Saturday, 25 April 2020

मंत्रमुग्धित करणाऱ्या नायिका


बॉलिवूडमधील नायिका, त्यांच्या नृत्याविष्काराची खासियत आणि त्या सगळ्याचा एकूणच माझ्या नृत्यावर असलेला प्रभाव यांचा वेध घेत आम्ही आम्हाला मंत्रमुग्धित करणाऱ्या नायिकांचा पहिला टप्पा पूर्ण केलाय अर्थातच ढोबळमानाने. कारण जुन्या काळातील कितीतरी नायिका आहेत ज्यांनी त्यांच्याशी संबंधित काळ गाजवलाय, आपल्या शैलीचा ठसा उमटवलाय आणि त्यावेळच्या पिढीला वेड लावलंय. आणि कदाचित आजच्या रिमिक्स गाण्यांमधूनही नव्या पिढीला त्याच ठेक्यावर ताल धरायला लावलाय.
त्यात अगदी साधना, माला सिन्हा, मीना कुमारी यांच्यापासून मुमताज, अरुणा ईराणी, सायरा बानू, शर्मिला टागोर यांच्यापर्यंत... झिनत तमान, परवीन बाबी यांच्यापासून रिना रॉय, पद्मिनी कोल्हापूरे, डिंपल कपाडिया, अमृता सिंग यांच्यापर्यंत... यातील प्रत्येकीवर खोलात जाऊन लिहिलेलं नाही. पण त्यांना त्यात टाळण्याचा किंवा त्यांचं महत्त्व कमी लेखण्याचाही उद्देश नव्हता. यातील काहींची शैली वेगळी होती तर काही वन साँग फेम होत्या. त्यातील काही प्रशिक्षित होत्या तर काहींनी बॉलिवूड स्टाईलचं नृत्य अंगात भिनवलेलं होतं. पण प्रत्येकीकडून काहीतरी शिकण्यासारखं. कारण तुमचं एकूणच सादरीकरण तेव्हाच उठून दिसतं जेव्हा तुम्ही त्याला शंभर टक्के द्यायला शिकता. त्यांच्यातील अदा, आत्मविश्वास, विशेष शैली आत्मसात करण्यासाठी निरिक्षणात्मक नजर, अभ्यास आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे नृत्यावरचं प्रेम महत्त्वाचं ठरतं.
बॉलिवूडमधला हा बदलता काळ आपल्याला गाण्यांच्या चित्रिकरणावरून सहज लक्षात येतो. कारण नृत्याच्या पद्धती, पेहराव, सादरीकरणाची पद्धत सारं काही काळानुसार बदलत गेलं. मोठ्या मोठ्या स्टुडिओजमधले भव्यदिव्य सेट्स कालबाह्य झाले आणि तिथे निसर्गरम्य स्थळांची रेलचेल झाली. यात नृत्याची जागा हिरोहिरोईनने एकमेकांच्या मागे पळण्यानेही घेतली. क्लासिकल, सेमीक्लासिकल नृत्याचा पगडा कमी होऊन तिथे पाश्चिमात्य, आधुनिक, जॅझ, डिस्को अशा नृत्यशैलीचा प्रभाव वाढत गेला. कॅमेरा आणि इफेक्ट्सने सारं काही चकचकीत दिसू लागलंय. पण तरीही एक गोष्ट कालबाह्य झाली नाही ती म्हणजे नावीन्याचा वेध.
नव्या काळातील नवीन नायिका यासुद्धा काही कमी नाहीतच. त्यांच्यातील नावीन्याने बॉलिवूडची क्रेझ सातासमुद्रापार पोहोचली आणि सातासमुद्रापारचे ट्रेण्ड्स झपाट्याने बॉलिवूडमध्ये दिसू लागले. या सगळ्याचा माझ्या नृत्यावर कसा प्रभाव पडला, नृत्यदिग्दर्शक, नृत्यप्रशिक्षक आणि नृत्यांगणा म्हणून माझ्या अनुभव विश्वात कशाप्रकारे भर घातली हे येत्या काही ब्लॉगमधून तुमच्याशी मी शेअर करत राहणार आहे.



