोडले आहे त्यांनाही बॉलिवूडच्या नृत्यकलेने परमोच्च आनंद दिला आहे.

नृत्यवर्गात शिकवताना नवनवीन गाण्यांचा, नृत्यांचा आणि स्टाईलचा एक प्रभाव असतो. हे आजच नाही फार पूर्वीपासून चालत आले आहे. त्या त्या प्रसिद्ध गाण्यांवर आधारित नृत्यांप्रमाणे त्या अभिनेत्रींप्रमाणे आपल्याला नृत्य करायचं असतं, हावभाव द्यायचे असतात आणि तसं करण्यात जर आपण यशस्वी झालो तर आपल्याला खूप आनंद होतो. हा आनंद हे समाधान आपल्याला बॉलिवूडच्या नृत्यकलेने पार पूर्वीपासून दिलेले आहे.

टीव्हीवरील नृत्यावर आधारित जितके कार्यक्रम आपण बघतो त्यात भाग घेतलेल्या प्रत्येकाने आपल्या नृत्यकलेसाठी प्रचंड मेहनत घेतलेली असतेच पण ते करत असलेल्या नृत्यात चित्रपटांप्रमाणेच स्टंटबाजी आणि इतर नवनवीन प्रकार बघायला मिळत असतात. प्रत्येक जण कुणाकडून तरी प्रेरित झालेला असतो किंवा त्यांची नृत्यकला बघत, शिकत अथवा त्यांचे अनुकरण करत मोठा होत असतो वा झालेला असतो. हे बॉलिवूडच्या नृत्यांचे गारूड नृत्यप्रेमींच्या मनावर नेहमीच अधिराज्य करत आलेले आहे.

माझ्या नृत्यप्रवासातील बॉलिवूडशी असणारं नातं मी आतापर्यंतच्या ब्लॉगच्या माध्यमातून उलगडत गेले आणि कितीतरी गोष्टी नव्याने जाणवल्या. अभिनेत्रींच्या माध्यमातून माझ्या मनातील बॉलिवूड नृत्यांशी असलेला बंध नव्याने जगायला मिळाला. आशा करते तुम्हालाही तो तितकाच भावला असेल. पुढच्या प्रवासात नृत्य क्षेत्राच्या अशाच विविध पैलूंवर प्रकाश टाकत आपण शब्दांमधूनही नृत्य जगण्याचा आगळावेगळा प्रयत्न करत राहुया. 

Monday, 17 August 2020

राणी-प्रीतीच्या जोडीची जादू


 अमिताभ-धर्मेंन्द्र पासून अगदी शाहरुख सलमानपर्यंत बॉलिवूडमध्ये दोन हिरोंच्या जोड्यांची परंपरा सगळ्यांच्याच माहितीतली. पण तशी जोडी महिला कलाकारांमध्ये पाहण्याचा योग तसा दुर्मिळच. पण ही चाकोरी राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा या दोघींच्या रुपेरी पडद्यावरील एकत्रित येण्याने तोडली. पिया पिया या गाण्यातील दोघींची केमिस्ट्री आजही तितकीच ताजीतवानी करणारी आहे. आपल्या आयुष्यातील एखाद्या जिवलग मैत्रिणीची हमखास आठवण करून देते राणी-प्रीतीची जोडी.

राणीची पार्श्वभूमी टिपिकल बॉलिवूड घराण्याची तर प्रीती झिंटाला असा काही कौटुंबिक वारसा नव्हता. तरी अजब म्हणजे राणीचा प्रवेश झाला तो राजा की आएगी बारात या टिपिकल ए कॅटेगरीत न बसणाऱ्या सिनेमातून आणि प्रीतीचा बॉलिवूड प्रवेश झाला तो शाहरुख खान बरोबरच्या दिल से या ए कॅटेगरी चित्रपटातून. अर्थातच दोघींनी आपल्या पद्धतीने सुरुवात केली आणि भरभरून यशही मिळवलं.    

राणी मुखर्जीचे वडिल राम मुखर्जी हे चित्रपट दिग्दर्शक होते तर आई पार्श्वगायिका होती. भाऊ राजा मुखर्जी सुद्धा चित्रपट निर्माता दिग्दर्शक तर मावशी देबश्री रॉय बंगाली चित्रपटातील यशस्वी नायिका आणि चुलत बहिण काजोल तर सुपरस्टारच. अशा पार्श्वभूमीत असूनसुद्धा राणीला चित्रपटात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंतू तिच्या आईची मात्र प्रचंड इच्छा होती आणि मग काय आपल्या अभिजात सौंदर्यांची भूरळ घालून घाऱ्या डोळ्यांची आणि घोगऱ्या आवाजाची राणी प्रेक्षकांच्या मनाची पण राणी झाली. पुढे पुढे तिचा घोगरा आवाजसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागला.

सौंदर्याबरोबर अभिनयाची आणि नृत्याची उत्तम जाण असलेल्या राणीने अनेक सुपरहिट चित्रपट केले आणि अनेक सुपरस्टार हिरोंबरोबर अनेक ठिकाणी तिच्या अभिनयाबरोबरच नृत्याला सुद्धा वाखणण्यात आले. मुळची ओडीसी नृत्यांगना असूनसुद्धा बॉलीवूड मधल्या सर्व नृत्यशैली तिने उत्तम प्रकारे आत्मसात केल्या होत्या आणि सादरही केल्या होत्या. तिच्या वाट्याला सर्वात जास्त रोमँटिक गाणी आली होती आणि तिने तिच्या सौंदर्य आणि अदांनी खूप सुंदर केली. तिच्या वेगवेगळ्या नृत्यशैलीतील नृत्यांची इथे अनेक उदाहरणे देता येतील. धड़क ध़डक, छलका, तुम्हारी अदाओपे, अगं बाई हल्ला मचाएँ रे प्रत्येक नृत्य तिच्या नृत्यशैलीने हावभावांनी परिपूर्ण असलेले होते. नृत्य वेस्टर्न असो क्लासिकल असो लोकनृत्य असो वा शुद्ध बॉलिवूड राणीने त्या नृत्यांना मनापासून न्याय दिला आहे.

टवटवीत आणि प्रसन्न चेहऱ्याच्या प्रीतीने आपल्या गालावरील खोलगट खळ्यांची जादू सर्वांवर टाकत दिल से चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. हिमाचल प्रदेशमध्ये जन्म झालेल्या आणि आपले संपूर्ण शिक्षण सिमलामध्ये पूर्ण केलेल्या प्रीतीने क्रिमिनल सायकॉलॉजीमध्ये डिग्री घेतली होती. साहित्यात विशेष रुची असलेल्या प्रीतीने कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगमध्ये रस घेतला होता. पहिल्या चॉकलेट जाहिरातीतून तिने ग्लॅमर जगतात आपले पाऊल ठेवले होते. कोणतेही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना तिने शाहरुख, सलमान, आमिर सैफ यासारख्या मोठ्या स्टार्सबरोबर आपल्या अभिनयाची चुणूक तितक्याच ताकदीने दाखवली. सोल्जर, दिल से, कल हो ना हो या चित्रपटातील तिची नृत्ये आपल्याला प्रभावित करून जातात. पंजाबी स्टाईलमधील अनेक नृत्ये जरी तिच्या वाट्याला आली असली तरी तिची विशेष नृत्यशैली मला वेस्टर्न नृत्यप्रकारात जास्त आवडली. ज्यात तिचे व्यक्तिमत्त्व खुलून तर दिसलेच पण त्या नृत्यांच्या अदा मनाला जास्त भावल्या.