Friday, 24 April 2020

छबीदार छबी




आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी... मान लचकत आणि मुरडत नृत्य करण्याची वेगळी शैली असलेल्या संध्या यांचे मूळ नाव विजया देशमुख. त्यांना रंगमंच कलाकाराची पार्श्वभूमी आहे. रंगमंचावर काम करता करता मुंबईला त्यांची ओळख व्ही. शांताराम यांच्याशी झाली. १९५१ साली अमरभूपाळी या चित्रपटात व्ही.शांताराम यांनी त्यांना पहिला ब्रेक दिला. त्यांचे संध्या हे नामकरणही व्ही.शांताराम यांनीच केले. १९५६ साली त्यांनी व्ही. शांताराम यांच्याबरोबर विवाह केला. त्यांनी आपल्या सिनेप्रवासात केवळ व्ही.शांताराम यांच्याबरोबरच सिनेमे केलेत. व्ही.शांताराम, राजकमल आणि त्यांचे नाते त्यांनी कायम जोडून ठेवले.
झनक झनक पायल बाजे या चित्रपटासाठी सुरुवातीला वैजयंतीमाला यांना विचारण्यात आले होते. परंतू ती भूमिका संध्या यांच्याच नशिबात होती. संध्या या प्रोफेशनल डान्सर नव्हत्या. पण या सिनेमासाठी त्यांनी नृत्य शिकण्याची तयारी दाखवली. त्यावेळचे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक, महान व्यक्तिमत्त्व गोपीजी कृष्ण यांच्याकडे त्यांनी नृत्यप्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तब्बल अठरा अठरा तास त्या रियाज करीत, त्यांची ही मेहनत झनक झनक पायल बाजेच्या नृत्यांमध्ये दिसून येते. हमे गोकुळवाला कहते हैं या गाण्यातील गोपीजी आणि त्यांचे नृत्य म्हणजे नृत्यकलाकारांना एक पर्वणीच आहे. प्रत्येक लहान, मोठ्या कलाकाराने बघावे असं हे नृत्य आहे. यात कथ्थकमधील धातकधुंगाचे परणजुडी आमद आणि त्यावर बसवलेली राधाकृष्णाची छेडछाड केवळ अप्रतिम.
नृत्यसम्राट नटराज गोपीकृष्ण यांच्या नृत्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या कलाकाराने बोलणे अतिशय चुकीचे होईल. परंतु मी इतकेच म्हणेन नेत्रदीपक, विलोभनीय आणि रोमांचित करणारा नृत्याविष्कार म्हणजे गोपीजी. त्यांच्या अंगाप्रत्यांगातून केवळ नृत्य, नृत्य आणि नृत्यच दिसते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की गुरुवर्य नटराज गोपीकृष्ण यांच्या पटशिष्या माननीय गुरुवर्या डॉ.सौ. मंजिरी श्रीराम देव या माझ्या कथ्थक नृत्याच्या गुरु आहेत. त्यांनी ही कला मला भरभरून दिली आहे.

संध्या यांच्या नवरंग चित्रपटातील नृत्यांनी तर या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. साधारण १९९१ ते ९३ च्या काळात लालबाग, परळ विभागात नृत्यस्पर्धांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आयोजन होत असे. त्यांचे अरे जारे हट नटखट या गाण्यावरील नृत्य हमखास बघायला मिळे. आधा है चंद्रमा या गाण्यावर मी स्वतः डोक्यावर झेपतील तेवढी पुस्तके ठेवून संध्या यांच्या डोक्यावरील, मडक्यांच्या अभिनयाची तंतोतंत कॉपी करायचा प्रयत्न करायचे. त्यांची स्वतःशी अशी नृत्यशैली होती. मान आणि खांदे हलवून थोडेसे शारिरीक झटके देत या नृत्य करित.
पिंजरा चित्रपट त्यातील गाणी,  नृत्य आणि संध्या यांचा अभिनय याबद्दल शब्द कमी पडतील. मला लागली कुणाची हुचकी ही लावणी मी इंटरनॅशनल क्रुझ शोमध्ये कित्येक वर्षे करित होते. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, देरे कान्हा चोळी लुगडी, आहाहा काय सुंदर गीते आहेत ही इथे पुन्हा मी हेच म्हणेन की नुसत्या चेहऱ्यावरील हावभावांनी एखाद्या गाण्याला आपण किती समृद्ध करू शकतो याची ही सुंदर उदाहरणे आहेत.
अशा या संध्या शांताराम त्यांच्याबद्दल जितके बोलू तेव्हढे कमीच आहे. माझ्या आतापर्यंतच्या नृत्यप्रवासात मी त्यांच्यावर चित्रीत गीतांनी आणि नृत्यांनी प्रेरित झाले होते. आणि त्यांचे हेच महत्त्व पुढिल पिढीसही पटवून देण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. 



Thursday, 23 April 2020

रेखीव रेखा


तामीळ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार जेमिनी गणेशन यांची मुलगी भानू रेखा गणेश म्हणजेच आपली बॉलीवूडची रेखा. साँवन भादो या चित्रपटातून पदार्पण केलेल्या रेखा यांना सुरुवातीला त्यांच्या डस्टी लूकमुळे तितकेसे कुणी पसंत केले नव्हते. परंतु अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आलेला दो अंजाने हा चित्रपट त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. चित्रपटसृष्टीत ग्लॅमगर्ल म्हणून त्यांच्यावर शिक्का बसलापरंतु १९७८ साली आलेल्या घर या चित्रपटानंतर त्यांची प्रतिमाच बदलून गेली आणि तिथून त्यांना चांगल्या अभिनेत्रीचा दर्जा मिळायला सुरुवात झाली.
पुढे त्यांना मुज्जफर अली यांचा उमराव जान, श्याम बेनेगल यांचा कलियुग आणि गिरीश कर्नाड यांचा उत्सव अशा दिग्गजांच्या चित्रपटात भूमिका मिळाल्या. एखाद्या चित्रात रेखाटल्याप्रमाणे असलेला त्यांचा रेखीव चेहरा हा त्यांच्या नावाला अगदी साजेसा आहे. त्यांची नृत्यातली अदाकारी ही लाजवाब असायची.
परदेसियाँ ये सच है पिया, सुन सुन दीदी या गाण्यातील त्यांचा अवखळ आणि नटखट अभिनय खूप छान होता. परिणीतामधील कैसी पहेली है ये जिंदगानी हे लालबुंद साडीतील नृत्यही प्रचंड आकर्षक होतं. जाबाँजमधील प्यार दो प्यार लो हा क्लब डान्सही तितक्यात आत्मविश्वासाने केला होता. सलामें इश्क, दिल चीज क्या है, इन आँखोंकी मस्ती में या त्यांच्या गाण्यातील अदा आणि नजाकत याबद्दल काय बोलावे. बैठ्या नृत्यात किंवा संथ गतीच्या गाण्यात सुद्धा प्रभावी भावप्रदर्शनाने प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या अभिनेत्रीमध्ये कमालीचे होते.
भुवया आणि डोळ्यांच्या आकर्षक हालचाली आमच्यासारख्या नृत्यांगणांना खूप काही शिकवून जातात. त्यांच्या नृत्यातील आर्जवता तर आपल्याला प्रेमातच पाडते. पण त्याचबरोबर त्यांचे ठुमकणे, लचकणे आणि ठेका धरणे हेसुद्धा नृत्यातील सहजता दाखवून देतात.
मला असं वाटत प्रत्येक नृत्य शिकणाऱ्या विद्यार्थिनीने एक अभ्यास म्हणून ही त्यांची नृत्ये आवर्जून बघावीत. नृत्य ही केवळ जलद गतीच्या गाण्यांवरच नाचण्याची कला नाही आहे. संथ गतीच्या गाण्यावर प्रभावी नृत्य करणेही तितकंच आव्हानात्मक आहे. रेखा यांच्या नृत्यातून या गोष्टी भरपूर प्रमाणात शिकायला मिळतात. म्हणजे कितीही वेळा ही नृत्ये बघितली तरी आहाहाः हे शब्द आपोआपच निघतात.
पिया बाँवरी हेसुद्धा असेच एक प्रभावी नृत्य. यात कथ्थक नृत्यातील तोडे, कवित्त आणि भावांग त्यांनी लीलया पेलले आहे. अशा या रेखा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वातला उत्साहीपणा आणि ऊर्जा यामुळे त्या आजही तितक्याच चिरतरूण दिसतात. 


Wednesday, 22 April 2020

ड्रिमगर्लही तीच आणि बसन्तीही तीच...


कमलनयनी असलेली ही स्वप्नसुंदरी सौंदर्याची जणू अक्षरशः खाण, पण सौंदर्याला जेव्हा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा सांभाळण्याच्या भानाचं कौंदण लाभते तेव्हा त्याबद्दल बोलताना किंवा त्याकडे पाहताना चुकूनही खालचा दर्जा गाठला जात नाही. हेमामालिनी हे असंच मिश्रण. त्या नृत्यांगणा आहेत, स्टार, हिरोईन, ड्रिमगर्ल, अभिनेत्री अशा कितीतरी नावांनी जगाला माहीत. पण मला नृत्यांगणा म्हणून जास्त भावलं ते त्यांचं नृत्यक्षेत्रातील सातत्य, एकाग्रता आणि स्त्री असल्यातरी त्यांनी सांभाळलेली प्रतिष्ठा. अर्थात याची बीजं त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली.
१६ ऑक्टोबर १९४८ ला जन्मलेल्या या लावण्यवतीने वयाच्या सहाव्या वर्षापासूनच भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती. वयाच्या १२व्या वर्षापर्यंत दिल्लीत वेगवेगळ्या नृत्यगुरुंकडे नृत्याचे धडे गिरवत असताना छोटे छोटे कार्यक्रमही करत होत्या. त्या वयात त्यांनी नेहरू तसेच राजेंद्रप्रसाद यांच्यासमोर नृत्यप्रस्तुती केली होती. तसेच राष्ट्रपती भवनातही नृत्य सादर केले होते. पण तरीही त्यांच्या आई त्यांच्या नृत्यप्रगतीविषयी समाधानी नव्हत्या. म्हणूनच आपल्या मुलीला चांगल्या गुरुंकडून नृत्य शिकता यावे यासाठी आपल्या पतींच्या नोकरीची बदली चैन्नईला करू घ्यायला लावली. बघा ना ६० च्या दशकात त्यांच्या आई नृत्य कलेसाठी इतक्या फोकस होत्या आणि म्हणूनच हेमामालिनी या क्षेत्रातील आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या आईला देतात.
मी त्यांच्या पुस्तकात वाचल्याप्रमाणे त्यांच्या आई चित्रपट शुटिंगबरोबरच नृत्याची शिकवणी आणि रियाज यासाठी प्रचंड आग्रही असायच्या. त्यांच्या आऊटडोअर शुटिंग दरम्यानही त्यांच्या नृत्याचा सराव कटाक्षाने सुरु असायचा. त्या म्हणतात लहान असताना त्यांच्या बरोबरच्या मैत्रिणी बाहेर खेळत असायच्या आणि मी नृत्याची शिकवणी किंवा सराव करत असायचे. त्यावेळी त्यांची आई त्यांना नेहमी म्हणत की याचे महत्त्व तुला तू मोठी झाल्यावर कळेल. ज्यावेळी तू कुठल्यातरी निश्चित स्थानावर पोहोचलेली असशील. किती तो दूरदृष्टिकोन.
अत्यंत देखण्या आणि गोजिऱ्या चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने केवळ नृत्यप्रधानच चित्रपट केले नाहीत तर चारित्र्यपूर्ण आणि रोमँटिक चित्रपटांची त्यांची यादीही खूप मोठी आहे. त्यांच्या नृत्यातल्या छोट्या छोट्या अदा खूप काही शिकवून जातात. आपल्या बोलक्या डोळ्यातून भावप्रदर्शित करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांचं नृत्यप्रेम हे अभिनय क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यांनी निर्मातीची भूमिका शास्त्रीय नृत्यावर आधारित नुपूर ही मालिका काढताना उत्तम पेलली. तसंच दिल आशना है या चित्रपटात शाहरुख खानला पहिला ब्रेक त्यांनीच दिला होता. १९७२ साली त्यांना फिल्मफेअर तर २००० साली लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय भारत सरकारने त्यांना पद्मश्री बहाल करून त्यांचा गौरव केला आहे.
कॉलेजच्या दिवसांमध्ये माझ्या ओळखीतल्या एका नृत्य कलाकाराने मला त्यांच्या बॅलेग्रुपमध्ये जॉईन होण्याविषयी सुचवले होते. परंतू काही कारणास्तव मला ते शक्य झाले नाही. पण आज असा विचार येतो की खरंच काही काळासाठी जरी त्यांचा ग्रुप जॉईन केला असता तरी या ड्रिमगर्ल चा परिस्पर्श मला झाला असता. 