दोघींनी भारतीय आणि पाश्चिमात्य नृत्यांना न्याय दिला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे एक टिपिकल छाप तयार झाली ती म्हणजे राणी मुखर्जी म्हटलं की भारतीय स्त्रीचं सौंदर्य दाखवणारी ताकदीची अभिनेत्री तर प्रीती झिंटा म्हटलं की पाश्चिमात्य वेशभूषा आणि नृत्य यांना सहजतेने निभवणारी अभिनेत्री. हर दिल जो प्यार करेगा आणि चोरी चोरी चुपके चुपके चित्रपटातून एकत्रित आलेल्या राणी-प्रीतीची जोडी सहज आणि मनाला नक्कीच भावणारी आहे.  


Monday, 10 August 2020

चुलबुली काजोल

चित्रपट निर्माता दिग्दर्शक शोमू मुखर्जी आणि अभिनेत्री तनुजा यांची मुलगी काजोल हिचा जन्म ५ ऑगस्ट १९७४ सालचा. तिचे शालेय शिक्षण पाचगणी इथल्या कॉनव्हेंट स्कूलमध्ये झाले आहे. चित्रपटसृष्टीचा वारसा आणि वातावरण लहानपणापासून लाभलेल्या काजोलच्या आईच्या कुटुंबातील पणजी रतनबाई आजी शोभना समर्थ यांचे या क्षेत्रात खूप नाव होते. आई तनुजा आणि मावशी नूतन तर प्रसिद्धीच्या शिखरावर हो त्याच वडिलांच्या फॅमिलीत तिचे आजोबा संशाधर मुखर्जी हे महान निर्माता होते. लहानपणी अतिशय खोडकर असलेल्या काजोलने वयाच्या १८ व्या वर्षीच सिनेमात पदार्पण केले.

बेखुदी हा तिचा पहिला सिनेमा फार यशस्वी होऊ शकला नसला तरी तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते आणि अगदी लगेच दुसऱ्या वर्षी म्हणजे १९९३ साली बाजीगर हा तिचा शाहरुख खान बरोबरचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने यशस्वी कमाल केली. काजोल-शाहरुखची जोडी छान जमली. दिलवाले दुल्हनियाँ, कुछ कुछ होता है, कभी खुशी कमी गम अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची खातरजमा या दोघांच्या नावावर जमा होऊ लागली. दिलवाले दुल्हनियाँने तर सर्व रेकॉर्ड तोडून टाकले होते. करण जोहर आपल्या चित्रपटांसाठी काजोलला लकी मानू लागले.

काजोलच्या व्यक्तिमत्त्वात असलेला जबरदस्त आत्मविश्वास आणि तिच्यातला उपजतच असलेला नैसर्गिकपणा सगळ्या प्रकारच्या भूमिकांना न्याय देऊन गेला. मग ती भूमिका चुलबुली असो रोमँटिक असो वा ट्रॅजिडिक किंवा नकारात्मक तिने प्रत्येक भूमिका सशक्तपणे आणि ताकदीने निभावली. पदापर्णातला तिचा लूक फारसा प्रभावी नसूनसुद्धा तिने त्याचा कुठलाही न्यूनगंड तसूभरसुद्धा आपल्या चेहेऱ्यावर वा बॉडी लँग्वेजमध्ये येऊ दिला नाही. इतका प्रचंड आत्मविश्वास तिला स्वतःबद्दल होता. वेगवेगळ्या प्रकारचे रोल करत करत ती एक संपूर्ण अभिनेत्री बनली. सहसा या स्टार लोकांचे पहिले चित्रपट हे नंतरच्या काळात बघताना बऱ्यापैकी बालीश वाटतात.

परंतू काजोलचा बेखुदीमधला वावर हा खूप सहज आणि सुंदर जाणवतो. नृत्याच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. काजोलचे कधीही शुद्ध क्लासिकल किंवा सेमी क्लासिकल शैलीतले नृत्य सहसा आढळलेले नाही. परंतू तिने जी जी नृत्ये सहसा आढळलेले नाही. परंतू तिने जी जी नृत्ये केली त्यांची लकब, हालचाली, हावभाव हे एकदम चोख आणि सहजसुंदर केले आहे. तिच्या पंजाबी ढंगातील अनेक गाण्यांबरोबरच ये काली काली आँखे, बोले चुडीयाँ, बन्नों की सहेली, देस रंगीला यासारखी तिची नृत्ये बघायलाच हवीत. परंतु देखो जरा देखो बरखा की झडी, आँवारा भँवरे, हू लालाला या तिच्या नृत्यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. तिच्या बिनधास्त आणि चुलबुली स्वभावाला साजेशी अशी नृत्ये आहेत जी बघायला खूप मज्जा येते. याशिवाय हळूवार गाणीसुद्धा तिच्या वाट्याला अनेक आली आणि तिच्यातील उत्तम अभिनय, अदा आणि हावभावातून तिने त्या गाण्यांचे सोने केले.

यातून एक गोष्ट विशेष करून नमूद करावीशी वाटते की आपल्यातील कौशल्याला प्रचंड प्रमाणात आत्मविश्वासाची जोड असेल तर कुठलीही कला ही उच्च स्तरावर गेल्याशिवाय राहात नाही. काजोलमधला हा आत्मविश्वास आपल्याला खूप काही शिकवून जातो. कोणतीही कला ही सहजसुंदर असेल तर ती मनाला भावते आणि म्हणून तिची नृत्ये, तिच्या नृत्यातला वावर हा आपल्या मनाचा ठाव घेतो. आणि नेमका हाच प्रयत्न कुठेतरी माझ्या नृत्यवर्गात नृत्य शिकवताना मी करत असते. कित्येक मुली आणि स्त्रियांमध्ये नृत्यकला ही उपजत असते तर कित्येक जणींना आवड असते. परंतु आत्मविश्वास नसल्यामुळे त्या संभ्रमात असतात. त्यांच्या स्वतःमध्ये असलेल्या या नृत्यकलेला जागरुक करून आत्मविश्वासाने त्या सहज आणि सुंदर नृत्य कशा करू शकतील याचे नेमके प्रशिक्षण द्यावे लागते. काजोलमधील आत्मविश्वासाचे तसेच सहजसुंदर असण्याचे खूप मोठे उदाहरण आपल्याला नजरेसमोर ठेवता येईल आणि आपल्यातील नजरेसमोर ठेवता येईल आणि आपल्यातील नृत्य कौशल्याला आत्मविश्वास आणि मेहनतीची जोड देऊन तिला समृद्ध करता येईल. 