Tuesday, 21 April 2020

सायोनारा गर्ल...आशा पारेख


हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांचे नाव मोठ्या गर्वाने घेतले जाते अशा अभिनय आणि नृत्यात पारंगत असलेल्या अभिनेत्री आशा पारेख. आईवडिलांची एकुलती एक मुलगी असलेल्या आशा पारेख या कथ्थक नृत्य शिकलेल्या आहेत. नृत्याची प्रचंड आवड असलेल्या आशाजींना डॉक्टर होण्याची इच्छा होती. चित्रपट निर्माते बिमल रॉय यांनी त्यांना आपल्या चित्रपटात बालकलाकार म्हणून घेतले होते. त्यांना बेबी आशा म्हणून बोलवायचे. त्यांनी त्यावेळच्या देवानंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, धर्मेंद्र अशा सर्व टॉपच्या हिरोंबरोबर काम केली आहेत.
माझ्या नृत्यवर्गात येणाऱ्या महिलावर्गात कुणी गृहिणी असते तर कुणी शिक्षिका कुणी डॉक्टर तर कुणी परिचारिका तसेच ऑफिसला जाणाऱ्यांचाही खूप मोठा वर्ग आहे. जेव्हा नवीन नवीन ही महिला बॅच सुरु झाली तेव्हा सुरुवातीला त्यांच्या अनेक प्रश्नांना मला सामोरे जावे लागले होते. उदा. आम्हाला नृत्य जमेल का, काही शारिरीक अडचणी तर नाही येणार ना, कुणी हसणार तर नाही ना, विचित्र तर दिसणार नाही ना असे एक ना अनेक. त्यांच्यातील हरवलेला आत्मविश्वास म्हणा किंवा त्यांच्या मनाला नव्याने उभारी देण्यासाठी मला खूप प्रयास करावे लागले. सतत त्यांना बोलून, समजावून, धीर देऊन नृत्यकलेची आवड आणि महत्त्व पुन्हा एकदा त्यांच्या मनात रुजवायला लागले होते. या महिला विशेष बॅच सुरु झालेल्या सोळा वर्षांच्या काळात मी आशा पारेख यांच्या असंख्य गीतांवर नृत्ये बसवली आहेत. काँटा लगा, रात का समाँ, पर्दे में रहने दो, छायी बरखा बहार या त्यांच्या गाण्यांना महिलांची प्रथम पसंती असते. याशिवाय माझ्या कार्यक्रमात त्यांचे अनेक ड्युएट्स पण बसवले आहेत. ज्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आजा आजा में हूँ प्यार तेरा, दिल देके देखो, अब आन मिलो सजना, बडे है दिलके काले, आज ना छोडेंगे या गाण्यांवर नृत्य करायला बहार येते. चुनरी सँभाल या गाण्यावर दूरदर्शनवरील दमदमादम या कार्यक्रमात स्पेशल परफॉर्मन्स झाला होता. वेगवेगळ्या रंगांच्या भरपूर ओढण्या घेऊन हे नृत्य बसवले होते. तसेच त्यांच्या कोई मतवाला आया मोरे द्वारे, छोडो ना मोहे कान्हा, चुनरी मोरी कोरी या भावप्रधान गीतांवर सुद्धा पावलं थिरकायला लागतात.
पुढे चित्रपट क्षेत्राला अलविदा केल्यावर त्यांना काही टीव्ही सिरिअल्स बनवल्या. मुंबईत आशा पारेख हॉस्पिटलची स्थापना करून त्यांनी आपले डॉक्टर बनण्याचं स्वप्नं एका वेगळ्या अंदाजाने पूर्ण केले. अशा या आशा पारेख ज्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत गीत, अभिनय आणि नृत्य संपन्न असलेल्या भरपूर भूमिका साकार करायला मिळाल्या होत्या. त्यांच्या गाण्यांना आणि नृत्यांना आमची नेहमीच पहिली पसंती होती आणि ती राहणारच.  


Monday, 20 April 2020

मोनिका माय डार्लिंग...