Monday, 3 August 2020

जादू तेरी नजर...


हरयाणाच्या अंबाला शहरात शिक्षण झालेल्या जुहीचे शालेय शिक्षण मुंबईच्या फोर्ट कॉनवेंट स्कूलमध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण सिडनॅहम कॉलेजमधून झाले. १९८४ साली मिस इंडिया झालेल्या जूहीने त्याच वर्षी मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत बेस्ट कॉस्च्युमचे अवॉर्ड घेतले होते. तिने कथ्थक नृत्याचे तीन वर्षांचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले आहे. परंतू मध्ये हे नृत्य सोडावे लागल्यामुळे त्याची प्रचंड खंत तिच्या मनात आहे.

१९८६ साली सलतनत या चित्रपटातून आपली कारकीर्द सुरू केली असली तरी खरा ब्रेक तिला १९८८ साली आलेल्या कयामत से कयामत तक या चित्रपटाने दिला. या चित्रपटामुळे जूही आणि आमिर एका रात्रीत स्टार झाले होते. तिच्या व्यक्तिमत्त्वातला निरागसपणा आणि सोज्वळपणा प्रेक्षकांना असा काही भावला की तिने लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यानंतर तिने अनेक सुपरस्टार हिरोंबरोबर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आमिर खान, शाहरुख खान यांच्याबरोबर तिची विशेष केमिस्ट्री जुळली होती. राजू बन गया जंटलमन, बोल राधा बोल, हम है राही प्यार के, डर, लुटेरे यासारखे एका पेक्षा एक सरस चित्रपट तिच्या नावावर जमा झाले.

हम है राही प्यार के मधील तिचा विनोदी ढंगाचा अभिनय प्रचंड ताकदीचा होता. सुरुवातीच्या भूमिकांमध्ये ती अगदीच टिपिकल सर्वसामान्य मुलींसारखी दिसत असली तरी लुटेरे आणि डर चित्रपटापासून तिने ग्लॅमरस अवतारही तितक्याच ताकदीने पेलला. हळूहळू तिने आपल्या व्यक्तिमत्त्वात आणि अभिनयात कमालीचा बदल घडवून आणला आणि इथेही तिच्या सोज्वळपणाला तिने कुठेही धक्का लावू दिला नव्हता.

सशक्त अभिनय आणि त्या त्या भूमिकांना तिने दिलेला न्याय तोही तिच्या व्यक्तिमत्त्वातल्या सोज्वळपणाला जपून हे खूप वाखणण्याजोगे आहे. जी गोष्ट अभिनयाची तीच नृत्याचीसुद्धा. तिने केलेल्या प्रत्येक नृत्यात तिची सहजता आणि नैपुण्य दिसून येते. मग ते नृत्य कोणतेही असो, लोकनृत्य, वेस्टर्न वा क्लासिकल प्रत्येक शैली तिने खूप सुंदर सादर केली आहे. घुंघट की आडसे, गोरीया रे, मेरे बन्नोंकी आएगी बारात, मि.लोवा लोवा अशी अनेक नृत्ये उदाहरणादाखल घेता येतील.

तिच्या नृत्यातला कॉमेडी सेन्स एकदम भन्नाट होता. बम्बई से गयी पूना, तू तू तू तारा, में कोई ऐसा गीत गाऊँ अशा अनेक नृत्यांत तिने कमाल केली आहे. ती कुठेही अति वाटत नाही की कमी वाटत नाही अगदी परफेक्ट. कितीही वेळा बघितली तरी कंटाळा येत नाही. काही काही ठिकाणी तर तिने हावभावांची इतकी विविधता दिली आहे की विचारूच नका. स्वतःची प्रतिमा जपून बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अशी ही अभिनेत्री आहे. २०१४ ला आलेल्या गुलाबगँग या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेने तर तिने आपल्या अभिनयाची वेगळी उंची दाखवून दिली.

कयामत से कयामत तक च्या पहिल्याच चित्रपटाला फिल्म फेअर अवॉर्ड मिळालेली ही अभिनेत्री नंतर शाहरुख खान बरोबर ड्रिम्स अनलिमिटेड ही कंपनी स्थापून निर्मातीसुद्धा झाली होती. तिने आपली कारकीर्द कुठल्याही वादाच्या भोवऱ्यात न अडकवता यशस्वी करून दाखवली. 

Monday, 27 July 2020

नाचते रहो नाचते रहो...till you reach success (सरोज खान – अंतिम भाग)

सरोजजींनी नृत्याच्या क्षेत्रात स्वतःच्या नावाचा प्रचंड दबदबा निर्माण केला होता आणि त्याचे विशेष श्रेय हे त्यांच्या मेहनतीबरोबरच त्यांच्याकडे असलेल्या नृत्यकौशल्याला जातं. नृत्याच्या स्टेप्सच्या विविधतेचे त्यांच्याकडे जणू भंडारच होते. एका एका शब्दात चार वेगवेगळ्या स्टेप्स त्या द्यायच्या. हावभावाला नृत्यात त्या सर्वाधित महत्त्व द्यायच्या. एका साऊथमधील चित्रपटातील गाण्याच्या एका ओळीवर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सोळा हावभाव दिले होते. वेगवेगळे फॉरमेशन्स आणि जागेचा चोख वापर त्यांच्या नृत्यदिग्दर्शनात दिसायचा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डोला रे डोला हे नृत्य. माधुरी, श्रीदेवी, ऐश्वर्या यांच्या नृत्य शैलीबद्दल त्यांना विशेष कौतुक होते. निंबुडा निंबुडा...नृत्याच्या वेळी ऐश्वर्याच्या टाचांना आणि गुडघ्यांना खूप दुखापत झाली होती. तरीही कुठलीही तक्रार न करता तिने त्या नृत्यासाठी मेहनत घेतली होती, हे त्या आवर्जून सांगतात. चार चार दिवस तालीम करूनही समाधानी नसलेली श्रीदेवी स्वतःहून त्यांना आपण अजून शुटिंगसाठी तयार नसल्याचे सांगत असे. तिच्यातल्या या गुणवत्तेमुळे ती खरोखरच एक गुणी नृत्यांगना असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

कोणत्याही अभिनेत्रीने एखाद्या स्टेपचे अथवा नृत्याचे उत्तम सादरीकरण केले तर त्या अभिनेत्रीला सरोजजी खूष होऊन १०१ रुपयांचे बक्षिस देते आणि त्यांच्याकडून मिळालेले हे बक्षिस म्हणजे त्या त्या अभिनेत्रींना आभाळाला हात लावल्यासारखे होत असे. अशा अनेक पोचपावत्या माधुरी, श्रीदेवी, ऐश्वर्या, जूही यासारख्या अभिनेत्रींना मिळालेल्या आहेत.

सरोजजी कडक शिस्तीच्या आणि स्पष्ट स्वभावाच्या होत्या. एखादी गोष्ट त्या तोंडावर बोलून टाकायच्या. दिल मेरा मुफ्त का या गाण्याच्या सेटवर रात्री दोन वाजता करिना कपूरला ओरडून बोलल्या होत्या. ए लडकी कमर हिला कमर हिलाएगी नही तो शॉट ओके नही होगा... त्यांना अभिनेत्रींमध्ये एकदा सगळ्यात जास्त राग आला होता तो रवीना टंडनचा. तिने नृत्याचा नमस्कार केला नव्हता म्हणून त्या खूप चिडल्या होत्या. त्यांच्याबरोबर अठरा वर्षे काम केलेले असिस्टंटसुद्धा त्यांना खूप घाबरायचे. असिस्टंटनी शिकवलेला डान्स विसरले किंवा स्टाईल बदललेली त्यांना अजिबात आवडायचे नाही. कामाच्या वेळी बोलले किंवा टाईमपास केला तर त्यांना खूप राग यायचा.

वैयजंती माला, वहिदा रहमा, पद्मिनी यांचा काळ त्यांना खूप आवडायचा. सरोजजींच्या नृत्यावर खूष होऊन वैयजंतीमाला यांनी त्यावेळी त्यांना २१ रुपये दिले होते. तो त्यांच्यासाठी सुवर्णक्षण होता. त्या म्हणायच्या की तो काळ आणि ती माणसे काही वेगळीच होती. एक भावनिक आत्मीयता होती त्यावेळी. आता सगळे मशीन झाले आहेत. व्यावसायिक संबंधांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्यांच्या आवडत्या डान्सरमध्ये त्या गोविंदा आणि हृतिक रोशनचे नाव घेतात तर हिरोईनमध्ये अर्थातच माधुरी आणि श्रीदेवी यांना बॉर्न डान्सर म्हणून संबोधतात. त्या म्हणतात नृत्यात तरबेज असलेल्या डान्सरकडून आम्हालासुद्धा खूप शिकायला मिळतं. त्याचबरोबर नृत्य शिकण्यासाठी तुमची फिगर झिरोचं असायला पाहिजे असं काही नाही तर तुमची मेहनत आणि जिद्द असेल तर शरीराने वजनदार असलेली व्यक्तीही उत्तम नृत्य करू शकते, असे त्यांचे मत होते. त्यांच्या नृत्यदिग्दर्शनातील सिग्नेचर स्टेप ही त्यांची विशेष खासियत असायची. त्यांच्या या सिग्नेचर स्टेपमुळे ते गाणं ऐकताच ती नृत्ये डोळ्यासमोर येतात. या लक्षवेधी ठरलेल्या सिग्नेचर स्टेप्स सरोजजी लहान मुलांना नजरेसमोर ठेवून देत असत. त्यांच्या मते लहान मुलांना अगदी सहज करता आल्या पाहिजेत. याच त्यांच्या नृत्यशैलींच्या वैशिष्ट्यांमुळे त्यांना असंख्य वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय देवदास, जब वी मेट आणि सिंगारम यासाठी एकूण तीन वेळा त्या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. आपल्या भारतीय नृत्यशैलींचा इतका मोठा खजिना असताना अलिकडच्या काळात वाढत चाललेल्या हिप-हॉप, सालसा यासारख्या पाश्चात्य नृत्यशैलींचे महत्त्व त्यांना थोडे त्रास देत होते आणि आपली संस्कृती आपण विसरत असल्याची खंत वाटत होती. पण तरीही नृत्याची आवड असणाऱ्या प्रत्येक नृत्यप्रेमीला त्या आवर्जून सांगातत. मन लावून काम करा, नृत्य करा, मेहनत करा. तुम्हाला कुणी बघतंय का याचा विचार करू नका. नाचत राहा, नाचत राहा. जिथपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तिथपर्यंत फक्त नाचत राहा.


Monday, 20 July 2020

माईलस्टोन ठरलं एक दो तीन (सरोज खान - भाग तीन)

फार पूर्वीपासून चित्रपट, चित्रपटातील गीते, संगीत आणि नृत्ये यांना आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचे स्थान आहे. यापैकी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आपल्यावर प्रभाव पडलेला आहे आणि पडत असतो. भगवान दादांच्या नृत्यशैलीपासून ते टायगर श्रॉफ पर्यंत तर पद्मिनी, वैयजयंती माला पासून नोरा फत्तेह अलीपर्यंतच्या सर्व स्टार्सना आपण चित्रपटांमध्ये नाचताना पाहिले आहे. या प्रवासातील शेकडो अभिनेते आणि अभिनेत्रींच्या स्टाईलवर, नृत्यावर आपण फिदा झालेलो आहोत. त्यांच्या नृत्याचे, स्टाईलचे आपण आपल्या आनंदाच्या क्षणी कित्येकदा अनुकरण केले आहे. परंतू त्यांना थिरकायला लावणाऱ्या नृत्यदिग्दर्शकांना त्या पडद्यामागच्या अवलियांना त्या काळी प्रेक्षकांमध्ये खूप कमी ओळखले जायचे. त्या त्या नृत्याचे श्रेय हे त्या त्या स्टारला दिले जायचे आणि त्या नृत्याला जन्म दिलेल्या जन्मदात्याला म्हणजेच नृत्यदिग्दर्शकाला सोयीस्करपण विसरले जायचे. श्रेयनामावलीत कुठेतरी कोपऱ्यात नाव असायचे आणि नृत्य या विभागासाठी अवॉर्ड तर दूरचीच गोष्ट होती. ही अत्यंत खेदाची गोष्ट होती.

परंतू १९८८ साली तेजाबमधील एक दोन तीन या गाण्यावरील नृत्याने अशी काही किमया केली की सगळा इतिहासच बदलून गेला. सरोजजींच्या नृत्यदिग्दर्शनाने या गाण्याला चार चाँद लागले होते. माधुरी दीक्षित सारख्या नवोदित अभिनेत्रीकडून करून घेतलेले नृत्य, त्यातील सिग्नेचर स्टेप, हावभाव, एक ना अधिक अशा किती गोष्टींचे कौतुक करायचे. या गाण्यानंतर सगळीच गणितं बदलून गेली. माधुरी दीक्षित ही रातोरात स्टार झाली. तिच्या नृत्याची आणि अदांची मोहिनी प्रेक्षकांवर जबरदस्त पडली होती. या नृत्याने सर्व रेकॉर्ड तोडून टाकले होते. तुफान प्रसिद्धी मिळाली या नृत्याला आणि तिथेच एक मोठा आमूलाग्र बदल झाला तो म्हणजे नृत्यदिग्दर्शक हे प्रकाशझोतात आले. अगदी सर्वसामान्य प्रेक्षकही नृत्यदिग्दर्शक सरोजखान यांना ओळखू लागले. एक दो तीनच्या बेसूमार प्रसिद्धीने फिल्मफेअरने नृत्यदिग्दर्शक हा विभाग पुरस्कारसाठी सुरू केला आणि त्या वर्षीच सुरू झालेले हे नृत्यदिग्दर्शनाचे अवॉर्ड मिळाले सुद्धा सरोजजींना, यावरून एक गोष्ट सिद्ध होते की इतका मोठा बदल घडवून आणण्याची ताकद सरोजजींमध्ये होती, त्यांच्या नृत्यकौशल्यात होती. ज्यांनी पुरूषी वर्चस्व असलेल्या या नृत्यदिग्दर्शन क्षेत्रात स्वतःच अस्तित्व निर्माण केलं आणि यशस्वी होऊन दाखवलं.