नृत्यप्रेमींच्या डार्लिंग राहिल्या आहेत हेलनजीं...मी तर त्यांना नृत्यबिजली म्हणेन. देखणं व्यक्तिमत्त्व, कमनीय आकृतीबंध बांधा, प्रचंड लवचिकता, भरपूर ऊर्जा आणि त्या त्या नृत्याकरिता त्यांनी दिलेला त्यांचा प्रामाणिकपणा मला भावत राहिला. जी नृत्ये त्यांनी केली त्या नृत्यांना त्यांनी शंभर टक्के न्याय दिला, यात कुणाचंच दुमत नसावं.  
दुसऱ्या महायुद्धादरम्यान वडिलांच्या निधननानंतर त्यांचे बालपण अतिशय गरिबीत आणि कष्टात गेले. त्यांच्या आईची मैत्रिण कुक्कूजी चित्रपटसृष्टीत डान्सर आणि अभिनेत्री होत्या. त्यांच्यामुळे हेलन यांना चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळालं. ५०च्या दशकात त्यांना हळूहळू सोलो डान्स मिळायला सुरुवात झाली. वयाच्या १९व्या वर्षी त्यांना मेरा नाम चिन चिन चूँ...या गाण्यावर नृत्य केले आणि तिथून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अंदाजे ७००हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. ६०च्या दशकात आलेली त्यांची सगळी गाणी ही गाजलेली तर होतीच पण नृत्यप्रधानही होती. खूप मन करायचे त्या गाण्यांवर आपणही ताल धरावा. परंतू त्यांची प्रतिमा कॅब्रे डान्सर म्हणून असल्यामुळे त्या काळात त्यांच्या गाण्यांवर नृत्य करायची हिंमत व्हायची नाही. त्यांनी घातलेले पेहराव हे शरीर प्रदर्शन करणारे असल्यामुळे त्या नृत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. कारण तो काळच तसा होता.
माझ्या नृत्यवर्गात कित्येकदा त्यांच्या मुंगडा मुंगडा या गाण्यावर नृत्य शिकवण्यासाठी आग्रह धरला जायचा. परंतू मी तो सफाईपूर्वक टाळायचे आणि एक दिवस असा आला की स्टार प्लस चॅनलवरील डान्स शोसाठी चॅनलने मला याच गाण्यावर नृत्य बसवायला अनिवार्य केले. मग काय नृत्य दिग्दर्शनातील कसब वापरून गाण्यातील काही शब्दांना बगल देऊन मी ते बसवले आणि त्या स्पर्धेत बाजीही मारली.
तिथून मी आणि माझा दृष्टिकोन थोडा बदलला. एखाद्या गीतातला, संगीतातला आणि नृत्यातला प्रामाणिकपणा भावला असेल तर ती कला तुम्ही तुमच्या कुवतीने प्रभावीपणे रसिकांसमोर आणू शकता. यामुळेच त्यांची काही नृत्ये हळूहळू माझ्या कार्यक्रमात सादर होऊ लागली. दोन वर्षांपूर्वी आशा भोसले यांच्या गाण्यांवर केलेल्या कार्यक्रमात हेलन आणि आशा भोसले यांचं समीकरण टाळणं शक्यच नव्हतं. त्यांच्या कितीतरी गाण्यांवर नृत्ये बसवली आणि तीसुद्धा महिला बॅचवर. या सर्व नृत्यांना महिलांच्या घरुन प्रचंड वाहवा मिळाली होती आणि इथे मला काळ बदलला असल्याचे जाणवले.
हेलन यांना १९८० साली फिल्मफेअर तर १९९९ साली लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार प्राप्त झाले होते. पण खरंच त्यांची नृत्ये ही लाईफटाईम अचिव्हमेंट तर होतीच परंतू ती लाईफटाईम मेनोरेबल पण राहतील.



Sunday, 19 April 2020

गाईडची रोझी, प्यासाची गुलाबो... वहीदा रहमान


 चौदवी का चाँद हो या आफताब हो जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो...
खरंच लाजवाब असं व्यक्तिमत्व लाभलेल्या वहीदा रहमान भरतनाट्यम नृत्य शिकलेल्या आहेत. त्यांचे नृत्य बघून गुरुदत्त यांनी त्यांना फिल्म अभिनेत्री बनवण्याचा निर्णय घेतला. सीआयडी या चित्रपटातून त्यांचे सिनेसृष्टीत पदार्पण झाले. त्यांच्या चित्रपटांतील अनेक गाणी नृत्यासाठी लक्षवेधी ठरलेली आहेत.
साधारण २००४ ची गोष्ट असेल मी ठाण्यात पहिल्यांदा गृहिणी आणि कामावर जाणाऱ्या स्त्रियांसाठी बॉलिवूडच्या नृत्यप्रशिक्षणाची बॅच सुरु केली होती. ज्यांना लहानपणी नृत्य शिकता आलं नाही किंवा परिस्थिती, जबाबदारी, मुलं या सगळ्यात अडकल्यामुळे नृत्याकडे पाठ फिरवावी लागली अशा माझ्या मैत्रिणींसाठी पुन्हा एकदा नृत्य शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी यासाठी हा प्रयत्न होता. योगायोगाने याबद्दलची बातमी महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात छापून आली होती आणि त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात नृत्याची आवड असलेला महिला वर्ग एकत्रित झाला होता.
या सर्व महिलांचा नृत्य शिकताना सर्वात जास्त कल हा जुन्या गाण्यांकडे असायचा आणि आजही असतो. त्यांना अनेक जुन्या अभिनेत्रिंची गाणी मी शिकवते. त्यामध्ये वहीदाजींची पिया तोसे नैना लागे रे, मोसे छल किये जाय, काँटोसे खिंचके आँचल, पान खाए सैया हमारो या गाण्यांवर कित्येक महिलांना घेऊन कित्येकदा नृत्य बसवले आहे. महिलांना या गीतांवर नृत्य करायला खूप आवडते. विशेष करून पिया तोसे नैना लागे रे हे गाणं खूप भावतं. त्यांचा पान खाएँ सैय्या या गाण्यावर सुद्धा वेगवेगळ्या वयोगटात अनेकदा नृत्य बसवले आहे. २००३ साली आठ वर्षांची प्रिया विनोद ही विद्यार्थिनी स्टार प्लसवरील क्या मस्ती क्या धूम या कार्यक्रमात पान खाए सैय्या या नृत्याची विजेती ठरली होती.
वहीदाजी मला कोणत्याही पेहरावात नृत्य करताना आवडायच्या. चेहऱ्यावरील आपल्या प्रभावी हावभावातून त्यांनी प्रत्येक गाण्याला न्याय दिला आहे. कहींपे निगाहे कहींपे निशाना भँवरा बडा नादान, जाने क्या तूने कहाँ ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांना १९७२ साली त्यांना पद्मश्री तर २०११ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. अशा या अभिनेत्रिला आम्हा सर्व नृत्यसख्यांकडून त्रिवार अभिवादन.  