एक दोन तीन वरचे नृत्य हे माईलस्टोन ठरले होते. फक्त पंचवीस मिनिटांत बसवलेली कोरिओग्राफी माधुरी दीक्षितला आत्मसात करायला तब्बल सतरा दिवस रोज सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत तालमी कराव्या लागल्या होत्या, तर याचे प्रत्यक्ष शुटिंग सात दिवस चालले होते. या नृत्यानंतर सरोज खान आणि माधुरी दीक्षित यांचे समीकरण जुळले ते कायमचेच. एका पाठोपाठ एक हिट नृत्यांची रांगच लागली. आपल्या फेवरेट हिरॉईन माधुरीबद्दल बोलताना सरोजजी सांगतात की माधुरी ही माझ्या आयुष्याची सावली आहे, अगदी झेरॉक्स कॉपी. माझ्या कल्पनांना तिने पंख लावले आणि मी हवेत उडायला लागले. तिने आपल्या कामात कधीही कामचुकारपणा केला नाही की आळशीपणा केला नाही. मी एखादी गोष्ट करायला सांगितली म्हणजे संपलं, ते काम त्याच पद्धतीने करण्यासाठी ती प्रचंड मेहनत घ्यायची. तिने त्यासाठी कधी कारणं दिली नाहीत की पळवाटा शोधल्या नाहीत. ती जशी नवीन असताना माझ्याकडे आली तशीच ती शेवटपर्यंत होती. अगदी डाऊन टू अर्थ. गुरूंकडून अशाप्रकारे पोचपावती मिळणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट असते.

माधुरीने सुद्धा आपल्या या गुरूरुपी या नृत्याच्या देवीचा कायम आदर केला. त्यांच्यापती असलेली प्रेम, सन्मान तिने वेळोवेळी व्यक्त केले आहे. शास्त्रीय नृत्य परंपरेत अतिशय मानाचे असे समजले जाणारे पाद्यपूजन तिने एका डान्स रिॲलिटी शोच्या सेटवर सरोजजींचे केले होते आणि तो क्षण खूप भावूक होता.

माधुरीप्रमणेच आपण इतरही अनेक अभिनेत्रींचे सरोजजींबद्दलचे अनुभव आणि त्यांच्या नृत्यशैलींची खासियत आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. 


Monday, 13 July 2020

सिटी बजी की नहीं...

भारतीय शास्त्रीय नृत्याचा पारंपरिक वारसा ज्यांनी अतिशय उत्तमरितीने भारतीय चित्रपटात उतरवला त्या सरोजजीं गेली ६७ वर्षे या चित्रपटसृष्टीत काम करत होत्या. कामाचे स्वरूप बदलत बदलत प्रतिथयश नृत्यदिग्दर्शकापर्यंत पोहोचण्यात त्यांच्या अथक परिश्रमांचा वाटा मोठा आहे. आत्तापर्यंत त्यांनी २५०० चित्रपटांत नृत्यदिग्दर्शन केले आहे आणि हा आकडा नक्कीच आपल्या भुवया उंचावणारा आहे.

मेन कोरिओग्राफर्सना असिस्टंट म्हणून काम करत असताना खूप मोठ्या मोठ्या स्टार अभिनेत्रींना त्यांनी नृत्य शिकवले होते. त्यांचे नृत्य शिकवणे सगळ्या अभिनेत्रींना खूप आवडायचे त्या सरोजजींवर प्रभावित व्हायच्या. परंतू स्वतंत्ररित्या कोरिओग्राफर म्हणून त्यांना पहिले काम अभिनेत्री साधना यांनी गीता मेरा नाम या चित्रपटात दिले. तिथून त्यांनी काही मराठी, राजस्थानी आणि हिंदी चित्रपटात कोरिओग्राफी करायला सुरुवात केली होती. पण खऱ्या अर्थाने त्यांना ब्रेक मिळाला तो सुभाष घई यांच्या हिरो पिक्चरमध्ये. हिरोपासून त्यांना बॉलिवूड इंडस्ट्री सरोज खान या नावाने ओळखू लागली.

केवळ पुरुषप्रधान कोरिओग्राफर असलेल्या या चित्रपटसृष्टीत त्या पहिल्या महिला कोरिओग्राफर झाल्या होत्या, यासाठी त्यांना खूप वाट बघावी लागली आणि हे एखादा डोंगर खोदून रस्ता बनवण्या इतकं हे निश्चितच कठीण काम होतं. शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, वेस्टर्न नृत्य यात त्यांची मास्टरी होती. कथ्थक, भरतनाट्यम या नृत्यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेताही त्याचा वापर बॉलिवूडमध्ये कसा करायचा हे त्यांना चांगले माहीत होते. एका नृत्याची कोरिओग्राफी करायला त्यांना जास्तीत जास्त वीस मिनिटे लागायची आणि तेसुद्धा त्यांच्या नृत्यातील स्टेप्स या कधीच कुठेच रिपीट नसायच्या. प्रत्येक गाणं हे वेगळं असायचं.

त्यांची आपल्या कामावर असलेली श्रद्धा आणि वेड यासाठी आपले शब्द अपुरे पडतील. स्वतःच्या साडेआठ महिन्याच्या मुलीला देवाज्ञा झाली असताना सकाळी तिला रिवाजाप्रमाणे दफन करून दुपारी त्या हरे राम हरे कृष्णा चित्रपटाच्या दम मारो दम या गाण्याच्या शुटिंगला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसल्या होत्या. हे ऐकताच शरीरावर काटा येतो.  

देवदासच्या डोला रे डोला या गाण्याच्या शुटिंगच्या वेळी सुद्धा त्या आजारी होत्या. पंधरा दिवस त्या सेटवर औषधे घेत घेत, मध्ये झोपून नृत्याविषयीच्या सूचना देत होत्या. अशा आजारी अवस्थेत केलेले काम त्यांना पुढे देवदासच्या रिलिजच्या वेळी आयसीयूमध्ये घेऊन गेले आणि देवदासच्या स्क्रिनिंगनंतर ऐश्वर्या राय आणि देवदासची मुख्य टीम जेव्हा त्यांना भेटायला गेली तेव्हा त्याही परिस्थितीत त्यांनी संजय लीला भन्साळींना पहिला प्रश्न विचारला डोला रे डोला पे सिटी बजी की नही, ते ऐकून भन्साळी यांच्या डोळ्यात पाणी आले होते. आपल्या कामावर किती ते प्रेम आणि निष्ठा. या कामाच्या वेडेपणाला आणि झपाटलेपणाला माझा सलाम. चित्रपटसृष्टीत कोरिओग्राफरला असलेले साधारण महत्त्व हे अनन्यसाधारण महत्त्वात बदलायला कारणीभूत ठरलेल्या अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे आणखी पैलू आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. 