Saturday, 18 April 2020

अतुलनीय वैजयंतीमाला

नृत्यवर्गात बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्य शिकवताना थोडा अडचणीचा भाग असतो तो गाण्यांचा निवडीचा. म्हणजे वयाच्या साडेतीन वर्षांपासून अगदी साठी पार केलेल्या सख्या असल्यामुळे हे थोडेसे अडचणीचे जाते. सर्वांचा जास्तीत जास्त कल हा नवीन गाण्यांवर नृत्य करण्याचा असतो. अर्थात नवीन गाणी प्रगत आणि सुंदर आहेतच. परंतु आजची युवा पिढी जुन्या गाण्यांवर नृत्य करायला बऱ्याच अंशी नाकं मुरडतात. या जुन्या अभिनेत्रिंकडून त्यांनी केलेल्या नृत्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे याचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे लागते. वैयंजतीमाला हे अशाच एका अष्टपैलू अभिनेत्रिंचे नाव... सर्वात जास्त मानधन घेणारी पहिली महिला सुपरस्टार. ही पहिली अभिनेत्री होती जिने भारतीय चित्रपटांतील नृत्याचा दर्जा आणि शैली बदलली तसेच उपशास्त्रीय नृत्याचा बॉलिवूडला परिचय करून दिला. १९५० नंतरच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये आपल्या नृत्याच्या विविध शैली त्यांनी प्रेक्षकांसमोर आणल्या. त्या स्वतः भरतनाट्यम नृत्यांगणा तर होत्याच परंतू नृत्यदिग्दर्शिकाही होत्या.
त्यांच्या चित्रपटातील अनेक गाणी मला नृत्य करायला खुणवायची आणि त्यातल्याच एका गाण्याने कायम माझ्या मनावर अधिराज्य केलंय ते म्हणजे होठोपे ऐसी बात... या गाण्याची जादू कधीच कमी झाली नाही आणि होणारही नाही. एस.डी. बर्मन यांनी संगीताचा अक्षरशः खजाना ओतलाय या गाण्यात. काय वैविध्य दिलंय खरंच अतुलनीय. मी स्वतः या गाण्यावर किती वेळा नाचले असेन याचा हिशोबच नाही. तसेच एक नृत्यदिग्दर्शिका म्हणून विचाराल तर नृत्याच्या विविधतेसाठी प्रचंड स्कोप असलेलं हे गाणं आहे. अशी गाणी नृत्यवर्गात शिकवून विद्यार्थ्यांना नृत्यातील बारीकसारीक बाबी प्रभावीपणे शिकवता येतात. त्यांच्या गाण्यातून मीही नेमके हेच शिकले. स्टेजचा संपूर्ण वापर कसा करायचा, छोट्या छोट्या म्युझिकवर स्टेप्स कशा करायच्या, त्याचबरोबर त्यांना साजेसे हावभाव कसे द्यायचे इत्यादी. आणि याच गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवायला तितकीच जास्त मजा येते. अर्थात अगदी लहान विद्यार्थी त्यासाठी सक्षम नसतात.
होठोपे ऐसी बात हे गाणं ऐकलंय की एका सिंगल शॉटमध्ये शूट केले गेले होते. बापरे ८.१५ मिनिटांचे गाणे एका शॉटमध्ये. सोपी गोष्ट नाही आहे ही. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अशा बऱ्याच आव्हानात्मक गोष्टी केल्या आहेत. आम्रपालीमधील त्यांची सर्व नृत्ये त्याचबरोबर संगममधील मैं का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया... या गाण्यात तर त्याकाळी म्हणजे १९६४ साली वेगवेगळ्या वेस्टर्न कॉस्च्युममध्ये त्यांनी आपण वेगळ्या धाटणीचे नृत्यही करू शकतो हे लिलया दाखवले होते. पुढेपुढे देश विदेशात नृत्यांचे भरपूर कार्यक्रम करून आपल्या नृत्यकलेचा प्रसारही तितक्याच प्रभावीपणे केला. अशा या वैयजंतीमाला ज्या स्वतः भरभरून नृत्य जगल्या आणि आमच्यासारख्या अनेकींना ते जगायला शिकवलं.

Friday, 17 April 2020

ता थैय्या ता थैय्या हो हो हो...

ता थैय्या ता थैय्या हो हो हो...
श्रीदेवी मी लाडाने तिला चिरीदेवी म्हणायचे, असचं. खूप खूप खूप आवडायची ती मला. तिचा पहिला चित्रपट जरी सोलवा साँवन असला तरी माझ्या मनात तिने घर केलं ते हिम्मतवाला या चित्रपटाने. डफलीवाले नंतर नैनों में सपना हे माझं लक्षवेधी नृत्य ठरायला लागले. या गाण्यात नखशिखान्त नटलेल्या श्रीदेवीला मनाच्या सर्व कोपऱ्यात भरभरून भरून ठेवलं होतं. त्यावेळी पोस्टकार्ड साईजचे अभिनेत्रिंचे फोटो मिळायचे ५० पैशाला एक. घरून खाऊला दिलेल्या पैशातून वाचवून मी तिचे असे असंख्य फोटो घेतले होते जे अजूनही माझ्या संग्रही आहेत. तिच्या मोठ्या नाकावरून शाळेतल्या मैत्रिणी मला खूप चिडवायच्या. खूप राग यायचा मला तिला कुणी काही बोलल्यावर. वर्षांगणिक तिच्या दिसण्यामध्ये आणि अभिनयात होत गेलेल्या बदलांमुळे ती रसिकांच्या मनावर राज्य करू लागली. जवळजवळ ३०० चित्रपट केले असतील तिने. त्यातील नृत्यासाठी गाजलेल्या अनेक चित्रपटांची इथे यादी होऊ शकते. जाग ऊठा इन्सान, नगिना, लम्हें, मि.इंडिया, चाँदनी, चाँद का तुकडा इत्यादी सगळेच चित्रपट एकापेक्षा एक सरस. परंतू तिचे अभिनय आणि नृत्यकौशल्य या दोहोंची बाजी कुठे मारली गेली असेल तर ती चालबाज या चित्रपटात. सहज, सुंदर आणि दिलखेचक नृत्य आणि अभिनयसुद्धा. किसी के हाथ ना आएगी ये लडकी... या गीतावरील नृत्य कितीही वेळा बघितले तरी मन भरत नाही. नृत्यकौशल्याबरोबरच कॉमेडीचा प्रचंड सेन्स. तिने या गाण्यात दिलेल्या कुठल्याही हावभावात अतिशयोक्ती वाटत नाही. इतकं सहज आणि सुंदर. अर्थात याचे तितकंच श्रेय नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनाही जातं. साडी, जीन्स, आम्रपाली, घागराचोळी, गाऊन पेहराव कुठलाही असो तिचे सौंदर्य खुलूनच दिसायचे किंवा प्रत्येक पोशाखातला तिचा वावर हा त्याला साजेसाच असायचा.
मी तिच्या गाजलेल्या सगळ्या गीतांवर नृत्य केलंय आणि नृत्यवर्गांत शिकवलंयसुद्धा. काही गीते तर इतक्या वेळा नाचून झाली आहेत की त्यांची कडवी आणि संगीत तोंडपाठ आहेत. अगदी झोपेतून उठून नाचायला सांगितलंत तरी नाचू शकेन.
या चतुरस्त्र अभिनेत्रीचा दोन वर्षांपूर्वी दुर्दैवी अंत झाला. खूप वाईट वाटले. वयाच्या अवघ्या ५५ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पण तरीही तिचं दिसणं, तिचा अभिनय आणि तिचं नृत्य हे माझ्यासारख्या असंख्य जणींच्या मनात कायमचं घर करून राहिलं आहे. 



Wednesday, 15 April 2020

माझ्या मनातली जयाप्रदा...

माझ्या मनातली जयाप्रदा...
सरगम चित्रपटाचा आणि माझ्या नृत्यकलेचा खूप जवळचा संबंध आहे. डफलीवाले डफली बजा... आणि परबत के इसपार... या दोन्ही गीतांनी माझी नृत्यकला जन्माला आली आणि पुढे पुढे ती बहरतही गेली. दूरदर्शनच्या छायागीतमध्ये ही गाणी जेव्हा जेव्हा लागायची तेव्हा तेव्हा त्यातल्या स्टेप्स बघून करायचा माझा प्रयत्न असायचा. आईवडिलांना या गोष्टीचं कोण कौतुक असायचं. जयाप्रदा या दाक्षिणात्य अभिनेत्रीचा हा पहिलाच चित्रपट. कसली सुंदर दिसत होती ती या चित्रपटात. धारदार नाक आणि सुबक चेहेऱ्याच्या या अभिनेत्रीने नृत्याबरोबरच तिच्या सौंदर्याचीही भूरळ घातली होती. आजही ही गाणी ऐकली की मन त्या काळात जाऊन रमतं.
आमचं परळगाव म्हणजे खरंच गावासारखं होतं. बिल्डिंगचा फारसा मागमूस नव्हता. बैठी एक मजली कौलारु घरं, वेगवेगळ्या आळ्या, देवळं आणि भरपूर लहान मुलं. सर्व सण अगदी गावासारखे साजरे होत. रामनवमी, हमुमान जयंतीला पालखी येत असे, जी अजूनही येते. सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक पूजा यांचे विशेष कौतुक, सार्वजनिक गणेशोत्सव तर आम्ही लहान लहान मुलांनी एकत्र येऊन सुरु केला होता ज्याचे आज स्वरुप खूप मोठे झाले आहे आणि या सण-समारंभात माझा डफलीवाले या गीतावरचा नृत्याविष्कार हमखास ठरलेला असायचा. कित्येक वर्षे नाचत होते मी या गाण्यांवर. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या कर्णमधुर संगीताने समृद्ध असलेल्या सरगम या चित्रपटाने जयाप्रदासारखी अभिनेत्री दिली. दिसायला सुंदर आणि नृत्यातही तितकीच तरबेज. पण तरीसुद्धा तिला म्हणावे तसे नृत्यप्रधान चित्रपट मिळाले नाहीत असे मला वाटते. काही चित्रपट वगळता तिची ही नृत्यकला चित्रपटातून फारशी दिसली नाही किंवा तिचे चित्रपट नृत्याकरीता फारसे गाजले नाहीत.