Monday, 6 July 2020

अप्रत्यक्ष गुरु – सरोज खान (भाग १)

कला कुठलीही असो ती कला आत्मसात करण्यासाठी शिकण्यासाठी योग्य गुरुंचे मार्गदर्शन महत्त्वाचे असतो. आपल्यातील कलेचा, आवडीचा कल बघून आपण त्या कलेच्या गुरुंकडे ती शिकण्याची सुरुवात करतो. योग्य गुरुंचे मार्गदर्शन मिळणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. पण काही व्यक्तिमत्त्व ही आपल्या आयुष्यात अप्रत्यक्षपणे गुरुंचे काम करत असतात आणि त्यातलेच एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरु सरोज खान.

मी डॉ. किशू पाल, कै. सुबल सरकार, कै. चंद्रकांत हडकर, श्री अरविंद राजपूत आणि कथ्थक नृत्यशैलीत ज्यांनी मला पाय टाकून चालायला शिकवलं अशा माझ्या गुरूवर्या मान. डॉ. सौ. मंजिरी श्रीराम देव या सर्व दिग्गज गुरुंकडून भरतनाट्यम, कथ्थक आणि लोकनृत्य या वेगवेगळ्या शैली आत्मसात केल्या. परंतू माझ्या नृत्यजीवनावर असलेला बॉलिवूडचा प्रचंड प्रभाव हा प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांच्यामुळे झाला असल्याचे म्हणता येईल. कळायला लागायच्या वयाच्या आधीपासून त्यांनी बसवलेल्या वेगवेगळ्या नृत्यांवर मी नृत्य करतेय. मीच काय माझ्यासारख्या शेकडो, लाखो असतील ज्यांना त्यांनी थिरकायला शिकवलं असेल...थिरकायला लावलं असेल.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून चित्रपटसृष्टीत बाल कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केलेल्या सरोजजींनी अतिशय खडतर प्रवास केला होता. त्यांनी आयुष्यात प्रचंड स्ट्रगल करून आपले नाव नंबर वनच्या यादीत झळकवले. अवघे १० वर्षे वय असताना चित्रपटसृष्टीत कोरस डान्सर म्हणून त्या काम करू लागल्या. शाळेतून थेट सेटवर पोहोचण्याचा त्यांचा दिनक्रम असायचा. घरची परिस्थिती आणि पाठोपाठची पाच भांवडांची जबाबदारी यामुळे त्यांना नृत्या व्यतिरिक्त इतर दुसरी कामेसुद्धा करायचा प्रयत्न करावा लागला. त्यात के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये नर्स, ग्लॅक्सो कंपनीत रिसेप्शनिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट या गोष्टींचा समावेश आहे.

त्या जेव्हा कोरस डान्सर म्हणून काम करायच्या त्यावेळी अभिनेत्रींवर बसवले जात असलेले नृत्य हे त्या नुसतं बघूनच आत्मसात करायच्या, अगदी जसेच्या तसे एकही स्टेप इकडे तिकडे नाही. असेच एकदा सेटवर ही गोष्ट नृत्यदिग्दर्शक सोहनलाल यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सरोजजींना बोलावून विचारले असता. त्यांनी ते नृत्य अगदी जसेच्या तसे करून दाखवले. त्यांची नृत्यातली ही गती, नृत्याप्रती असलेली समर्पितता, निरिक्षण आणि आकलन शक्ती या आणि अशा अनेक गुणांमुळे त्यावेळचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सोहनलाल यांनी सरोजजींना आपले असिस्टंट बनवले. यावेळी त्यांचे वय होते फक्त बारा वर्षे. त्यांच्या मी बघितलेल्या अनेक मुलाखतींमधून त्यांच्याबद्दल चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी काढलेले उद्गार हे आपल्याला खरंच नतमस्तक करतात.

नृत्याप्रती आणि कामाप्रती असलेले प्रचंड प्रेम, मेहनत आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे त्यांची नृत्यकला प्रत्येकाच्या नजरेत भरायची. मी तर म्हणेन त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात नृत्य होते. त्यांचा भूतकाळ हा प्रचंड वाईट होता परंतू हीच नकारात्मक ऊर्जा त्यांनी सकारात्मक ऊर्जेत परिवर्तित करून आपल्या नृत्यात आपल्या कामात स्वतःला झोकून दिले. एक अजब रसायन होत्या त्या.

त्यांच्या या प्रामाणिकपणा, मेहनत आणि अनुभव यांच्या प्रवासाने त्यांना दिग्गज नृत्यदिग्दर्शक बनवलं आणि याच त्यांच्या लाखो लोकांना थिरकायला लावलेल्या हजारो नृत्यांच्या नृत्यशैलीबद्दल आपण पुढील भागात प्रकाश टाकणार आहोत. यातील बऱ्याच गोष्टी नृत्यक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या किंवा नुसतीच नृत्याची आवड असणाऱ्यांना प्रचंड प्रेरणादायी ठरू शकतात. 


Monday, 29 June 2020

पिंकी प्रियांका


चित्रपटाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या झारखंड इथल्या कुटुंबात जन्माला आलेली प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचली. वडील आर्मीमध्ये असल्यामुळे सततच्या बदल्यांमुळे शालेय शिक्षण विविध शाळांमध्ये झाले. शाळेत असताना नाटकात काम करण्याबरोबरच वेस्टर्न आणि क्लासिकल संगीताचे धडे, गायन आणि कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण तिने घेतले होते. पुढे जाऊन फेमिना मिस इंडियामध्ये दुसरा क्रमांक मिळवलेली प्रियांका २००० साली मिस वर्ल्ड झाली आणि भारताचे नाव उज्ज्वल केले. २००३ साली सनी देओल बरोबर द हिरो या चित्रपटातून तिने या क्षेत्रात पदार्पण केले. पदापर्णातच आपल्यातील असलेल्या टॅलेंटची दखल घ्यायला लावल्यामुळे तिने परत मागे वळून कधी पाहिले नाही. ओळीने एकापेक्षा एक सरस चित्रपटांची तिची यादीच तयार झाली. अर्थात यात चढ उतार नक्कीच होते. ऐतराज, बर्फी, मेरी कोम, बाजीराव मस्तानी इत्यादी चित्रपटांतील तिच्या अभिनयाबरोबरच तिचे नृत्यकौशल्यसुद्धा लपलेले नाही. तशी तर तिने अनेक चित्रपटांत भरपूर नृत्ये केली आहेत पण मला भावलेली तिची काही नृत्ये इथे नमूद करावीशी वाटतात.

बाजीराम मस्तानीतील पिंगा या नृत्याची कोरिओग्राफी ही मराठी मातीशी सांगड घालणारी तर होतीच पण तिला थोडासा क्लासिकल टच पण होता आणि या नृत्यात तिने तिची कामगिरी उत्तम बजावली आहे. राम चाहे लीला चाहे या नृत्यातील तिची अदा अशीच नजर खिळवून ठेवणारी असून याच नृत्यातील शेवटच्या काही ओळींवर असलेल्या नृत्याच्या स्टेप्स तर एकदम लाजवाब केल्या आहेत. तिच्या बऱ्याच नृत्यांमध्ये अगदी तंत्रशुद्ध नृत्यशैली जाणवत असली तरी आत्मविश्वास आणि मेहनत यांचा मिलाफ तिच्या नृत्यात प्रकर्षाने जाणवतो. पिंकी हे पैसेवालो की हे याचंच एक उत्तम उदाहरण म्हणता येईल यात अंदाजे ६० ते ७० मेल डान्सरच्या मॉब बरोबर केलेले हे विनोदी ढंगातील नृत्य बघत राहावेसे वाटते. अर्थात याचे बहुतांशी श्रेय कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना जाते. मला स्वतःला हे नृत्य बघताना मजा तर आलीच पण शिकायलासुद्धा खूप मिळाले. मेल कोरसवर घेतलेले नृत्याचे शॉट्स आणि त्यात प्रियांकाच्या हावभावांची सांगड खूप कमाल झाली आहे. प्रचंड एनर्जिटिक नृत्य आहे हे. याशिवाय डॉन २ मधील तिचे आजकी रात या गाण्यावरील वेस्टर्न नृत्य असेच नेत्रसुखद झालेले आहे. देसी गर्ल, गुनगुनगुणारे, तुने मारी एण्ट्री अशी अनेक नृत्ये उदाहरणादाखल घेता येतील.

बॉलिवूडप्रमाणेच तिने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. इन माय सिटी आणि एक्सॉटिक ही तिने गायलेली गाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाली आहेत. तिच्या फॅशन चित्रपटांतील अभिनयाला नॅशनल अवॉर्ड मिळाले असून तिला पद्मश्री हा मानाचा किताबसुद्धा बहाल झाला आहे. वेंटिलेटर या मराठी चित्रपटाची निर्मिती करून तिने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. 

Sunday, 21 June 2020

कपूर गर्ल्स

बॉलिवूडच्या प्रथम घराण्याच्या सुपुत्र्या, शोमॅन राजकपूर यांच्या नाती करिश्मा आणि करिना. कपूर घराण्यातील मुलींना या क्षेत्रापासून आतापर्यंत लांबच ठेवण्यात आले होते. परंतू या नियमाचं प्रथमच उल्लंघन केलं ते बबिता आणि रणधीर कपूर यांची कन्या करिश्माने आणि तिचा कित्ता गिरवला करिनाने.  

लहानपणापासूनच चित्रपटाचे बाळकडू मिळालेल्या या दोन्ही बहिणींना इथे दमदार कारकीर्द करणं कठीण गेलं नाही. १९९१ साली वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी प्रेमकैदी या चित्रपटातून करिश्मा कपूरने या क्षेत्रात पाऊल ठेवले. सुरुवातीला तिला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं तरी हळूहळू आपल्या अभिनयात, नृत्यात, दिसण्यात आणि वावरण्यात करिश्माने लक्षणीय बदल केला आणि ९० च्या दशकात तिने आपल्या चित्रपटात कमालीचा भिडस्तपणा दाखवला होता. जो तिच्या खानदानातील सदस्यांपासून इतरांपर्यंत सगळ्यांनाच पचनी पडायला थोडा अवघड गेला होता. तिची खास केमिस्ट्री जुळली ती गोविंदा आणि सलमान खान यांच्याबरोबर. गोविंदाबरोबर तिची एकापेक्षा एक सरस अशी अनेक नृत्ये बघायला मिळाली. गोविंदाची स्वतःची अशी एक शैली तर होतीच परंतु चित्रपटांतील कट मुव्हमेंटच्या नृत्यात पण तो नंबर वन होता. नृत्यात एक्स्पर्ट असलेल्या गोविंदाच्या नृत्याला तितक्याच ताकदीने करिश्माने साथ दिली. तिथे ती तसूभरसुद्धा कमी पडली नाही. मग त्या दोन दोन बीट्सच्या चेंज असलेल्या स्टेप्स असू देत किंवा हाताच्या कट मुव्हमेंट असू देत तिने आपल्या नृत्यातला सफाईदारपणा चोख दाखवला आहे. इतकेच काय दोघांची विनोदी ढंगातलीसुद्धा बरीच नृत्ये आहेत त्यातसुद्धा ती कुठेही अनैसर्गिक वाटत नाही. तिच्या सगळ्या नृत्यांमध्ये तिने घेतलेली मेहनत दिसून येते. दिल तो पागल हैमध्ये माधुरी दिक्षित सारख्या मातब्बर नृत्यांगनेबरोबरसुद्धा तिने आपल्या नृत्याचे नाणे खणखणीत वाजवले होते. चित्रपटागणिक तिच्या अभिनयात आलेल्या प्रगल्भपणा सुद्धा आपल्याला मान्य करावा लागतो.

नव्वदचं दशक तिने गाजवलं तर २००० साली करिनासुद्धा चित्रपटसृष्टीत आपलं प्रस्थ सिद्ध कऱण्यासाठी सज्ज झाली होती. आई बबिताचा दोघींचं करिअर चित्रपटसृष्टीत सेट करण्याचा आग्रहीपणा, दोन्ही बहिणींना नितळ गोऱ्या रंगाबरोबर मिळालेले निळे डोळे, धारदार नाक या सौंदर्यखुणा, त्यात वडिलोपार्जित नाव आणि वारसा यांची जोड त्यांच्या करिअरच्या पथ्यावर पडली. रेफ्युजी चित्रपटाने सुरुवात करत करिना हळूहळू तरुणाईची स्टाईल आयकॉनच बनली.

करिश्मा प्रमाणेच करिनानेसुद्धा टॉपच्या सर्व अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. हलकट जवानी, फेविकॉल से, ये मेरा दिल अशा बऱ्याच आयटम साँगनी तिने नृत्याकडे तरुणपिढीचा बघण्याचा दृष्टिकोन बदलवला. तिच्या झिरो फिगर या कन्सेप्टनी तर अनेक मुलींना व स्त्रियांना अक्षरशः वेड लावलं.