तोहफा चित्रपटात शेकडो साड्यांच्या सेटवर तिला वेगवेगळ्या सांड्यामध्ये नाचताना बघायला खूप छान वाटले होते. मला विचाराल तर तिचे सौंदर्य साडीमध्ये अधिक खुलून दिसायचे. मध्ये भांग असलेली सैलसर वेणी, वेणीला खाली गोंडा आणि भरपूर गजरे किंवा कानाच्या मागे फुले, कानात झुमके...खूप आवडायचा मला हा पेहराव. लांब केसांची फॅशनच आली होती त्यामुळे. अशी ही जयाप्रदा तिच्या सौंदर्याने, अभिनयाने आणि अर्थातच नृत्याने माझ्यासारख्या बऱ्याच सखींना त्या काळात भूरळ घालत होती आणि आजही त्याच गारुड कायम आहे. 

Tuesday, 14 April 2020

मी, नृत्यकला आणि बॉलिवूड

मी, नृत्यकला आणि बॉलिवूड
माझ्या मते मूल जन्माला येतेच तेच नृत्य करत येते. या जगात प्रवेश करताच हातपाय हलविण्याची क्रिया त्याची निसर्गतःच होत असते आणि नृत्यातही नेमके हेच घडत असते. फक्त त्या हातपाय हलविण्यात एक लयबद्धता येते,  नियोजन येत जातं इतकंच.
मला जितकं आठवतंय त्यानुसार मी अंदाजे पहिल्या किंवा दुसऱ्या इयत्तेत असेन, १९७९ ला सरगम चित्रपट आला आणि त्या चित्रपटातल्या डफलीवाले या जयाप्रदा यांच्यावर चित्रित गीतावर मी नृत्य करायला लागले आणि माझ्या नृत्यकलेचा श्रीगणेशा झाला. त्या दिवसापासून सिनेचित्रपटसृष्टीशी म्हणजेच बॉलीवूडशी माझं नातं पक्क झालं.
काय नाही दिलं या बॉलिवूडने मला. सुंदर आणि पवित्र अशा नृत्यकलेशी नाळ जोडली ती या बॉलिवूडमुळेच. रितसर शास्त्रीय शिक्षण (भरतनाट्यम) शिकायला सुरुवात वयाच्या बाराव्या वर्षी झाली. आजकालच्या मुलांच्या तुलनेत तशी उशिराच झाली. ते सुद्धा आमच्या शाळेत नृत्यवर्ग सुरु झाल्यामुळे नाहीतर अजून किती वर्षे लागली असती कुणास ठाऊक. त्या काळात हल्लीच्या पालकांप्रमाणे तितकीशी जागरुकता नव्हती. पण तरीही शाळेत सुरु झालेल्या नृत्यवर्गात पाठवायला आईवडिलांनी कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत. कारण त्यांनी माझ्या नृत्याचे वेड बघितलेले होते. आई पप्पा तसेच समोरच्या काकू, शेजारचे सांगतात की तू रेडिओवर गाणी लागली की सतत नाचतच असायती. मला सगळे भिंगरी म्हणायचे महिना तीस रुपये फी भरून गुरु डॉ. किशूपाल यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याच्या या अथांग सागरात माझा भरतनाट्यमचा नृत्यप्रवास सुरू झाला परंतू यामुळे बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्य करायचे वेड काही कमी झाले नाही. उलट ते दिवसागणिक, वर्षांगणिक वाढतच गेले. मी, माझे नृत्य आणि बॉलिवूड या तिघांचे नाते अगदी घट्ट झाले.
बॉलिवूडने नुसती नृत्यकलाच दिली नाही तर जगण्याची कलासुद्धा दिली हे अतिशय महत्त्वाचे. या बॉलिवूडची भूरळ माझ्यासारख्या लाखो नृत्यांगणांना पडली असेल आणि पडतही राहील. या भरभरून जगायला प्रवृत्त करणाऱ्या बॉलिवूड जगतातल्या काही तारकांच्या, गीतांचा आणि नृत्यांचा माझ्या आयुष्यावर पडलेला प्रभाव आणि त्यांचे महत्त्व इथे सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे...

माझ्या आठवणीतील होळी

  होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत स...