परंतू दोन बहिणींच्या नृत्यशैलींबद्दल म्हणाल तर एक कमालीची मेहनती आणि त्या प्रवाहात वाहणारी तर दुसरी आपल्या स्वतःच्या प्रवाहात वाहवून नेणारी. करिनाची नृत्ये बघताना तिचा स्वतःचा प्रवाह किंवा तिचा एक अंमल आपल्याला जास्त जाणवतो. ठरावीक मर्यादेनंतर स्टेप्ससाठी घ्यावी लागणारी मेहनत तिच्यात दिसत नाही. सौंदर्य, फिगर आणि स्टाईल या गोष्टींना नृत्यात जास्त महत्त्व दिले गेल्याचे जाणवते.

दोन बहिणींच्या चित्रपटसृष्टीतील करिअरमध्ये साधारण दहा वर्षांचा काळ आहे. या दहा वर्षांच्या काळामध्ये मोठी बहिण काळाच्या रंगात रंगलेली दिसते तर धाकटी बहिण आपल्या रंगात काळाला रंगवताना दिसते. त्यामुळे काळातील हे अंतर आणि नृत्यातील तफावत बरंच काही सांगून जाते. ही काळाची, मेहनतीची आणि स्टाईलची तफावत जरी असली तरी दोघीही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी प्रचंड यशस्वी ठरलेल्या अभिनेत्या आहेत आणि म्हणूनच कपूर खानदानाच्या चित्रपटाचा वारसा त्यांच्या मुलींनीही तितक्याच ताकदीने आणि यशस्वीपणे पुढे नेला हे आपल्यालाही मान्य करावं लागेल. 


Monday, 8 June 2020

कतरिनाचा कैफ

अभिनेत्री म्हणून स्वतःच्या मर्यादा माहीत असून आणि त्याप्रमाणेच स्वतःला किंबहुना आपल्यातील त्याच नेमकेपणावर भर देऊन प्रेक्षकांसमोर सादर होणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. दिसायला जितकी सुंदर तितकाच इनोसंट चेहरा लाभलेली. कतरिनातील मला जाणवलेला महत्त्वाचा गुण म्हणजे तिला जे जमते नेमके तेच ती प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करते. आतापर्यंत अनेक नृत्यांवर तिने आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे. त्यातील बहुतांशी नृत्ये ही आयटम साँगवर आहेत परंतू तरीही तिच्या त्या नृत्यांमध्ये कुठेही भडकपणा जाणवला नाही किंवा त्या नृत्यांना अश्लिलतेची झालर आली नाही. कदाचित तिला मिळालेल्या इनोसंट चेहऱ्याच्या दैवी देणगीमुळे असेल.

काळ बदलला तशी नृत्याची संकल्पनाही बदलली. पूर्वी शास्त्रीय नृत्यालाच जनमाणसात प्रचंड मान्यता होती. हळूहळू आपल्या मातीच्या रांगड्या लोककलेकडे सुद्धा मनं वळू लागली...आणि आताच्या बदलत्या काळानुसार नवीन पिढीलाच नाही तर चिमुरड्यांनासुद्धा आयटम साँगवर नृत्य करण्याचा मोह होतो. अर्थात त्यांना त्यातलं काही कळत नसतं हा भाग वेगळा. पूर्वीच्या चित्रपटात असं आयटम साँग वेगळ्या हिरोईनमार्फत करवून घेतलं जायचं. चित्रपटाची मूळ नायिका ही नृत्ये करायची नाही. परंतू बदलत्या काळानुसार हल्ली चित्रपटाची हिरोईनच ही नृत्ये करत असल्यामुळे तिचा प्रभाव नृत्यप्रेमींवर निश्चितच पडू लागला आहे. आपल्याला जिकडे तिकडे ही नृत्ये सादर होताना दिसतात आणि त्यामागची मानसिकता झपाट्याने बदलताना दिसत आहे.

बहुतांश चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या आयटम साँगचा उपयोग केला जातो. यात नृत्यदिग्दर्शकाचं कसब पणाला लागतं. अवघ्या तीन मिनिटात त्याला प्रेक्षकांची मन जिंकायची असतात. सिगनेचर स्टेप, स्टंटबाजी किंवा एरोबिक मुव्हमेंट्स यासारख्या तंत्राचा वापर करत नृत्यदिग्दर्शक ते आव्हान पेलण्याचं प्रयत्न करतात. या सगळ्यात नृत्यदिग्दर्शकाला उपयोगी पडतो तो गाणं सादर करणारा कलाकार. कतरिनाने हे काम एक दोन नाही तर कित्येक गाण्यांमध्ये कौशल्याने पार पाडलेले आहे. 

त्यामुळेच कतरिना कैफच्या नृत्यांत आयटम साँगचीसुद्धा विविधता दिसते. चिकनी चमेलीमध्ये ती देसी ढंगात नाचली आहे तर मेरे माहिया सनम जानममध्ये तिने एरोबेटिक मुव्हमेंट्समध्ये स्वतःला अगदी परफेक्ट बसवून घेतलं आहे. या नृत्यासाठी आवश्यक असलेली तिची शरिराची लवचिकता बघून थक्क व्हायला होतं.

एकाच पठडीतील नृत्ये तिने केलेली नाहीत, हेसुद्धा तिचं वैशिष्ट्य. तिच्या प्रत्येक नृत्यदिग्दर्शकाने तिला वेगळ्या पद्धतीचे नृत्य देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचवेळी कतरिनानेसुद्धा त्या नृत्यांचे सादरीकरण तितक्याच नावीन्यपूर्ण पद्धतीने आणि हावभावांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तिने भरपूर आयटम साँगवर वेगवेगळी नृत्ये  करून कुठेच तिच्या नृत्यात तोचतोचपणा आलेला नाही. म्हणजे ते नावीन्य आणण्यामध्ये कुठेतरी ती यशस्वी नक्कीच झाली आहे. नृत्यातला, पोशाखातला आणि हावभावातला वेगळेपणा जपण्याचं कसब तिला व्यवस्थित जमलेलं आहे आणि हेच तिचं खरं कौशल्य आहे.

आयटम साँग प्रेक्षकांपर्यंत लवकर पोहोचतात आणि मग अशी प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या हिट गाण्यांवर नृत्य करण्याची एकच लाट येते. नवोदितांना या नृत्यांचा मोह होतो पण ही नृत्ये करताना किंवा या नृत्यांची छाप स्वतःवर पाडून घेताना आपल्याला स्वतःला थोडे भान ठेवायला हवे. नृत्याचे हावभाव एका मर्यादेला ओलांडणारे नसावेत त्याचबरोबर तुमच्या पेहरावाचेसुद्धा भान असायलाच हवे. उत्तम नृत्य म्हणून तुमचे सादरीकरण असेल तर प्रेक्षकांना नक्कीच आवडतं. कतरिनाच्या आयटम साँगने प्रभावित होणारी पिढी तिच्या नावीन्याचा प्रयत्न आणि मेहनती वृत्तीचा कित्ता गिरवेल, अशी अपेक्षा.


माझ्या आठवणीतील होळी

  होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत स...